किरातने सातत्याने जपली साहित्य परंपरा – अॅड.देवदत्त परूळेकर

साप्ताहिक किरातच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला नगर वाचनालयाच्या सभागृहात संत साहित्याचे अभ्यासक अॅड.देवदत्त परुळेकर, नगर वाचनालयाचे कार्यवाह कैवल्य पवार, चित्रकार सुनील नांदोस्कर, किरात व्यवस्थापक सुनिल मराठे, प्रा.महेश बोवलेकर, डॉ.श्रीराम हिर्लेकर, किरातचे ज्येष्ठ वाचक गुरूनाथ रॉय, विजया रॉय, किरातचे विश्वस्त प्रशांत आपटे, अॅड.शशांक मराठे, अशोक कोलगांवकर, संपादक सीमा मराठे, प्रथमेश गुरव यांच्या हस्ते झाले. दिवाळी अंकाच्या माध्यमातून अनेक साहित्यिक घडत आहेत. साप्ताहिक किरातने देखील ही साहित्य परंपरा जपण्यात सातत्य ठेवले आहे. यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी कथा स्पर्धेतील तीन पारितोषिक विजेत्या कथा किरातच्या युट्युब चॅनेलवर ऐकता येणार आहेत. त्यामुळे वाचनापासून काहीशा दूर होत चाललेल्या नविन पिढीतील वाचकांना साहित्य विश्वाशी जोडणारा पर्याय उपलब्ध झाला असल्याचे प्रतिपादन अॅड.देवदत्त परुळेकर यांनी केले. 

    आज प्रथितयश असलेल्या सिंधुदुर्गातील लेखक कवींचे साहित्य सुरुवातीला किरातमधूनच प्रसिद्ध झाले होते. प्रतिथयश लेखकांसोबत नवोदितांनाही प्राधान्य देणे हेही किरातचे वैशिष्ट्य राहिले असल्याचे मत ज्येष्ठ वाचक गुरूनाथ रॉय आणि विजया रॉय यांनी व्यक्त केले.

     दरवर्षी चित्रकार सुनिल नांदोस्कर यांनी साकारलेले किरातचे मुखपृष्ठ वैशिष्ट्यपूर्ण असते. अमर्याद जंगल तोडीमुळे मर्यादित असलेले ‘शेकरू‘चा अधिवास कमी होत आहे. ‘शेकरू‘च्या संवधर्नासाठी महाराष्ट्रातील ‘भीमाशंकर‘ हे अभयारण्य संरक्षित करण्यात आले आहे. ‘शेकरू‘ पारिस्थितिक संस्थेतील (इकोसिस्टीम) महत्त्वाचा घटक मानले जाते. यावर्षी महाराष्ट्राचा राज्य प्राणी ‘शेकरू‘च्या विविध रंगछटा मुखपृष्ठावर साकारल्या आहेत.

    मुलाखत विभागात ‘मै नही तो कौन बे‘ असं म्हणत रॅप विश्वात पदार्पण करून आपली ओळख निर्माण करणारी कोकणकन्या सृष्टी तावडे, चित्रपट सृष्टीत सेट डिझायनर म्हणून नावारूपाला आलेली कणकवलीची पूर्वा पंडित-भुजबळ, तीन दशकांहून अधिक काळ विशेष मुलांसाठी आपले योगदान देणा­या विद्या भागवत, स्वतः मूकबधिर असलेला प्रसाद जोशी यांचा थक्क करणारा ध्येयवेडा प्रवास उलगडला आहे. दक्षिण कोकणातील लोक सांस्कृतिक परंपरा हे सूत्र घेऊन अभ्यासक मान्यवरांनी लिहिलेले लेख वाचकांना निश्चित आवडतील.

   सुप्रसिद्ध साहित्यिक अरुण सावळेकर यांनी पुरस्कृत केलेल्या खुल्या कथालेखन स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या सहा कथा तसेच कविता, राशीफल आणि मिश्किली अशी भरगच्च साहित्यिक मेजवानी या दिवाळी अंकात समाविष्ट आहे.

Leave a Reply

Close Menu