प्रशिक्षणातून दर्जेदार कलावंत घडतील-भालचंद्र केळुसकर

 दशावतार कला जोपासण्यासाठीची तपश्‍चर्या असामान्य आहे. दशावतार प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे ही काळाची गरज आहे. अशाच प्रशिक्षण शिबिरांमधून निश्‍चितच दशावतार कलेला वारसा मिळून देणारे दर्जेदार कलावंत घडतील. दशावतार कलेसोबत भजन कलेला राजाश्रय मिळवून द्यायचा असेल तर दशावतार आणि भजनी कलावंतांनी संघटित होण्याची गरज आहे असे मत सिंधुदुर्ग भजन संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र केळुसकर यांनी व्यक्त केले.

      ‘प्रवास दत्तमाऊलीचा, सोहळा त्रैवर्षे पूर्तीचा‘ अंतर्गत दत्तमाऊली पारंपारिक दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण बहुउद्देशिय मंडळातर्फे 13 ऑगस्ट रोजी मठ येथील स्वयंभू मंगल कार्यालयात एक दिवशीय दशावतार प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. यात सहभागी झालेल्या 30 प्रशिक्षणार्थिना दामू जोशी, पपू नांदोसकर, यशवंत तेंडोलकर, प्रशांत मेस्त्री, आनंद नार्वेकर, पंढरीनाथ घाटकर, पपू घाडीगांवकर, चंद्रकांत खोत, हरेश नेमळेकर आदींनी भूमिकेतील बारकावे, प्रसंग, अभिनय, वेशभूषा, प्रसंगानुरूप सादरीकरण आणि सादरीकरणातील छोट्या-छोट्या त्रुटी याबाबत मार्गदर्शन करून प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाला वाहतूक पोलिस अंमलदार मनोज परूळेकर, गौरव परब, ज्येष्ठ दशावतार कलाकार रवी खानोलकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी भेट देऊन कौतुक केले.

Leave a Reply

Close Menu