किरात साप्ताहिक- एक जनहिताय साप्ताहिक!

              1922 साली अनंत वासुदेव मराठे, सामाजिक, राजकीय क्षेत्रा बाबत दूरदृष्टी असलेल्या या महात्म्यांनी, या साप्ताहिकाची गुढी उभारली आणि दि.14.05.2022 रोजी, त्यांच्या चौथ्या पिढीने या साप्ताहिक शताब्दी स्नेह मेळावा संपन्न केला. या स्नेहमेळाव्याचे प्रक्षेपण दृश्‍य माध्यमातून पाहाण्याचे भाग्य मला लाभले ते या साप्ताहिकाच्या कर्तबगार युवा संपादक सौ. सीमा मराठे यांच्या कृपेने! हा स्नेहमेळावा पाहाताना मनापासून एक जाणवले ते म्हणजे “झालेत बहू! होतीलही बहू! परंतु या सम हा! व्यासपिठाचा भव्य पडदा उघडताच पोडियमवर एक प्रसन्न व्यक्तिमत्व नजरेस पडले आणि ते चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणजे शिबानी जोशी!

      समारंभाच्या आराखड्याची इत्थंभूत माहिती, ‘किरात‘ च्या जन्मापासून ते सांप्रत काळपर्यंतचा लेखा जोखा आणि समयसूचकता, ऐवजासह, शिबानी ताईंनी समारंभाचे निवेदन करण्यास सुरुवात केली.

            निवेदनाच्या ‘श्री गणेशा‘ मध्ये त्यांनी, एका बाजूला, अगदि परखडपणे,  मराठी माणसांच्या ‘एकजूटी‘ मधील ‘त्रूटी‘ वरील प्रश्‍नचिन्ह उभे केले परंतु त्यालाच अपवादात्मक परिस्थिती म्हणजे, किरातच्या मराठे कुटुंबियांमधील एकरूपत्वाची वानगी देऊन किरातचे मूल्य किती दृढ आहे हे नमूद केले. या शंभर वर्षाच्या सलग आणि सजग प्रवासासाठी समस्त मराठे कुटुंबीयांचे अंतःकरण पूर्वक अभिनंदन!

      निवेदनाचे दुसरे पाऊल टाकताना शिबानी ताईनी, प्रेक्षक- श्रोत्यांना ‘किरात‘ या शब्दाचे विविध अर्थ सांगून त्या शब्दाचे विविध पैलू दाखविले व ते सर्व या साप्ताहिकाशी कसे सुसंबंध आहेत याचा अर्थबोध करून दिला व किरातचा जन्म आणि पुढील प्रवास याचे संक्षिप्त परंतु मुद्देसूद विश्‍लेषण केले. मुंबईच्या ढवळे प्रकाशनमध्ये कार्य करणारे, तत्कालिन वेंगुर्ल्या सारख्या दुर्गम भागतील एक धोरणी आणि समाजसेवी वृत्तीचे व्यक्तिमत्व- अनंत वासुदेव मराठे, यांनी एक स्वप्न पाहिले व त्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्यासाठी, वेंगुर्ले येथे एक छोटा छापखाना सुरु केला व एक छोटेखानी वृत्तपत्र जन्मास आले- त्याचे नामकरण ‘किरात‘ असे झाले. पुढे तंत्रज्ञान विकासामुळे वेगवेगळे बदल करून किरात आज वेंगुर्ल्या मधील तथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सर्वसंपन्न बातम्या/माहितीचे मुखपत्र झाले आहे. नवोदित लेखक, कवीना प्रोत्साहित करण्यासाठी सदर साप्ताहिकामध्ये संबंधीत सदरे सुरु झाली. या साप्ताहिका बद्दल एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद गोष्ट सांगायची म्हणजे दि. 15 ऑगस्ट 1947, भारताच्या स्वातंत्र्य दिनी, संपदकीय मधील बहुआयामी लेख ज्यातून तत्कालीन भारताचे पंतप्रधान पं. नेहरू तसेच वेंगुर्ला तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्हा निर्मिती बद्धल विस्तृत विवेचन आले होते जे आजही स्फुरणीय आहे.

      हे सर्व प्रास्ताविक  सुंदररित्या प्रस्तुत करून स्नेहमेळाव्याची नांदि झाली ती सुद्धा मंगलमूर्ती गणपती बाप्पाच्या वंदनेने. ही वंदना जिल्ह्यातीलच एक बहुगुणी व बहु पुरस्कारानी विभूषित अशा छोट्या चि. निरजा माडकर या कन्येने सादर केले. ‘गणनायकाय, गण दैवताय‘ या मंगल गीतावरील, भरतनाट्यम या नृत्य प्रकारामधून निरजाने जो पदन्यास करून नृत्याविष्कार सादर केला तो खरंच अवर्णनीय आणि वंदनीय होता. या वंदनेनंतर कृष्ण वंदना सादर केली ती चि. केतकी आपटे या मुलीने. या दोन्ही इशस्तवनेने कार्यक्रमाचे वातावरण मांगल्याने आणि पवित्र्याने भारून गेले. या पवित्र वातावरणामधून हा कार्यक्रम प्रेक्षकांना आदिवासी समाजातील कळसुत्री बाहुल्यांच्या विश्‍वात घेऊन गेला. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त लोककलाकार श्री. गणपत मसगे यांचे सुपुत्र कृष्णा मसगे आणि त्यांच्या समुहाने या कळसुत्री बाहुल्यांच्या, खेळातून वेगवेगळी पौराणिक कथांचे सादरीकरण केले.

      आदिवासी कलांचे सादरीकरण संपता संपताच ‘बाल दशावतार‘ गायन व पखवाज वादनाचा बहारदार कार्यक्रमाची घोषणा झाली. परंतु सदर कार्यक्रमाची तयारी होण्यास काही मिनीटांचा अवधी होता त्या अवधी मध्ये प्रेक्षक-श्रोते कंटाळू नयेत व त्यानी आसनस्थ राहावे या हेतूने, समयसूचकता साधून शिबानी ताईनी पुणेरी पाट्या, हशा-टाळ्या वर खुमासदार आणि खुसखुशीत गप्पा मारल्या. याचा फायदा असा झाला की शिबानी ताईच्या या विनोदी संभाषणाने,  बंद पडद्याला छेदून तडक प्रेक्षक मंडळीच्या हृदयाचा वेध घेतला व त्यांची आसना मधील चुळबुळ त्वरीत थांबली. निवेदकाचे हे खरंच कसब असते कि केवळ पोडियम उभे राहून लिहून आणलेली संहिताच न वाचता, क्षणाक्षणाला चौकस राहून, हरतऱ्हेचे उपाय योजून कार्यक्रमाची गती कायम ठेवायची! यात शिबानी ताईनी अव्वल कामगिरी केली.

      तद्नंतर प्रत्यक्ष बालदशावतार मंडळींचा ‘दशावतार‘ ह्या जुगलबंदीच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. युवा हार्मोनियम वादक-गायक मयूर गवळी आणि पखवाज वादन या ताल वाद्यामधील उदयोन्मुख प्रथम महिला कलाकार चि. भाविका खानोलकर यांनी  दशावतार नाट्याला श्रवणीय सांगितिक गायन-वाद्य साथ दिली व मंचावर एक कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचे पौराणिक नाट्य सादर झाले.

      यानंतर टप्पा होता कौतुक समारंभाचा. या स्नेहमेळाव्यातील सहभागी कलाकारांना तसेच सामाजिक, कला आणि विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीना उत्तेजन देण्यासाठी, स्नेहमयी पुरस्कार प्रदानाचा. या कौतुक समारंभान्वये प्रसिद्ध जागतिक किर्तीचे ज्येष्ठ रांगोळी चित्रकार श्री. पोलाजी सर आणि प्रसिद्ध चित्रकार श्री. दाभोलकर यांचे दर्शन घडले. या कौतुक सोहळ्यानंतर, स्नेहमेळाव्याचा गाभा म्हणजे ‘किरात‘ साप्ताहिकावरील ‘माहितीपट तथा अनुबोधपट‘ (Documentary), सुरु झाला. ‘किरात‘ च्या ‘अथ पासून इति‘ पर्यंतच्या प्रवासाचे धिरोदात्त वर्णन श्री. ऋषी देसाई यांच्या दमदार आणि वजनदार आवाजात हा अनुबोधपट ऐकणे म्हणजे श्रोतृवृंदाला एक पर्वणीच होती. माझ्यासारख्या सामान्य आणि या साप्ताहिका बद्दल अनभिज्ञ (दुर्देवाने) असणाऱ्या माणसाला एक अपूर्व ज्ञानाची मंजूषा होती. दर्पणकर बाळ जांभेकर आणि बाबुराव पराडकर या महान विभूतींकडून चेतना आणि प्रेरणा घेऊन, अनंत वासुदेव मराठे यांनी सन 1922, साली ‘किरात‘ नावाच्या वृत्तपत्रासाठी छोट्याशा छापखान्या स्वरूपात एका इवल्याशा रोपाचे बिजारोपण केले. स्वातंत्र्य पूर्व काळ विचार करता, समाज जागृती, समाज प्रबोधन अशा प्रवृत्तींना मज्जाव होता अशा काळात स्वतःचे वृत्तपत्र चालू करणे म्हणजे तळहातावर निखारा घेऊन चालण्यासारखेच होते. परंतु समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य याची जाणीव असलेल्या अनंत मराठे यांनी हे  ज्ञानकुंड प्रज्वलित केले आणि पिढ्या दर पिढ्या मराठे कुटुंबियांनी या ज्ञानाग्नीहोत्राचे पावित्र्य सातत्याने जपून ठेवले किंबहुना त्याचे संवर्धन केले. मराठे कुटुंबियांची चौथी पिढी किरातची धुरा समर्थपणे आणि सशक्तपणे आपल्या खांद्यावरून वाहून नेत आहे. किरातच्या शताब्दी स्नेहमेळाव्या दिवशी, सिंहावलोकन करू पाहता हा सारा प्रवास जेवढा संघर्षपूर्ण होता तेवढाच तो प्रेरणादायी ठरला. सत्याची चाड आणि असत्याची नाड हे धोरण हृदयापाशी जपून समाजातील अनिष्ट गोष्टींवर शाब्दिक शरसंधान करणे, जनतेच्या प्रश्‍नांना योग्य मार्गदर्शित करून न्याय मिळवून देणे, या मौलिक मूल्यांची कास धरून, विविध स्नेहमेळावे, प्रेरणा पुरस्कार, पत्रकारांचा सन्मान, प्रेरणा कार्यशाळा इत्यादि स्तुत्य उपक्रम राबवीत आहेत व ते यशस्वी करीत आहेत. आज चौथ्या पिढीचे युवा स्तंभ शशांक मराठे आणि सौ. सीमा मराठे यांनी किरातसाठी मोलाचे योगदान देऊन मराठे कुटुंबियांमधील पूर्वसुरींनी लावलेल्या इवल्याशा रोपाचा आज वटवृक्षामध्ये रुपांतर केले आहे. या मागील त्यांचे अथक परिश्रम, तपस्या या वृत्ती, त्यांचा स्व-विकास तथा जनविकास घडविण्यात सिंहाचा वाटा उचलत आहेत. लोकाश्रय, पूर्वसूरींची पुण्याई आणि सत्याची कास, किरातला  ‘निस्पृह- निर्भिड- निगर्वी‘ या बिरुदाने सजवित आहेत.

      दुपारी साधारण चार वाजता सुरु झालेला हा स्नेहमेळावा रात्रीच्या बारा वाजेपर्यंत अतूट आणि अविरत चालू होता. याला कारण होते, किरात विषयी आणि मराठे कुटुंबियांच्याबद्दल लोकांच्या मनात असलेले प्रेम आणि श्रद्धा!

      पुढील मनोरंजक टप्यावर रंगली ती, शिबानी जोशी या कसबगार निवेदिका- मुलाखतकार यानी घेतलेली श्री. गुरू ठाकूर या सिंधुदुर्गाच्या अष्टपैलू आणि अष्टावधानी ‘कलाकारा‘ची मुलाखत. खरं म्हणजे या मनमोकळ्या गप्पा होत्या. शिबानी जोशी यांनी, प्रेक्षक- श्रोत्यांचे प्रतिनिधीत्व करून, प्रेक्षकांच्या मनातील अचूक प्रश्‍न स्वतःच्या कौशल्याने विचारून त्यांनी गुरु ठाकूर यांचेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळविला आणि त्याचमुळे ही मुलाखत एकढी प्रदीर्घ असून देखील शेवटपर्यंत हवी-हवीशी वाटत होती. अर्क चित्रकार, गीतकार, पटकथा लेखक, कवी, इ. कंगोरे असलेले गुरु ठाकूर यांनीही आपले एक एक पैलू प्रांजळपणे व्यक्त केले. वरीलपैकी त्यांच्या कुठल्याही आविष्कारात त्यांना स्वतःची पत आणि इभ्रत किती मौल्यवान आहे हे लिलया सूचित केले. अनेक प्रथितयश लेखक-कवी यांचे कडून त्यांना मार्गदर्शन झाले. श्री. गुरुंच्या प्रत्येक काव्यात, कथेमध्ये गावच्या मातीचा मृदगंध सदैव जाणवतो म्हणूनच आज कलेच्या सर्व क्षेत्रात आकाशा एवढे यश मिळून देखील सिंधु सागरातील या माणिक मोत्याचे पाय आणि नाळ कोकणच्या मातिशी जोडलेले आहेत.

      स्नेहमेळावा कधी संपूच नये असे वाटत असताना वेळेचे भान राखून कार्यक्रमाची सांगता ‘आवाज चांदण्याचे‘ या सुरेल संगीत मैफिलीने झाली. युवा संगीत शास्त्र मागदर्शक श्री. प्रतिक गायकवाड आणि त्यांचा समुह यांनी ही गान-मैफिल फारच श्रवणीय केली.  शब्द परागांना मधुरकंठी आवाजातून, प्रेक्षागृहांमध्ये पसरवित सौ. अपर्णा प्रभू यांनी सदर कार्यक्रमाचे निवेदन श्रोत्यांच्या काळजापर्यंत पोहोचविले.

      सर्वश्री मधु मंगेश कर्णिक, सुरेश प्रभू अशा मान्यवरांनी किरात बद्धलचे मनोगत बोलून दाखवून, किरात आणि मराठे परिवाराला भरभरुन शुभेच्छा दिल्या. या मनोगता बरोबरच एक आंतरिक मनोगत काळजास जास्त भिडले ते म्हणजे सौ. गितांजली ताई यांनी सांगितलेले मनोगत. खूपच हृदय स्पर्शी होते.

      किरात साप्ताहिकाच्या यशस्वी वाटचालीसाठी मराठे कुटुंबियांस या मालवणी वृद्ध रसिकाच्या, अंतःकरण पूर्वक शुभेच्छा आणि उदंड आशीर्वाद !

-आनंद ग. मयेकर, 9930243943

राहणार ठाणे,  मूळ गाव मालवण

Leave a Reply

Close Menu