सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जिल्हास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ चा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 6 जून रोजी कुडाळ येथे झाला. या प्रसंगी केंद्रीय सूक्ष्म लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, क्रीडा व युवक कल्याण, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सर्वश्री आमदार भारत गोगावले, रविंद्र फाटक, नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल आदी उपस्थित होते.

      मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मालवणी बोलीतून आपल्या भाषणाची सुरुवात करून उपस्थितांची मने जिंकली. एकाच छताखाली लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजनांसाठी 679 कोटी रुपयांना मान्यता दिली आहे. यात प्रामुख्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इमारत बांधकाम, मिठबांव-गजबा देवी मंदिर परिसर, सिंधुरत्न समृध्द योजना, बॅ. नाथ पै स्मारक यांचा समावेश आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ कसा देता येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. विकास असा झाला पाहिजे की, जगाला हेवा वाटला पाहिजे, असा संकल्प करुया, असेही मुख्यमंत्री शेवटी म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थीना प्रातिनिधिक स्वरुपात शासन योजनांच्या लाभाचे प्रमाणपत्र, वाहनांच्या चाव्या, धनादेश वितरीत करण्यात आले.

          जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी प्रास्ताविकात विविध योजनांमधून देण्यात येत असलेल्या लाभाची माहिती दिली. प्रारंभी मुख्यमंत्री राज्य जन कल्याण कक्षाचे समन्वयक डॉ. अमोल शिंदे यांनी योजनादूत आणि शासन आपल्या दारी बाबत माहिती दिली. शेवटी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Close Menu