समस्यांच्या गर्तेत सिधुदुर्ग विमानतळ

पंतप्रधान उडान योजनेंतर्गत लहान विमानतळे मोठ्या विमानतळांना जोडली गेली आणि सर्वसामान्य माणसांच्या खिशाला परवडेल असा विमानप्रवास सुरु झाला. चिपी येथे सिधुदुर्ग विमानतळ प्रत्यक्ष कार्यान्वित होऊन आता वर्ष होत आले. अगदी सुरुवातीच्या काळात सवलतीच्या दरातील तिकिटे संपल्यानंतर पंधरा ते अठरा हजार रुपयांपर्यंत प्रवाशांनी तिकिटे खरेदी करीत विमानप्रवास केला. तासाभरात चाकरमानी आपल्या घरी येऊ लागला. त्याचा हा आनंद तिकिटाच्या पैशापेक्षाही मोठा होता. विमानसेवा सुरु होते न होतेच तोच येथील जंगली प्राण्याचा त्रास सुरु झाला. कोल्ह्यांनी अनेकवेळा विमान लँडिग करताना अडथळे निर्माण केल्याच्या घटनाही घडल्या.

      अलिकडे तर हवामानाच्या अनिश्चिततेमुळे ब-याचवेळा विमान लँडिग झाले नाही तर परतीच्या प्रवासाचे विमानही उड्डाण न झाल्याने प्रवाशांचीही प्रचंड गैरसोय झाली. कारण, नैसर्गिक असले तरी विकासक कंपनी व विमान सेवा देणा-या कंपनीने प्रवाशांना वा-यावर सोडले. तर ऐन गणपती सणात दोन दिवस विमान सेवा अचानक रद्द झाल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली. अजूनही चिपी-सिधुदुर्ग येथे नाईट लँडिगची सुविधा नसल्याने आणि विमानाचे उड्डाण होईल व रद्द होईल या भितीने सवलतीच्या दराची विमान तिकिटे उपलब्ध असूनही प्रवाशांनी पाठ फिरवायला सुरुवात केली आहे. येथील सोयीसुविधांचा विचार करता विकासक आय. आर.बी. कंपनीने साधी कॅन्टीन सुविधाही तिथे निर्माण केलेली नाही. त्यामुळे विमान उशिरा आले किवा विमानाला उशिर होणार असेल तर तिथे साध्या चहा, बिस्कीटांचीही सोय नाही. अधिकृत टॅक्सी, रिक्षा स्टॅण्ड अजूनही नसल्याने प्रवाशाला दळणवळणाच्यादृष्टीने सिधुदुर्ग विमानतळ गैरसोयीचे ठरत आहे.

       आता तर गोवा येथे मोपा विमानतळाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. मोपा सुरु झाल्यानंतर सिधुदुर्ग विमानतळाला प्रवाशांची पसंती राहिल काय? किवा सिधुदुर्ग विमानतळ सुरु राहील काय? असेही प्रश्न जनमानसात उमटू लागले आहेत. मोपा येथे मोठ्या प्रमाणावर विमाने सुरु होणार असल्याने साहजिकच तिकिट दर येथील विमानतळापेक्षा कमी असतील. सावंतवाडी, दोडामार्ग हे तालुके तुलनेने मोपापासून जवळ असल्याने याचा धोका चिपी-सिधुदुर्ग विमान सेवेला बसणार आहे.

      सिधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्यावेळी सर्वपक्षिय नेते व्यासपिठावर उपस्थित होते. अनेक घोषणाही केल्या गेल्या. परंतु, पदरी काहीच पडले नाही. श्रेयवादात नेते मश्गूल राहिले. यातच येथील सर्व राजकीय नेत्यांनी समाधान मानले. पण विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी, तेथील गैरसोयी दूर करण्यासाठी कोणीच प्रयत्न केले नाही. नारायण राणे हे केंद्रात मंत्री आहेत. तर उदय सामंत, दिपक केसरकर हे राज्यात मंत्री आहेत. तसेच खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे यांनी एकत्र येत सिधुदुर्ग विमानतळ टिकविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, अशी आशा सिधुदुर्गवासीय बाळगून आहेत.

      सिधुदुर्ग विमानतळावर नाईट लँडिग सुविधा तातडीने सुरु करणे आवश्यक असताना त्याबाबत यंत्रणा विमानतळ सुरु करण्यापूर्वी करण्यात आली आहे. विमानतळ सुरु झाल्यानंतर सहा महिन्यांनी डीजीसीएकडून यासाठी परवानगी मिळू शकते. मग चिपी विमानतळाला अद्याप परवानगी का मिळाली नाही? विकासकाने त्यासाठी अद्याप परवानगी मागितलेली नाही? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आवश्यक लांबीची धावपट्टी, विमान पार्किग सुविधा, नाईट लॅडिग यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा कार्यरत असताना अधिकृतपणे नाईट लँडिग यंत्रणा का सुरु केली जात नाही यासाठी राजकीय नेते, मंत्री यांच्याकडून पाठपुरावा का होत नाही? सिधुदुर्ग विमानतळ हा महाराष्ट्र शासन व एमआडीसीच्या अखत्यारीत आहे. आतातर उद्योग खाते एमआयडीसी हे विभाग उदय सामंत यांच्या मंत्रिपदांतर्गत येतात. त्यांनी याकामी विशेष लक्ष दिल्यास ब-याच समस्या मार्गी लागू शकतील. 

      विकासाची कोटीच्या कोटी उड्डाणे घेण्यात दंग असलेल्या प्रशासनाने या राजकीय नेत्यांनी, प्रशासनातील जबाबदार अधिका-यांनी येथील मुलभूत गरजांकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. बेभरवशाची सेवा, गैरसोयीच्या वेळेतील उड्डाणे, पायाभूत सुविधांची कमतरता, रस्ते व प्रलंबित सुविधा पुरविण्याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यास सिधुदुर्ग विमानतळाला अवकळा येण्यास वेळ लागणार नाही.

 

Leave a Reply

Close Menu