‘रंग अंतरंग’ पुस्तक प्रत्येकाकडे असलेच पाहिजे – डॉ. रूपेश पाटकर

           मनोविकार तज्ज्ञ म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ बोटावर मोजण्याइतके तज्ज्ञ उपलब्ध आहेत. असे असताना सायकोथेरपीला सपोर्टिव्ह किवा सायकॉलॉजीचे महत्त्व अगदी सोप्या आणि दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घडामोडींची उदाहरणे देणारे ललित लेख लेखिका श्रुती संकोळ्ळी यांनी ‘रंग अंतरंग‘ या आपल्या पुस्तकात मांडले आहेत. त्यामुळे वाचनीय असलेले हे पुस्तक प्रत्येकाकडे असले पाहिजे असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रूपेश पाटकर यांनी केले.

      प्रसिद्ध लेखिका श्रुती संकोळ्ळी यांच्या ‘रंग-अंतरंग‘ या पुस्तकाचे प्रकाशन 1 ऑक्टोबर रोजी साई डिलक्स हॉल येथे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर, ज्येष्ठ साहित्यिक वृंदा कांबळी, सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबेळकर, किरात ट्रस्टचे विश्‍वस्त मेघश्‍याम मराठे, शशांक मराठे, प्रशांत आपटे, प्रसिद्ध चित्रकार सुनिल नांदोसकर व अभिनंदन संकोळ्ळी यांच्या हस्ते  संपन्न झाले.

      पुढे बोलताना ते म्हणाले की, मानसशास्त्रासारखा अतिशय क्लिष्ट विषय लेखिकेने ओघवत्या शैलीत मांडले आहेत. खरेतर संयम हा विषय शिकवून शिकता येणारा नाही. त्याचे संस्कार नकळत होत असतात. पूर्वीच्या काळी साधा तयार ड्रेस घ्यायचा असला तरी ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने प्रथम कापड खरेदी, नंतर टेलरची मनधरणी या सगळ्या व्यापातून पंधरा-वीस दिवसांनी ड्रेस हाती येत असे. आणि आजकाल मागणी तसा पुरवठा किंबहूना मागणी नसतानाही पालकांकडून आपल्या वेळेला मिळाले नाही म्हणून होणारा पुरवठा मुलांना अधिकाधीक भावनाशून्यतेकडे नेतो आहे. बाहेरून आल्यानंतर लहान मूल आपल्याला बिलगते. तेव्हा आपण जर एखादी बाहेरून आणलेली वस्तू त्या मुलाला दिली तर पुढे पुढे ते आपल्या ऐवजी त्या वस्तूची वाट पाहू लागते. याचा अर्थ वस्तू घेऊन येऊ नये असा नव्हे तर आपला आपल्या पाल्याला वाढवताना दृष्टीकोन कसा आहे हे अतिशय महत्त्वाचे आहे. दहावीला अमुक टक्के मार्क मिळवलेस तर तुला मोटरसायकल घेऊन देईन असे म्हणणाऱ्या पालकांनी जागरूक होणे गरजेचे आहे. रंग-अंतरंग या पुस्तकात भावनेचे व्यवस्थापन अतिशय उत्तमरित्या दैनंदिन जीवनातील दाखले देत लेखिकेने मांडले आहे. वाचक नक्कीच अंतर्मुख होतील. आणखीही अनेक विषय आहेत जे लेखिकेला मी सुचवू शकतो त्यातून त्यांनी त्या विषयांवरही आवर्जून लिहावे असे मत डॉ. रुपेश पाटकर यांनी व्यक्त केले.

      प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ उतार असतात. अशावेळी चांगले ते घेत आशावादी जीवन जगत लेखिकेने आलेले उत्तम अनुभव व्यक्तीचित्रण अतिशय सहजगत्या मांडले आहेत. ‘मन सुद्ध तुज‘ या साप्ताहिक किरात मधील प्रसिद्ध झालेल्या सदरामधील लेख तर मानवी मनातील विचारांचे प्रतिबिंब आहेत. या लेखांची शीर्षके देखील अतिशय समर्पक अशी आहेत. नुसती शीर्षक वाचून हे लेख वाचण्यासाठी वाचक आकर्षित होतील असा आशावाद वृंदा कांबळी यांनी व्यक्त केला. तर वंदना करंबळेकर यांनी लेखिका श्रुती संकोळ्ळी यांची जडणघडण जवळून अनुभवली असल्यामुळे त्यांचे अनेक पैलू उलगडत पुस्तकातील ‘सोडून द्यावे‘ या कवितेचे अभिवाचन केले.

      पुस्तकाचा प्रवास उलगडताना श्रुती संकोळ्ळी यांनी आपली आई आणि आपले गुरूजन यांनी केलेल्या संस्कारांमुळेच वाचनाची आवड आणि नकळत निर्माण झालेली व्यक्ती वाचनाची आवड यातून अनेक वेळेला जे काही लिखाण माझ्या हातून घडत गेले त्यातील निवडक लेखांचा समावेश या पुस्तकात केला असल्याचे सांगितले. यातील मला भावलेली व्यक्ती चित्रणं तसेच सदरातून प्रसिद्ध झालेले लेख हे एकत्रितरित्या पुस्तक रूपाने वाचकांच्या हाती देताना विशेष आनंद होत असल्याचे सांगितले. या पुस्तकातील ‘बदल’ तसेच ‘अपेक्षांचं जाळं’ या लेखांचे वाचन अनुक्रमे श्रुती संकोळ्ळी आणि शशांक मराठे यांनी केले.

      याच कार्यक्रमात किरात शताब्दी कार्यक्रमानिमित्त घेतलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधील नृत्याविष्कार सादर करणाऱ्या निरजा माडकर, केतकी आपटे, रामेश्‍वर दशावतार नाट्य मंडळातील भरत पवार, शुभम पवार, प्रथमेश लिमये, कौशल नातू, धीरज घाडी, गुरूप्रसाद दामले, सुशेन बोवलेकर, तेजस परब, प्रथमेश गुरव, सुभाष कांदळकर, चेतन नार्वेकर यांचा, ‘दयाती‘ लोककला संवर्धन अकादमी तर्फे कळसुत्री बाहुल्यांचा पारंपरिक कार्यक्रम सादर करणाऱ्या गणपत मसगे, बाळकृष्ण मसगे, शिवदासकुमार मसगे, मीरा मसगे, प्रमोद मसगे, कु.संस्कार मसके, कु.श्रमिका मसके यांचा तसेच किरात वास्तु नुतनीकरण करताना सहाय्य करणाऱ्या रफिक शेख, सोमा सावंत, विकास गावडे, शरद मेस्त्री, निलेश सारंग, प्रविण राजापूरकर, राजन केरकर व सुहास आडरकर यांचाही प्रातिनिधीक स्वरूपात सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. शशांक मराठे यांनी केले.

Leave a Reply

Close Menu