नरकासूर स्पर्धेवर बंदी घालण्याची नागरिकांकडून मागणी

दिवाळी निमित्त दरवर्षी वाढत चाललेल्या नरकासुर स्पर्धेवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी वेंगुर्ला  येथील नागरिकांनी लेखी निवेनाद्वारे नगरपरिषद आणि पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

      हिंदू संस्कृतीमधील सणामध्ये प्रमुख मानल्या गेलेल्या अंधःकारातून प्रकाशाकडे नेणा-या तेजोमय दिवाळीसारख्या सणाला काही विकृत लोकांकडून राक्षसी प्रवृत्तीच्या नरकासूर प्रतिमा स्पर्धा भरवून तरूण पिढीला हिंदू संस्कृतीपासून भरकटवण्याचे आणि तरूण पिढीला बरबाद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा प्रकारांमुळे राक्षसी प्रवृत्ती वाढीस लागण्याचा प्रकार वाढू लागला आहे. या स्पर्धेत भाग घेणारी तरूण आणि बालकेसुद्धा नरकासूराची प्रतिमा तयार करण्यासाठी शहरभर फिरून वर्गणी गोळा करतात. मग या प्रतिमा स्पर्धेच्या ठिकाणी नेतात आणि स्पर्धेमध्ये आपल्या प्रतिमेस नंबर (बक्षिस) मिळाले नाहीतर परीक्षकांना दमदाटी, प्रसंगी मारहाण सुद्धा केली जाते. मंडळा मंडळामध्ये मारामारी होतात मग ही दुश्मनी कायम राहते.

      दिवाळीच्या आदल्या दिवशी रात्रभर डीजेसारखे कर्णकर्कश वाद्ये लावून शहरभर मिरवणूक काढण्यात येतात. दारू पिऊन असणा-या या तरूणांकडून वाहतुकीस अडथळा करण्यात येतो. तिथेही बरेचदा बाचाबाची होते. पहाटे या प्रतीमा शहरातील चौकाचौकात भर रस्त्यांवर जाळल्या जातात यातून काही दुर्घटना घडतात. सकाळी संपूर्ण शहरभर या जाळलेल्या प्रतीमांचे जळालेल्या अवशेषांचे प्रचंड ढीग रस्तयावर विखुरलेले असतात. हे सर्व झाल्यावर ही सर्व तरूण मंडळी आणि बालके सकाळी जाऊन गाढ झोपतात ती दुपारपर्यंत. ज्या सकाळ सकाळी उठून अभ्यंगस्नान करून नविन कपडे परीधान करून देवदर्शने आणि थोरामोठ्यांचे आशिर्वाद घेऊन घरात गोडधोडाचा फराळ करून आनंद घ्यायचा असतो तेव्हा ही मंडळी झोपलेली असतात. ज्या भगवान श्रीकृष्णाने या नरकासूररूपी दैत्याचा वध केला त्याचा जयजयकार करण्यापेक्षा या दैत्यालाच देव करण्याच्या या विकृतीला आमचा विरोध आहे. हिंदू संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार पुढील पिढीला आपल्या संस्कृतीचा वारसा जपावयासाठी प्रयत्न करणार असल्यास तरूण पिढीला संस्कृतीपासून आणि भविष्यापासून दूर भरकटवणा-या विकृत आणि विद्रुप नरकासूर स्पर्धेवर आपल्या कार्यकक्षेतील नियमाचे पालन करून बंदी घालणे व आपल्या संस्कृती आणि तरूण पिढीला वाचवावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

      यावेळी सुहास मांजरेकर, उमेश वेंगुर्लेकर, पंकज शिरसाट, भाई मालवणकर, सुदेश वेंगुर्लेकर, श्रीधर जाधव व अन्य नागरिक उपस्थित होते. नगरपरिषदेमध्ये मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी आणि पोलिस ठाण्यात पोलिसांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कारवाई करतो असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Close Menu