देशातील पहिले अखिल भारतीय दशावतारी नाट्यसंमेलन वेंगुर्ला येथे

अखिल भारतीय दशावतार नाट्य परिषद आणि संशोधन संस्था व वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग-तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिले अखिल भारतीय दशावतारी नाट्यसंमेलन १५ व १६ डिसेंबर कालावधीत वेंगुर्ला साई मंगल कार्यालयात होणार आहे. या नाट्य संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून दशावतार लोककलेवर पहिली डॉक्टरेट पदवी संपादन करणारे वेंगुर्ल्याचे सुपुत्र अॅड.डॉ.अशोक भाईडकर यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही नाट्ययरसिकांना मिळणार आहे.

      दि. १५ रोजी सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडी आणि दशावतार वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार असून साईमंगल कार्यालयात ग्रंथदिंडीचे आगमन झाल्यावर सकाळी १०.३० वाजता तहसीलदार ओंकार ओतारी, वेंगुर्ला पोलिस निरिक्षक अतुल जाधव, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपयंत्र अभियंता, कणकवली विभाग कार्यालयाचे सुजित डोंगरे, खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम्.बी.चौगुले तसेच दशावतारातील पितामह यशवंत तेंडोलकर, भजनसम्राट भालचंद्र केळुसकरबुवा यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ होईल.

      या संमेलनात ज्येष्ठ दशावतारी कलावंत खलनायकीचा बुलंद आवाज तुकाराम गावडे, विविधांगी गाणी आणि अख्यान देणारे कणकवलीचे सुपुत्र भाई सामंत, पहिले आत्मचरित्र लिहिणारे गोव्याचे सुपुत्र मास्टर दामू जोशी, ज्येष्ठ रंगकर्मी जयसिंग राणे आणि महाराष्ट्र शासन कलादान पुरस्कार विजेते यशवंत तेंडोलकर यांचा विशेष सत्कार होणार आहे. संमेलनाध्यक्ष अॅड.डॉ.अशोक भाईडकर यांच्या ‘दशावतार‘ पुस्तकाच्या दुस-या आवृत्तीचा आणि ‘स्पर्श‘ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा यावेळी संपन्न होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दशावतार लंगार नृत्य स्पर्धा याच दिवशी सायंकाळी ५ वाजता घेण्यात येणार आहे. तर ७ वाजता अॅड.डॉ. अशोक भाईडकर लिखित ‘संगीत उषास्वप्न‘ या व्यावसायीक नाटकावर आधारित ‘उषास्वप्न बाणासुर‘ हा दशावतारी नाट्यप्रयोग दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळातर्फे सादर होणार आहे.

      १६ डिसेंबर रोजी सकाळी शालेय विद्यार्थ्यांसाठी दशावतार अभिनय स्पर्धा आयोजित केली असून त्यानंतर दशावतार लोककला-चर्चासत्र, परिसंवाद, मुलाखत ‘दशावतार ः सद्यस्थिती, समस्या, उपाय, सुधारणा‘ हा कार्यक्रम होणार असून ज्येष्ठ रंगकर्मी आणि विचारवंत आपले बहुमोल मार्गदर्शन करणार आहेत. या संमेलनात संपन्न झालेल्या सर्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण दुपारी १ वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार असून स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

      या पहिल्या दशावतारी नाट्य संमेलनात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय दशावतार नाट्य परिषद आणि संशोधन संस्था व वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग-तुळस या दोन्ही सहयोगी संस्थांच्यावतीने प्रा.सचिन परूळकर, महेश राऊळ, प्रशांत परब, अतुल नाईक, राजाराम धुरी, सौरभ पाटकर, सुधाकर वळंजू, सौरभ आंगचेकर यांनी केले असून या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोककला अभ्यासक आणि महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध युवा निवेदक प्रा. वैभव खानोलकर करणार आहेत.

Leave a Reply

Close Menu