जीएंना अनोखी आदरांजली – जागर अभिवाचनाचा

“मराठी कथा साहित्यातील मानदंड आणि जागतिक साहित्यात ज्याचे नाव अभिमानाने घ्यावे असा हा आमचा मराठी साहित्यिक.” श्री. गंगाधर गाडगीळ यांनी जीएंचा असा गौरव केला आहे. ज्येष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता 10 जुलैला झाली. त्यानिमित्ताने जी.ए. शताब्दी संस्मरण 11 डिसेेंबर म्हणजे त्यांच्या स्मृतीदिनापर्र्यंत, 6 महिने त्यांच्या कथांचे वाचन करून संपन्न होणार आहे. ही संकल्पना ज्येष्ठ रंगकर्मी उदय पंडीत यांची आहे. दर महिन्याला तीन अभिवाचक जी.ए. यांच्या तीन कथांचे अभिवाचन करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 6 पुरुष आणि 12 स्त्रिया हे अभिवाचन करणार आहेत. अभिवाचन चालू असताना शिरगाव येथील ज्येष्ठ रंगकर्मी आणि चित्रकार डॉ. राजेेंद्र चव्हाण कथा ऐकत असताना या कथांमधील भावपूर्ण रेखाटलेली शब्दचित्र स्क्रीनवर प्रदर्शित करणार आहेत. ज्याची सुरुवात जीएंच्या जन्मदिनी म्हणजे 10 जुलै रोजी कणकवली-हळवल येथील निलायम-दी ब्ल्यू बॉक्स इथून झाली. या जागरात वर्षा वैद्य यांनी ‘लक्ष्मी’, अंजली मुतालिक यांनी ‘बाधा’ तर उदय पंडित यांनी ‘दीपस्तंभ’ तर 12 जुलै रोजी कुडाळ हायस्कूलमध्ये सीमा मराठे यांनी ‘माकडाचे काय, माणसाचे काय?’, डॉ. गुरुराज कुलकर्र्णी ‘पुनरपी’, वर्षा वैद्य यांनी ‘लक्ष्मी’ या कथांचे अप्रतिम अभिवाचन केले.

      यात जीएंच्या 9 कथासंग्रहांतील 18 कथांचे अभिवाचन प्रत्येक महिन्याच्या 11 ऑगस्ट, 10 सप्टेंबर, 11 ऑक्टोबर, 11 नोव्हेंबर व 11 डिसेंबर 2023 या तारखांना सायंकाळी 6 वाजता हळवल येथील निलायम-दी ब्ल्यू बॉक्स येथे होणार आहे. कुडाळ हायस्कूल कुडाळ हॉल नं.1 येथे 12 ऑगस्ट, 11 सप्टेेंबर, 14 ऑक्टोबर, 18 नोव्हेेंबर, 17 डिसेेंबर या दिवशी तर तरळे येथे 16 जुलै, 13 ऑगस्ट, 9 सप्टेेंबर, 15 ऑक्टोबर, 12 नोव्हेेंबर, 10 डिसेेंबर या कालावधीत होणार आहे.

      जीएंच्या पारवा, हिरवे रावे, पिंगळावेळ, सांजशकुन, रमलखुणा, रक्तचंदन, काजळमाया, निळासावळा व डोहकाळीमा या प्रत्येक कथासंग्रहातील दोन कथा सादर केल्या जाणार आहेत. प्रसाद घाणेकर, वर्षा सामंत-वैद्य, तृप्ती राऊळ, नीलेश पवार, ज्योती पंडित, कल्पना बांदेकर, डॉ. नीलेश कोदे, ज्योती तोरस्कर, सीमा मराठे, संजय शिंदे, पूजा सावंत, अंजली मुतालिक, डॉ. गुरुराज कुलकर्णी, देवी केळुसकर, कल्पना मलये, वामन पंडित, ॲड. अपर्णा परांजपे-प्रभू, माधवी शिरसाट हे अभिवाचक असणार आहेत. यासाठीची संकल्पना उदय पंडित (9422054744) यांची असून अधिक माहितीसाठी त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Close Menu