चित्रकला स्पर्धेत कोमल परब तर स्लोगनमध्ये तेजस्वी शिदे प्रथम

    भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाचे  नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे दोन दिवशीय जलसंवाद कार्यशाळा घेण्यात आली. राष्ट्रीय जल मिशन अंतर्गत कॅच दी रेन ३.० नुसार जेव्हा पाऊस पडेल, जिथे पडेल, जसा पडेल त्या पाण्याचे संवर्धन करणे,त्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यासाठी संपूर्ण भारतभर असे उपक्रम सुरू आहेत. वेंगुर्ला येथील या कार्यशाळेचे उद्घाटन प्रा. वैभव खानोलकर यांनी केले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा.सचिन परुळकर, संजय पाटील, महेश राऊळ, दशावतार कलावंत शाम जाधव, रितिका मेस्त्री, ओंकार राऊळ आदी उपस्थित होते. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी प्रा. खानोलकर यांनी पावसाच्या पाण्याचे महत्त्व, पाण्याचे स्रोत, उपलब्ध जलसाठा आणि भविष्यातील परिस्थिती याविषयी मार्गदर्शन केले. तर प्रा.बी.टी.खडपकर यांनी पाणी टंचाईचे आव्हान, त्यावरील उपाय व त्यासाठी घेण्यात येणारी काळजी यासाठी युवा वर्गाने पुढे येऊन कार्य करावे असे आवाहन केले, तर डॉ.मिलन नाईक यांनी मानवी जीवनासाठी पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करताना जल है तो कल हैयाविषयी युवकांना मार्गदर्शन केले.

    कार्यशाळेच्या दुस­-या दिवशी बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एम.बी.चौगले यांनी पाण्याचे राष्ट्रीयकरण, आंतरराष्ट्रीय स्तरावर पिण्याच्या पाण्याची स्थिती, पाणी अडवण्याचे तंत्र आणि पाण्याच्या दुर्भिक्षामुळे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम विशद केले. कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरमचे जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ यांनी भौगोलिक दृष्टिकोनातून मनुष्याचा चुकामुळे पर्यावरणाचा ­हास कसा होत आहे आणि पाण्याअभावी प्राण्यांची होणारी अहवेलना आणि त्यासाठीचे उपाय याविषयी विद्यार्थ्यांना संवेदनशील असे मार्गदर्शन केले.

          या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी जल है तो कल हैयावर जिल्हास्तरीय चित्रकला तर पाण्यावर स्लोगन लेखन स्पर्धा घेण्यात आली. चित्रकला स्पर्धेत प्रथम-कोमल परब (वेंगुर्ला), द्वितीय-किर्ती तळकटकर (मळगांव), तृतीय-दिक्षा पालकर (पाल), उत्तेजनार्थ-वासुदेव धुरी (आसोली), किजल नार्वेकर (उभादांडा), करण करंगुटकर (वेंगुर्ला), श्रद्धा जाधव (गोवेरी) यांनी तर स्लोगन लेखन स्पर्धेत प्रथम-तेजस्वी शिदे (बोर्डवे), द्वितीय-पी.एस.कौलापुरे (शिरोडा), तृतीय-राशी सतोसे (कुडाळ), उत्तेजनार्थ-दिव्या साटेलकर (वेंगुर्ला) व दिक्षा पालकर (वेंगुर्ला) यांनी क्रमांक पटकाविले. चित्रकला स्पर्धेचे परिक्षण चित्रकार गणेश कुंभार व कृष्णा सावंत यांनी तर स्लोगन लेखन स्पर्धेचे परिक्षण संजय पाटील यांनी केले. आभार ओंकार राऊळ यांनी मानले.

 

Leave a Reply

Close Menu