अभिमानास्पद व्यक्तिमत्व : प्रथमेश गुरव

किरातचा शताब्दी स्नेहमेळावा वेंगुर्ला-कॅम्प येथे नविनच बांधलेल्या नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात अतिशय दिमाखात पार पडला.  यात नृत्याविष्कार, कळसुत्री बाहुल्या, बालदशावतार जुगलबंदी, गीतकार गुरु ठाकूर यांची दूरदर्शनाच्या निवेदिका शिबानी जोशी यांनी घेतलेली बहारदार मुलाखत, ‘आवाज चांदण्यांचे’ ही भावस्पर्शी संगीत मैफल असा बहुरंगी-बहुढंगी अप्रतिम कार्यक्रम वेंगुर्लावासीयांना मंत्रमुग्ध करुन गेला.

      तसेच किरात कर्मचाऱ्यांच्या सत्काराबरोबरच अनेक पुरस्कार देण्यात आले. कै.श्रीधर मराठे स्मृती प्रेरणा पत्रकार पुरस्काराचे यंदाचे मानकरी होते पत्रकार प्रथमेश गुरव! धडाडीचे पत्रकार, बालदशावतार चळवळीस प्रोत्साहन, भजनी मंडळात सक्रीय सहभाग या कर्तृत्वाबद्दल त्यांना हा पुरस्कार गीतकार गुरु ठाकूर यांच्या हस्ते देण्यात आला.

      प्रथमेश उर्फ भैय्या गुरव हे ‘किरात’ साप्ताहिक आणि ‘लोकमत’चे वेंगुर्ला प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. अतिशय मनमिळावू, मितभाषी, उच्च विचारसरणी, साधे राहणीमान, सतत कुणालाही मदतीचा हात देणारे व्यक्तिमत्व!

      पत्रकारिता करीत असतानाही त्यांनी लहान मुलांना एकत्र करुन ‘रामेश्वर दशावतार मंडळा’ची स्थापना केली. स्वत: पखवाज वादन करत मुलांना प्रोत्साहित करत स्वत:ही दशावतारी नाटकात स्त्रीपात्र, राजा, ऋषी अशा अनेक भूमिका ते साकारत आहेत. सतत नव्याचा ध्यास घेत दशावतारी कला अखंडपणे, चिरकाल टिकविण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न स्तुत्यच वाटतो. त्यांच्या मंडळातील बाळकडू घेतलेले युवक आता रामेश्वर दशावताराचे नाव उज्ज्वल करीत आहेत.

      ‘किरात’च्या ह्याच मेळाव्यात ‘रामेश्वर दशावतार’ मंडळातील मुलांच्या पालकांनीही प्रथमेश गुरव यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. असा हा वेंगुर्लावासीयांचा ‘भैय्या’ अभिमानास्पद कामगिरी करतो आहे. ‘किरात’ आणि ‘लोकमत’ बरोबरच इतरांच्याही ‘मानाचा तुरा’ ठरावा हिच सदिच्छा!

– प्रा.नारायण गिरप, वेंगुर्ला, 8149817049

Leave a Reply

Close Menu