वेंगुर्ल्यात 12 ते 16 डिसेंबरला राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी

 महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 62 वी हौशी मराठी नाट्यस्पर्धा 2023-24 आयोजित नाट्य स्पर्धेअंतर्गत वेंगुर्ले येथील नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात 12 ते 16 डिसेंबर या कालावधीत सायंकाळी 7 ते 10 या वेळेत प्राथमिक फेरीत 5 दर्जेदार नाटके संपन्न होणार आहेत. वेेंगुर्ला व परिसरातील नाट्यरसिकांसाठी ही एक पर्वणी ठरणार असल्याची माहिती या स्पर्धेचे समन्वयक व माझा वेेंगुर्लाचे प्रशांत आपटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

      ‘माझा वेंगुर्ला’ तर्फे लोकमान्य को-ऑप. सोसायटीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माझा वेंगुर्लाचे कार्याध्यक्ष संजय पुनाळेकर, सचिव राजन गावडे, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, सचिन वालावलकर, अमृत काणेकर, यासीर मकानदार आदी उपस्थित होते. वेंगुर्ल्याचे सुपुत्र नाटककार मधुसुदन कालेलकर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने महाराष्ट्र हौशी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी वेंगुर्ले येथे व्हावी यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांना माझा वेंगुर्लातर्फे पत्र दिले होते. याकामी सचिन वालावलकर, राजन गिरप, प्रसन्ना देसाई, शरदजी चव्हाण, राजन गावडे यांनी पाठपुरावा केला होता. 12 डिसेंबरला सायं. 6 वा. या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन होणार आहे.

       रसिकांनी या नाटकांचा लाभ घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावतीने माझा वेंगुर्ला यांनी केले आहे.

मंगळवार 12 डिसेंबर रोजी सायं. 7 वा. विजय तेंडुलकर लिखित व अशोक तेंडुलकर दिग्दर्शित इंद्रधनू कलामंच दाभोली-वेंगुर्ले यांचे ‘अशी पाखरे येती’, 13 डिसेंबर रोजी सायं. 7 वा. प्रशांत माणगावकर लिखित व सुरेंद्र उर्फ बाळू खांबकर दिग्दर्शित कलावलय वेंगुर्लेचे ‘सावरबेट’, 14 डिसेंबर रोजी सायं. 7 वा. जयवंत दळवी लिखित व रमेश नार्वेकर दिग्दर्शित जीवनदायी विकास संस्था वेंगुर्लेचे ‘कालचक्र’, 15 डिसेंबर रोजी सायं. 7 वा. प्रविण दवणे लिखित व स्वानंद के. सामंत दिग्दर्शित सिद्धांत फाऊंडेशन सिंधुदुर्गचे ‘प्रिय पपा’, 16 डिसेंबर रोजी सायं. 7 वा. इरफान मुजावर लिखित व प्रथमेश नाईक दिग्दर्शित श्री महालक्ष्मी ज्ञानवर्धिनी वाचनालय परुळेचे ‘ती सात वर्षे’ हे नाटक होणार आहे.

या नाटकांसाठी 15 रु. व 10 रु. तिकीट दर आहे.

Leave a Reply

Close Menu