दीपस्तंभ

बीएमसी ची जीप बिल्डिंग खाली थांबते. सगळी चिल्ली पिल्ली खिडकीला नाक लावतात. पोलीस आले की काय पकडायला? पण नाही त्या जीप मधून साध्या वेशातली एक व्यक्ती उतरते आणि थेट आमच्या घरी येते. “अरे ताता!” आजोबा खुष होतात. ताता आम्हाला खाऊ देतात. सगळी चिल्ली पिल्ली दारात उभी असतात. त्यांच्यासमोर आमची कॉलर टाईट. मला आठवते ती अशी आमची पहिली भेट. ताता आजोबा म्हणजे माझ्या बाबांचे काका. पण त्यांना ताता असं का म्हणायचं? तात्या का नाही आणि अहो ताता का नाही? ए ताता का? असे अनेक प्रश्‍न मला नंतर पडले. पण मालवणी लोकांमध्ये असे प्रश्‍न पडत विचारायचे नसतात. एकदा नाव पडलं की पडलं आणि हो, बाबा असो, काका असो नाहीतर आजोबा. अहो नाहीच, सगळे “अरे”च. 

      शिशुवर्गात असताना आम्हाला एक बडबडगीत शिकवलं होतं. “स्वप्नात पाहिली राणीची बाग, हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग.” हे गाणं शिकल्यापासून राणीची बाग बघायची उत्सुकता मला लागून राहिली. “बाबा चला ना राणीबाग बघायला” आम्ही टुमणं लावलं. शेवटी  बाबांनी एकदाचं राणीबागेत नेलं. माझी आणि बबलूची केवढी धावपळ, पाण्याची बाटली घे, कॅप घे. राणीच्या बागेतले वाघ, सिंह, हत्ती बघून आम्ही खूप खूष झालो.पण उन्हात फिरून फिरून लागली भूक. तेव्हा आम्हाला बाबांनी तिथून जवळच ताता आजोबांच्या घरी नेलं. तिथे नानी आजीच्या हातच्या आंबोळी आणि चटणीवर ताव मारताना आम्ही तातांना अनेक प्रश्‍न विचारले. तुम्हाला वाघाची डरकाळी ऐकून भीती नाही वाटतं का? कधी तिथली हरणं सुटून इथे येतात का? राणी बागेजवळ घर म्हणजे किती मज्जा आहे आजोबांची!! मला वाटायचं. आमच्या मैत्रिणींसमोर आम्ही खूप भाव खात असू त्यावरून. आज जेव्हा राणीबागेसमोरून जाते तेव्हा सगळं बदललेलं असतं. ओळखीच्या खाणाखुणा गायब असतात. तरी अजूनही मन आजोबांचं घर आणि लहानपणीचे दिवस यांच्यात हरवून जातं.

      हळू हळू मला समजलं की, आमच्या घरात ताता आजोबांबद्दल खूप आदराने बोललं जातं. त्यांचा शब्द अंतिम मानला जातो. कारण ताता हे आमच्या घरातून मुंबईत नोकरी करायला आलेले पहिले. त्यांना बीएमसीमध्ये नोकरी लागली. हे राणीबागेजवळचं घर मिळालं. त्यामुळे गावावरून जो कोणी नोकरीसाठी, शिक्षणासाठी येई त्याची व्यवस्था लागेपर्यंत सगळ्यांना ताता आणि नानीने छप्पर दिलं. त्यांना खाऊ पिऊ घातलं. कित्येकांना नोकरी सुद्धा लावली, कित्येकांच्या लग्नाची बोलणी केली, जमिनीचे वाद सोडवले. आजोबांच्या घराने घरगुती कार्यक्रमापासून गावच्या विहिरी, पायाभरणी पर्यंत सगळ्या चर्चा ऐकल्या. आजोबांचं घर म्हणजे आमच्या कुटुंबाचं जणू हेड क्वार्टर्सच होतं.

      ताता मला अधिक उलगडत गेले ते बाबांच्या आणि त्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे. माझे बाबा पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्यातून मॅट्रिकच्या परीक्षेत पहिले आले होते. आपल्या या पुतण्याची हुशारी आणि शिकण्याची जिद्द बघून त्यांना आपल्या घरी शिकण्यासाठी नेले. त्या वेळची आठवण बाबा सांगायचे, “नानी मोरी मटण एकदम बेस्ट बनवायची. मी एवढा जेवायचो एवढा जेवायचो की दोन्ही हात धरून मला ताता आणि नानी उचलायचे.” बाबा ताता आणि नानीचे फारच लाडके होते.

      पुढे तातांनी बाबांना रुपारेल महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला आणि सोबत नोकरी करण्याचा व्यवहारिक सल्लाही दिला. तेव्हापासून बाबांसाठी ताता म्हणजे मानसपिताच होते. बाबांची स्ट्रगल त्यांनी जवळून पाहिली. बाबांना बराच काळ कुटुंबातील व्यक्तींच्या आरोप प्रत्यारोपांना सामोरं जावं लागलं. मनस्ताप सहन करायला लागला. सगळ्यांचं सगळं करून सुद्धा आपल्याच कुटुंबाने आपल्याला खोटं ठरवलं. वाळीत टाकलं. हे कविमनाच्या, संवेदनशील बाबांना सहन होणारं नव्हतं. ते डिस्टर्ब असायचे. हातून काही लिहून व्हायचं नाही. सतत गावचे, घराचे, जमिनीचे विचार, बाबा अबोल असायचे. अशी कुचंबणा होत असताना तातांनी पाठीवर हात ठेवला. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. कायद्याचं जे काही ज्ञान त्यांना होतं त्याला धरून आपल्या अनुभवाने बाबांना समजुतीचे चार सल्लेही दिले. ‘या गोष्टी होतच राहणार. तू डगमगू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे’ हा विश्‍वास त्यांनी दिला. मनात जेव्हा जेव्हा द्वंद्व निर्माण होईल तेव्हा तेव्हा बाबा वडिलधाऱ्या, अनुभवी, तज्ञ अशा तातांशी बोलून मोकळे व्हायचे. आता त्यांचं लिखाण अव्याहत सुरु झालं. त्यांनी नाटकं लिहिली, एकांकिका लिहिल्या. कविता केल्या, लेख लिहिले. प्रत्येक वेळी बक्षीस मिळालं, नाव पेपरमधे आलं की कधी एकदा तातांना सांगतो आणि हक्काची कौतुकाची थाप पाठीवर पाडून घेतो असं व्हायचं त्यांना. तातांनाही आपल्या पुतण्याचा सार्थ अभिमान होता. घरातले वाद सुरूच होते. पण आता तातांच्या भक्कम पाठिंब्यामुळे बाबांनी मागे वळून पाहिलं नाही. INT तर्फे दशावताराचा अभ्यास त्यांनी सुरु केला. त्यातच डॉक्टरेट मिळवावी असं त्यांनी ठरवलं. बाबांचं प्रबंधाचं लिखाण सुरु झालं. हा पोरगा जे काही करतोय त्यामुळे आपल्या घराण्याचं नाव उज्ज्वल होणार आहे हे तातांसारख्या दूरदृष्टी असलेल्या माणसाच्या कधीच लक्षात आलं होतं. म्हणूनच ते नियमितपणे बाबांना फोन करून त्यांची मनस्थिती ठीक आहे ना याची काळजी घेत. बाकी बाबांची लेखणी दैदिप्यमान कार्य करेल यावर त्यांचा बाबांपेक्षा जास्त विश्‍वास होता. बाबांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली. मुंबई विद्यापीठाकडून त्यांना सर्वोत्कृष्ट प्रबंधाचं बक्षीसही मिळालं. ताता खूप खुश झाले. ताता आणि नानींनी बाबांसाठी एक कौतुक सोहळा ठेवला. बाबांचं आणि त्यांना साथ दिल्याबद्दल आईचं तोंड भरून कौतुक केलं. बाबांचे डॉक्टरेट घेतल्यावर ऑफिसमध्ये, समाजामध्ये, नाटकांच्या ग्रुपमध्ये एवढे सत्कार झाले पण ताता नानींकडून झालेलं कौतुक त्यांच्यासाठी खूप खूप मोठं होतं. आमच्यावर जेव्हा संकटं आली, निर्णय घ्यायची वेळ अली तेव्हा बाबाही बुद्धिवादी, पुरोगामी विचारसरणीने वागले. कदाचित हे पुरोगामीत्व त्यांनी तातांकडूनच घेतले असेल. बाबांसाठी ताता काय होते हे त्यांनी आम्हाला कधी सांगितलं नाही .कदाचित सांगण्या बोलण्या पलीकडचं मैत्र त्या दोघांमध्ये असावं.

      आम्ही गावी गेलो की जैतिराच्या देवळात जा किंवा सातेरीच्या किंवा शिवाजी हायस्कूलला जा. देणगीदारांच्या नावांमध्ये लवू रामचंद्र बेहेरे हे नाव सगळ्यात वर.

      तातांनी गावच्या मातीचे उपकार नेहमी मानले आणि तिच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला. एकूणच त्यांची साधी राहणी उच्च विचारसरणी बघता त्यांनी त्यांच्या पैशानी सोनं नाणं, प्रॉपर्टी केली नाही, पण दानधर्म मात्र खूप केला. आपण कमावलेला पैसे गावच्या विधायक कार्यात खर्च व्हावा हा सुधारकी विचार करणारे ताता म्हणजे आमच्या घराण्याचं भूषणच होतं.

      ते तुळस जैतिराश्रीत संस्थेचे सल्लागार होते. तुळस गावची एकमेव शाळा शिवाजी हायस्कूलसाठी निधी उभा करण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. गावातल्या प्रत्येक मुलाने आणि मुलीने शिकून स्वतःच्या पायावर उभे राहावे ही त्यांची तळमळ होती.

      ते देवभोळे कधीच नव्हते. त्यांनी व्रतवैकल्य केली नाहीत किंवा आपल्या देवाला हे चालतं ते नाही अशा अंधश्रद्धामधे ते अडकले नाहीत. पण जेव्हा जैतिराच्या देवळाच्या जीर्णोद्धाराची वेळ आली तेव्हा मदत करणारे ते पहिले होते.

      आजोबांच्या कामाकडे मागे वळून पाहताना असं वाटत की, काही लोक आपल्या कुटुंबासाठी झटतात. काही एक्सटेंडेड फॅमिलीसाठी. पण असा एखादाच ताता असतो जो काळाच्या पुढे जाऊन विचार करतो. आणि पूर्ण गावाला आपल्यासोबत पुढे घेऊन जातो. तातांचे तुळस गावावरचे ऋण कधीही न फिटणारे आहेत.

      आजोबांना तुळस गावात सल्लागार म्हणूनच ओळखलं जातं. कारण त्यांच्यासारखा अनुभवी, जमिनीच्या कायद्याचं ज्ञान असलेला माणूस शोधूनही नाही सापडायचा. तातांची वाणी शुद्ध. त्यांना मालवणीत बोलताना मी कधी ऐकलं नाही. शहरातली सोफेस्टीकेटेड भाषा आणि त्याला साजेसं राहणीमान त्यांनी स्वीकारलं. त्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे वाटायचे. कधी त्यांच्या वाणीतून अपशब्द  नाही की रागीटपणा नाही. एखाद्या तत्त्ववेत्यासारखा बुद्धिवादी, सारासार विचार करून दूरदृष्टीने त्यांनी आपले मत मांडलेले असे. त्यात स्वतःच्या अनुभवातून आलेलं शहाणपणही असे आणि दुसऱ्याला पटवून देण्याची खुबीही. त्यांचे सुधारकी, व्यवहारिक, पुरोगामी विचार पचायला जड वाटायचे. पण पुढे जाऊन तेच आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहेत ह्याची खात्री असे. त्यामुळे समोर बसलेला स्वतःशी काही निर्णय घेऊनच उठे. गावातल्या लोकांची आपापसातील भांडणं, जमिनीचे वाद, हिस्से, वाटण्या आजोबा इथे बोरिवलीत त्यांच्या घरी बसून सोडवायचे. ताता आजोबा म्हणजे गाववाल्यांचं हक्काच माणूस.

      मला नेहमी हा प्रश्‍न पडायचा की पुरोगामी विचार आजोबांनी  कुठून घेतले, कारण आमच्या घरात कर्मठ लोकं मी पहिली होती. पण ताता वेगळे कसे घडले, किंबहुना तुळस नावाच्या छोट्याशा खेड्यात त्या काळी शिक्षणाचा प्रचार झालेला नसताना त्यांनी त्यांचा वैचारिक वारसा कुठून घेतला. विधायक कार्य करण्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळाली? विचारायचं राहून गेलं. आमच्या समोर आले ते सर्वांना सांभाळून घेणारे समजूतदार, विवेकी, विचारी, अनुभवी ताता.

      वयाच्या 94 वय वर्षी हा सुदृढ, निरोगी, समजूतदार प्रवास संपला. ताता गेले. शांतपणे, समाधानाने.. बाबांशी जोडणारा एक धागा तोही तुटला आता. मागे वळून बघताना विचार करते की, ताता आमच्यासाठी काय होते.. ते होते दीपस्तंभ.. अज्ञानाच्या, हेव्यादाव्याच्या अंधारात आपल्या विचारांनी आम्हाला दिशा दाखवणारे कुसुमाग्रजांची कविता आठवते मला ह्यावेळी,

“किरणांचा उघडून पसारा देवदूत कोणी काळोखावर खोदत बसला तेजाची लेणी”

-तन्मयी तुळशीदास बेहेरे

Leave a Reply

Close Menu