शाळांतील रिक्त पदांमुळे मुलांचे अतोनात नुकसान!

     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत सुमारे 1150 शिक्षक पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांची आबाळ होत असून प्रचंड मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. ही समस्या कोकण विभागात येणाऱ्या रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यासारख्या जिल्ह्यांमध्ये अतितीव्र आहे. यासाठी शासनाकडून विलंबाने होणारी शिक्षक भरती, त्यात येणाऱ्या कायदेशीर व न्यायिक प्रकारच्या अनेक अडचणी, मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यातून बदलीने अन्य बाहेरील जिल्ह्यात जाणारे शिक्षक यासारख्या समस्यांमुळे मुलांचे मात्र अतोनात कधीही न भरून येणारे नुकसान हे होत आहे. त्यामुळे शिक्षक नियुक्त्यांबाबतची कार्यवाही तात्काळ करावी, अशी मागणी सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, सुधाकर देवस्थळी, बाबू परब व भानू तळगावकर यांनी केली आहे. शासनाने तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक पदे अन्य मार्गांनी भरण्याचे सूचित केले आहे. त्यातील एक पर्याय म्हणून प्राधान्यक्रमाने सेवानिवृत्त शिक्षकांमधून एकत्रित मानधन तत्वावर शिक्षक घेण्यात यावेत, असे आहे. असे शिक्षक उपलब्ध झाल्यास अन्य उमेदवारांचे पर्याय देण्यात आलेले आहेत. या पर्यायातील पहिल्या पर्यायासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी 7 जुलै रोजी आपल्या दालनात सेवानिवृत्त शिक्षक संघटनांची सहविचार सभा आयोजित केली होती. या सभेसाठी शिक्षक प्रतिनिधी व संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Close Menu