संकल्प सिद्धीचा ब्रह्मर्षी

अनंत हस्ते कमलाकराने बहाल केलेले निसर्गसौंदर्य म्हणजेच दाभोलीगाव. वेंगुर्ला शहरापासून ३ कि.मी. अंतरावर वसलेले, वायंगणीमधील अथांग सागर जणू अरबी समुद्राचे यथावचीत दर्शन घडविणारे व उत्तरेकडील छोट्याछोट्या पर्वत रांगांमध्ये विराजमान झालेले. नारळ, काजू, आंबे तसेच भात शेती व मासेमारी या व्यवसायात रममाण असणा­या कष्टकरी लोकांनी विलोभनीय बनविलेले हे गाव मात्र शिक्षण, वाहतुकीची साधने व वीज यापासून थोडे दूरच राहिले होते.

      या गावामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या दिवाळी जत्रौत्सवांच्या शुभ मुहूर्तावर सन १९३७ साली एक बाळ जगन्नाथ व लक्ष्मीबाई यांच्या कुशीत जन्माला आले. त्यांनी त्याचे नाव शशिकांतअसे ठेवले. पण पुढे बाळम्हणूनच प्रसिद्ध झाले. गावाने त्यांना भरभरुन प्रेम दिले व त्या बाळानेही त्यांच्या प्रेमाची उतराई आपल्या पुढील आयुष्यात आपल्या कर्तृत्वाने केली.

      जन्मतः आपले काका वसंतराव जनार्दन दाभोलकर यांच्या समाजकार्याची स्फूर्ती डोळ्यांनी पाहात पाहात तिच उर्मी आपल्या कप्प्यात साठवून ठेवत तसेच आपल्या काकांनी पैसा पैसा लोकवर्गणीतून दाभोली इंग्लिश स्कूलही महाकाय वास्तू उभारून दाभोली आणि जवळच्या गावातील माध्यमिक शिक्षणाची गैरसोय दूर केली हे पाहून आपणही आपल्या काकांसारखे व्हावे असा मनाचा निर्धार करूनच बाळने प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून तारुण्यात पदार्पण केले. हा काळ म्हणजे मौजमजेचा, पण ह्या गोष्टींकडे लक्ष देणारे बाळ नव्हते. नावातच शशीअसल्याने चंद्राच्या कलाप्रमाणे वाढणारे.

      कुटुंबातील मध्यमवर्गीय स्थिती त्यांच्या कार्यामध्ये फार काळ अडथळा आणू शकली नाही. माध्यमिक शिक्षकी पेशा धारण करून जीवन चरित्राला सुरुवात करून राहिलेल्या वेळात सामाजिक कार्यात झोकून दिलेल्या अवलियाला बघता बघता वेंगुर्ला तालुकाच नव्हे तर जिल्ह्यातीलही लोक ओळखू लागले ते त्यांच्या अचाट सामाजिक कार्याने. वयाच्या तिसाव्या वर्षी समाजकार्यात झोकून दिलेला बाळ फक्त संसारात रममाण न होता, शिक्षकी पेशा, संसार आणि समाजसेवा या तिहेरी भूमिकेत रममाण झाला. प्रपंच साधून परमार्थाचा लाभ घेणारा हा ब्रह्मर्षी अगदी नव्वदीच्या दशकापर्यंत आपले गाव, तालुका तसेच जिल्ह्यात उपयुक्त असलेली लोकोपयोगी कार्ये करीतच राहिला. आपण केलेल्या कार्याची पोचपावती मिळावी हा त्यांचा कधीच हेतू नव्हता.

      १९५७-५८ साली फिल्म उद्योगात काम करणा­या रमाकांतनावाच्या सरांच्या चुलत भावाने आपल्या वरिष्ठ फिल्म संकलक दत्ता कोठावळे यांच्या आईचे नातेवाईक श्री.भिडे इंजिनियर यांच्या ओळखीने मुंबई भायखळा येथील ७ सांखळी रोड येथील गरवा­यांच्या प्लास्टीक फॅक्टरीत महिना ४० रुपये मेहनतान्यावर नोकरीला लावले. प्राथमिक अवस्थेत प्लास्टीकची उत्पादने व फॅक्टरीचे रॉ मटेरीयल लॉरीत चढवणे-उतरणे असे कामाचे स्वरुप होते. तरीही गरिबीमुळे ते काम त्यांनी खुशीने स्वीकारुन दरमहा २० रुपयांची मनिऑर्डर गावी असलेल्या आई व सहा भावंडांसाठी ते पाठवायचे.

      कालय तस्मै नमः। हेही नियतीला पहावले नाही की काय? वडील दीर्घ व गंभीर आजारी पडल्याने ते रोजगार सोडून गावी आले. मागता येत नाही भीक तर मास्तरकी शिकया उक्तीप्रमाणे सरांच्या वसंत काकांनी त्यांना शिक्षण खात्यात नोकरीला लावले. प्रथमतः शिक्षकी पेशांत नाराजी असलेले सर सहशिक्षकांच्या उत्तम मार्गदर्शनामुळे आणि ७-८ कि.मी. लांबून चालत येणा­या गरीब मुलांच्या जीवनाशी व त्यांच्या कुटुंबियांशी प्रत्यक्ष प्रत्येकाच्या घरी जावून त्यांच्या जीवनाशी समरस कधी झाले हे त्यांचे त्यांनाही कळले नसावे. कारण यातूनच त्यांच्या सामाजिक पर्वाला प्रारंभ झाला.

      १९७० ते १९७५ साल म्हणजे दाभोली इंग्लिश स्कूल दाभोली या शाळेचा सुवर्णकाळ, कारण या शाळेने आपला माध्यमिक शालांत परीक्षेचा उत्तीर्ण निकालाचा आलेख वर वर नेला. त्यांच्यातलाच एक शिक्षक जणूकाही हेडमास्तरांची भूमिका बजावताना पाहायला मिळायची. त्यांचे असंख्य विद्यार्थी आजही त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीची व विद्यार्थ्यांमध्ये मिसळून जाण्याच्या गुणांची आठवण काढतात. मीही त्यांच्यातलाच एक विद्यार्थी. मुंबईत वास्तव्य करीत असताना अनेक त्यांचे विद्यार्थी त्यांची थोरवी गाताना पाहतो व कृतार्थ होतो की हे शिक्षक मला सतत चार वर्षे माझ्या शैक्षणिक जीवनात लाभले. त्यांचे कार्य वाचण्याची व हृदयाच्या कप्प्यात जतन करून  ठेवण्याची प्रबळ इच्छा बाळगणारे त्यांचे विद्यार्थी त्यांना गळ घालू लागले की, ‘सर आम्हाला तुमच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती द्या.कित्येक वर्षांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपल्या कामाचा तपशील आम्हा विद्यार्थ्यांसमोर ठेवला. जणू त्यांचे आत्मचरित्रच असावे असे वाटते. त्यांनी आपल्या कार्याची फाईलच आमच्या पुढे ठेवली. लेखविस्तार भयास्तव थोडक्यात त्यामध्ये कुडाळ-वेंगुर्ला-दाभली मार्गे एस.टी. सुरू, एस.टी.डेपो, पाचल व कोचरा येथे मुंबई गाडीचे रिझर्व्हेशन व्यवस्था, सायन, चेंबूर, घाटकोपर स्टॉप मंजूर, भोगवे बारमाही गाडी सुरू, ठाणा-वेंगुर्ला गाडी पणजीपर्यंत कायम स्वरूपी, गर्दीच्या हंगामात स्थानकावर किमान जादा गाडीची सोय, एलफिस्टन मुंबई येथे स्थानक व डेपो मंजूरी, वेंगुर्ला-सुरंगपाणी एसटी सुरू, आंबली स्थानक, अणसूर पाल, मठ स्वयंभू मंदिर ते हरिजनवाडी, दाभोली, वायंगणी, वायंगणी पस्ट कार्यालय, शिरोडा रुग्णालय या ठिकाणी विद्युत पुरवठ्याची सय केली. वेंगुर्ला न.प.ला रस्ते पक्के करण्यासाठी खास अनुदान मिळवून देण्यात त्यांचा वाटा हता. बी अॅण्ड सी उपविभाग सुरू, .बी.सी. मर्यादेत वाढ करवून घेतली. मोचेमाड, रेडी, अणसूर, केळुस, दाभोली, सुरंगपाणी, तेंडोली, नेरुर पार येथील पूलांच्या बांधकामासाठी यशस्वी प्रयत्न केले. तसेच रेडी मालवण रस्ता करून घेण्याबरबरच वेंगुर्ला-सावंतवाडी-तुळस, दाभोली-वेतोरे, दाभोली-तेंडोली, वायंगणी, लोखंडेवाडी, आंबोली-आजरा-कोल्हापूर आदी रस्ते डबरीकरण करून घेतले. रेडी पुलाचे जोडरस्ते व वायगणी फूटब्रीज बनवून घेतला. त्यांची कार्य तत्परता, कामाचा पाठपुरावा करून पूर्ण केलेली कामे वाचून कोणीही अचंबीत झाल्याशिवाय राहाणार नाही.

     आज सरांनी वयाची ८६ वर्षे पूर्ण केली. पण आजही त्यांना भेटल्यानंतर आम्हा विद्यार्थ्यांसमोर भितीयुक्त आदरच उभा राहातो. १९६७ ते १९९० असा हा कार्य चित्रपट वाचताना या कार्यात प्रत्येक वेळी यशाची पायरी गाठणे त्याकाळी एवढे सोपे नव्हते. केवळ एस.टी.नेच नियोजित कामाचा पाठपुरावा करणे म्हणजे जिकरीचे काम. पण सरांनी या कार्याचा लेखाजोखा अहवालच वाचकांसमोर सादर केला आहे. गगनाला गवसणी घालण्यासाठी माणसे आभाळाएवढी जन्माला येत नसतात तर ती गगनाला गवसणी घालूनच आपल्या कार्य कर्तृत्वाने आभाळाएवढी होतात.

शब्दांकन- जगन्नाथ द. शिरोडकर,

 दाभोली/मुंबई. माजी विद्यार्थी.

 

Leave a Reply

Close Menu