जादू ट्रंपेटची

       अलीकडेच वेंगुर्ल्यात मधुसूदन कालेलकर सभागृहाच्या भव्य स्क्रीनवर ‘नाचूया कुंपासार’ हा कोकणी चित्रपट पाहण्याचा योग आला. तब्बल वीस गाणी असलेला हा कोकणी चित्रपट त्याच्या कथेतून आणि संगीतातून 1960 ते 70 च्या काळात घेऊन गेला. एकूण तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला हा चित्रपट बेस्ट कोकणी फिल्म, बेस्ट प्रोडक्शन आणि लीडिंग लेडी अशा पुरस्काराचा मानकरी ठरला. दिग्दर्शक बारड्रॉय बॅरोटो. यातील प्रमुख कलाकार पौलोमीं घोष, विजय मौर्या आणि जॉन डिसिल्वा.

      ज्या काळात म्हणजे 1960 च्या दिवसात मुंबईत मध्यरात्री क्लब हाऊस मधून संगीत सुरू व्हायचे त्यात jazz चा पगडा असलेले गोवन संगीत चांगलेच फोफावू लागले होते. ट्रंपेट या वाद्याचं वर्चस्व असलेले धुंद करणारे संगीत अंगा अंगात भिनू लागायचं. त्या काळात लॉर्ना ही गायिका टॉप वर होती आणि संगीतकार होता क्रिस पेरीस. लॉर्ना आणि क्रिस ही जोडी माहीत नसलेला एकही ‘गोयकार’ तुम्हाला सापडणार नाही. या चित्रपटाची कथा ही थोडीशी लॉर्ना आणि क्रिसच्या प्रेम कथेशी मिळती जुळती. नायिका गोव्यातील हौशी गायिका आणि शाळकरी मुलगी आहे. मुंबईहून संगीतकार गायिकेच्या शोधात गोव्यात येतो. शिक्षणाला रामराम ठोकून नायिका गायिका होते आणि त्या प्रवासात ती संगीतकाराच्या प्रेमात पडते. संगीतकाराचे मात्र लग्न झालेले असते. जेव्हा तिला हे कळतं तेव्हा तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो. खूप दुःखात होरपळलेली नायिका मात्र संगीतकाराशी केलेल्या करारानुसार गात राहते आणि गातच राहते. अभिनेत्री पौलोमी घोषचा उत्कृष्ट अभिनय तसेच कोकणी भाषा शिकून तिने त्या चित्रपटात गायलेली दोन गाणी आणि बारड्रॉय बॅरोटो याने केलेले मनस्वी दिग्दर्शन ही या चित्रपटाची उजवी बाजू आहेच, पण विजय मौर्यासारख्या सध्याच्या दिग्दर्शकाने या चित्रपटात नायकाची व्यक्तीरेखा खूपच मनापासून रंगवलेली आहे. मराठीतल्या राक्षस चित्रपटाचा दिग्दर्शक तो हाच. चित्रपटाच्या अनुषंगाने कथेची नायिका जशी गाण्याला उराशी कवटाळून आयुष्य घालवते तसंच काही वास्तवात आज वयाची 80 पार केलेली लॉर्ना मुंबईत उर्वरित आयुष्य घालवत आहे तर क्रिस्‌ पेरी 2002 ला मडगावला मृत्यू पावला. ‘मॅन विथ द गोल्डन ट्रंपेट’ असे ज्याचे वर्णन केले जाते त्या क्रिस पेरीला गोवा सरकारने गोव्यातील फातोर्डा येथील एका रस्त्याला नाव देऊन कायम स्मरणात ठेवले आहे. लॉर्ना आणि क्रिस पेरीच्या गाजलेल्या गाण्यांचे पुनर्निर्माण करून या चित्रपटात समावेश केला आहे. यो बाईले यो, सोरो माका जाय पयलो,  काय बरे हे बँड वाजता,  किते हाव केले मोगान्‌ पडून.., लेसबोवा.. अशी एक ना दोन तब्बल वीस गाणी ऐकायला मिळतात. 1960 ते 70 या दशकात मोरारजी देसाईनी मुंबईतील रात्रीचे चालणारे संगीत क्लब बंद केले आणि या क्लबमधून गाणाऱ्या आणि वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांची मात्र परवड झाली. त्यात जे नामवंत होते ते हिंदी फिल्म दुनियेत सामावले गेले. त्यातील काही नावे बघायची झाली तर ‘चिक चॉकलेट’ नावाने प्रसिद्ध असलेला अँटेनीओ वाज्‌. 1916 मध्ये अलदोनामध्ये जन्मलेला कलाकार सी रामचंद्र संगीतकाराला साथ करू लागला. ‘ओ गोरे गोरे ओ बाके छोरे’, ‘शोला जो भडके दिल मेरा धडके….’ यासारखी अनेक गाणी त्याने कंपोज केली होती. शेवटी संगीतकार मदन मोहन यांना सुद्धा त्याने साथ केली होती. दुसरे नाव घेता येईल ते सेबेस्टीन डिसोजा हा हिंदीतला प्रसिद्ध अरेंजर 1906 मध्ये गोव्यात रोस्‌ मोगास इथे जन्मलेला सेबेस्तिन्‌ डिसोजा याला ‘काउंटर मेलडी’ चा जनक म्हटले जाते. आवारा हू…. या गर्दीश्‌ मे हू आसमान का तारा हू , मेरा जूता है जपानी , मेरा नाम चीन चीन चू , ए मेरे दिल कही और चल…. अशी अनेक हिंदी गाणी याशिवाय अनेक प्रसिद्ध हिंदी गाण्यांमध्ये व्हायोलिन वाजवणारे सेबेस्टीन डिसोजाना संगीतकार अनिल मोहिले आपले गुरू मानतात. आणखी एक नाव घेता येईल ते म्हणजे अँथनी गोन्साल्वीस. गोव्यात जन्मलेले एँथोनी प्रभू गोन्साल्वीस हे गाजलेले संगीत शिक्षक आणि व्हायोलिन वादक तसेच संगीतकार प्यारेलाल यांचे गुरू. 1943 मध्ये नौशाद संगीतकाराला सहाय्यक म्हणून काम करताना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याबरोबर संगीत दुनियेत त्यांचं चांगलं सख्य जुळलं. ‘नया दौर’, ‘वक्त’, ‘दिल्लगी’, ‘हकीकत’ अशा चित्रपटांसाठी त्यांनी काम केलं. प्यारेलालजीनी “माय नेम इज अँथनी गोंसाल्वीस“ या गाण्याने आपल्या या गुरूला आदरांजली वाहिली. 1965 मध्ये त्यांनी सिनेमा जगत सोडले आणि न्यूयॉर्कला गेले त्यानंतर ते तिथून गोव्यात मडगाव नजीक माजोर्डा या गावी स्थायिक झाले. पुढे 2012 मध्ये त्यांचा देहांत झाला. आजच्या या लेखाला निमित्त झालेले ख्रिस पेरी हे संगीतकार आणि कोकणी गीतकार ज्याने अनेक संगीतकारांकडे ट्रंपेट, गिटार, सेक्सोफोन, पियानो ही वाद्ये वाजवली परंतु श्रेय नामावलीत नाव दिसेपर्यंत प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर गेलेले असायचे. त्यामुळे ही आमची गोव्यातली दिग्गज मंडळी पडद्याआडच राहिली. ‘नाचूया कुंपासार’ या चित्रपटामुळे या आठवणींना उजाळा मिळाला. हा चित्रपट वेंगुर्ल्यात दाखवल्याबद्दल ‘मीना कन्स्ट्रक्शन’ चे बेंजामिन डिसोजा या माझ्या मित्राचे खूप खूप आभार.

 – प्रा. सुनील नांदोसकर, 9869540943

Leave a Reply

Close Menu