प्रकाशमान प्रज्ञापुरूष…..भास्कर उर्फ आप्पाजी परब…

मासिक स्मृतिदिन – 9 जून 2022 ( देवाज्ञा- 9 मे 2022)

     समोर धडाडणारी चिता, आकाशाला भिडायला निघालेल्या लाल पिवळ्या ज्वाळा. चितेवर राख होत जाणारे आपल्या परमप्रिय पित्याचे पार्थिव. असंख्य विचारांचे आणि स्मृतींचे मनात उठणारे काहूर…! आपल्या मनात उसळण़ाऱ्या भावनाना बांध घालून तो स्थितप्रज्ञ कर्मयोगी ऐका अत्यवस्थ पेशंटचा जीव वाचविण्यासाठी आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहात रात्रीच्या निरव शांततेत व मिट्ट अंधारात आपली गाडी सुरू करतोय. अशा सुपुत्राला जन्म देणारे आईवडील खरोखरच धन्य होत.

      अशा थोर पित्याचे अनंताच्या यात्रेला निघून जाणे…..

      आमच्याकडे कामाला येणाऱ्या बाईचा सराईत हात भांड्यांवर फिरत होता. ती नुकतीच वेंगुर्ल्यातून आली तीच इकडे आली होती. मध्येच तिचा हात थांबला. “तुम्हाला समजलं काय ओ, परब डॉक्टरांचे वडील गेले काल“ ती पुढे काय बोलत होती मला समजल नाही. ते एकच वाक्य कानातून मेंदूला धडकून मनात वादळासारख घोंगावत राहिल. त्या वाक्यातला अंधारा, काटेरी अर्थ मनात वर्षावत राहिला. “आप्पाजी गेले? म्हणजे ते आता परत आपल्याला कधीच दिसणार नाहीत. ‘वृंदा’ अशी वात्सल्यरसात भिजलेली हाक परत कधीच कानावर पडणार नाही. निर्मळ झऱ्यासारखे प्रसन्न हास्य परत कधीच पाहाता येणार नाही.  असेच काहीतरी विचार मनात चालू होते.

      पण मी तरी अशी कशी? का नाही कधी वेळ काढून त्यांच्यापाशी जाऊन बसलो आपण? का नाही त्यांच्याशी चार प्रेमाच्या आपुलकीच्या गप्पा केल्या? का नाही थोडा वेळ त्यांच्यापाशी बसून जुन्या गोष्टीना उजाळा दिला? एवढं कसलं दुसर गारूड होत मनावर? खरं तर हे सगळं करायचंच होतं मनात. पण कोरोनाचा काळ संपला नंतर एसटीचा संप. आणि घरातील असंख्य अडचणी, विविध ठिकाणी वरचेवर आलेले कार्यक्रम, घरातली व बाहेरची अनेक कामे, ढासळणाऱ्या तब्येती, पाहुणे, वगैरेंच्या पसाऱ्यात मनातील विचाराना मूर्तरूप देण्याचे राहूनच गेले. आता मी एसटीने वरचेवर वेंगुर्ल्याला जाणार होते. अनेक नियोजित कामात आप्पाजींकडे जाणे हेही होते. पण त्यापूर्वीच आप्पाजीनी जाण्याची घाई केली.

      आप्पाजी! असंख्य विचार दाटून येतात मनात. आप्पाजींची आणि माझी ओळख कशी झाली. काहीतरी दैवी संकेत असावा तो. मी शाळेत फेस्टीव्हल कमिटीची चेअरमन होते. आम्ही का कार्यक्रमाला एल. जी. परबना मेन गेस्ट म्हणून बोलावले होते. पण त्याना अचानक मुंबईला जावे लागले. त्यांनी जाताना मला सांगितले की मी तुम्हाला माझ्याऐवजी दुसरा चांगला  माणूस देतो. त्यांनी सुचवलेल्या भास्कर परबना मी शाळेत  निमंत्रित केले. तेव्हाच त्यांचे सात्विक व्यक्तिमत्व सर्वांवर प्रभाव टाकून गेले. त्यानंतर त्यांच्यातील मला पितृतुल्य आप्पाजी भेटत राहिले. त्यांच्या सांगण्यावरूनच मी सातेरी प्रासादिक संघाच्या कार्यकारिणीत गेले. त्यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने मी आनंदयात्री वाङ्मय मंडळाची संस्थेची एक शाखा म्हणून स्थापना केली. अशाप्रकारे आप्पाजींच्या आशीर्वादानीच मी सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. तेच माझे आनंदयात्री वाङ्मय मंडळ आज वेंगुर्ला तालुक्यातील सांस्कृतिक क्षेत्रातील साहित्यविषयक एक सक्षम अशी चळवळ बनत आहे.

      आप्पाजी म्हणजे जणू प्रेमाचा झुळझुळता झराच. त्यांच्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तिला त्यांच्या मनातील प्रेमाचा ओलावा जाणवायचा. त्यांच्या अंतःकरणातील सात्विक, पवित्र विचारांचे प्रतिबिंब त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचे. म्हणूनच एक सात्विकतेची प्रभा त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेली असायची.

“कसा प्रकाश पाझरे,

कसा विरे हा अंधार,

क्षणोक्षणी  रंग बदलणारे कोण आहे हा सूत्रधार?“

      अशाप्रकारे या विश्‍वाचे नियंत्रण करणारी शक्ती कोणती आहे आणि तिला भेटण्याचे मार्ग कोणते आहेत यावर अनेक संतानी चिंतन करून आपापल्या पद्धतीने चिंतनाचे सार मांडले. प्रत्येकाचे मार्ग भिन्न होते. आप्पाजीही याच प्रश्‍नाच्या उत्तराच्या शोधात होते. त्यानी त्यासाठी भक्ती मार्गाची कास धरली होती. संत ज्ञानेश्‍वर माऊली म्हणतात, “नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कला“ योग्याना, तपस्यांना साधलेली तीच जीवनाची कला आप्पाजीना सापडली होती. नामस्मरण, भजन यापुढे इतर सर्व कर्मकांड त्यांनी त्याज्य मानले. खरा ज्ञानी कोणास म्हणावे याची लक्षणे भगवंतानी भगवद्गीतेत सांगितली आहेत.  “नम्रता, दंभशून्यत्व, अहिंसा, ऋजुता, क्षमा वगैरे हे सर्व गुण आप्पाजींमध्ये होते. त्यांच्याकडे संतांची बिरूदे नव्हती, संतांचा वेषही नव्हता. पण संतांच्या हृदयातील तीच अपार करूणा आणि सर्व चराचर सृष्टीविषयी भरून राहिलेले प्रेम होते. कलावती आर्इंचे ते निस्सीम भक्त होते. त्यानी वेंगुर्ल्यात स्वतःच्या जागेत स्वखर्चाने कलावती आर्इंचे मंदिर उभारले. लोकांना जमवून ते मंदिरात भजन करीत. कलावती आर्इंची शिकवण व त्यांचे चरित्र लोकांना सांगत. वेंगुर्ल्यात त्यांनी आर्इंचा भक्तगण निर्माण केला. सेवा, प्रेम, ज्ञान यावरच जीवनाची इमारत उभी करावयाची आहे असे ते सांगत.

  “थांबू नको चालत राहा,

  विझू नको तेवत राहा,

  नदीसारखे वहात राहा “

      असाच संदेश जणू त्यांनी आपल्या कार्यातून दिला.

  “अंतरात ज्ञानज्योती पेटवू आम्ही,

  सर्वदूर ज्ञानवन्ही चेतवू आम्ही“

      अशा दुर्दम्य जिद्दीने त्यांनी कार्य केले. जीवनात वाट्याला येणाऱ्या असंख्य दुःखांची धार बोथट करण्यासाठी आणि त्या दुःखाच्या छाताडावर आपल्या टाचा रेवून परत उभे राहाण्याचे पोलादी सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी त्यांनी भक्तीमार्ग हा सोपा मार्ग लोकांना दाखवला. मंदिर बांधावे, लोकाना सन्मार्गाचा प्रसार करावा हा त्यांचा संकल्प होता. अंधाराकडून सूर्याकडे जाण्याची, दुःखाकडून परम सत्याकडे जाण्याची त्यांची आकांक्षा होती. तोच त्यांचा संकल्प होता. त्यासाठी सातत्यपूर्ण श्रमातून त्यांनी आपला संकल्प सिद्ध केला. शिस्त या मूल्याला त्यानी जीवनात महत्त्व दिले. वक्तशीरपणा स्वतः जोपासला आणि इतरांनीही जोपासावा अशी अपेक्षा ठेवली. प्रत्येक कृती आखीव रेखीव असावी यावर त्यांचा भर असे.

      जीवन एक प्रवाह अनादी काळापासून अखंडपणे वाहातो आहे. इतिहास हा वर्तमान जीवनाचा पूर्वरंग असतो, तो पाऊलखुणा मागे ठेवून वाहात राहातो, आप्पाजींचे कार्याच्या पाऊलखुणा भविष्यात लोकस्मृतींच्या गाभाऱ्यात पूजल्या जातील.

      नंदादीपाचे तेज आणि पावित्र्य घेऊन जीवन जगलेल्या आप्पाजीना अंतःकरणापासून नमस्कार. परमेश्‍वराने त्यांना शांती द्यावी.

-सौ. वृंदा कांबळी, 9421262030

Leave a Reply

Close Menu