वाचनाच्या प्रेरणेतून साक्षर व सुंदर भारत बनवा

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचेच औचित्य साधून नगरवाचनालय वेंगुर्लातर्फे १५ व १६ ऑक्टोबर रोजी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा मराठे यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार, उपकार्यवाह माया परब, कार्यकारी मंडळ सदस्य राजेश शिरसाट, नंदन वेंगुर्लेकर, ग्रंथपाल गुरुदास मळीक, कर्मचारी किशोर सावंत, पूजा धावडे आदी उपस्थित होते.

      डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हे राष्ट्रपती म्हणून लाभलेले एक वैज्ञानिक होते. त्यांनी अग्निपंखया आत्मचरित्रातून आपला जीवनपट उलगडला आहे. सामान्य माणूस अभ्यासाद्वारे असामान्य होऊ शकतो याची प्रचिती त्यांच्या व्यक्तिमत्वातून समाजाप्रती दिसते. भारतीयांनी वाचनाची प्रेरणा घेऊन साक्षर व सुंदर भारत बनवावा हिच या दिवसाची अपेक्षा असल्याचे उद्गार सीमा मराठे यांनी काढले.

      या ग्रंथप्रदर्शनात वाचनालयाने सन २०२१ व २०२२ या आर्थिक वर्षात खरेदी केलेल्या व दात्यांकडून देणगी मिळालेल्या पुस्तकांसोबत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या व संस्थेतील विज्ञान विषयावरील निवडक ग्रंथ तसेच कथा, कादंबरी, चरित्र, ऐतिहासिक, ज्योतिष, आरोग्य, नाटक, प्रवास, धार्मिक, विद्यार्थ्यांना स्पर्धा-परीक्षांसाठी उपयुक्त ग्रंथांचा समावेश होता.  विद्यार्थी व वाचकांनी या ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन पुस्तकांचे वाचन केले.

 

Leave a Reply

Close Menu