भविष्य घडविण्यासाठी वाचनालयांचा वापर करा

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा औचित्याने नगरवाचनालय वेेंगुर्ला यांनी विविध स्पर्र्धांच्या पारितोषिक वितरणाचे आयोजन केले. बक्षिस मिळणं हा जरी स्पर्धेमधील महत्त्वाचा भाग असला तरी या निमित्ताने स्पर्धकाने केलेले वाचन, अभ्यास महत्त्वाचे असते. यासारख्या स्पर्धा माणूस म्हणून तसेच व्यक्तिमत्व विकास घडविण्यात मदत करते. व्यासपीठावरील पत्रकार, कवी, साहित्यिक, प्रोफेसर, ग्रंथालय कार्यकर्ता यांनाही सन्मानित करण्यात आले आहे. शारदा प्रांगणातील सारस्वतांचा हा मेळावा सर्वार्थाने प्रेरणादायी आहे. वाढदिवसाला किमान एक पुस्तक भेट असा संकल्प करून वाचनाने समृद्ध बना असे प्रतिपादन कुडाळ हायस्कूलचे माजी प्राचार्य काशिनाथ सामंत यांनी काढले.

      नगर वाचनालय, वेंगुर्ला यांच्यातर्फे पुरस्कार वितरण व पारितोषिक वितरण कार्यक्रम 21 जानेवारी रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमात दै.तरूण भारतचे प्रतिनिधी माधव कदम (कणकवली) यांना आदर्श पत्रकार पुरस्कार, सौ. उषा परब (सावंतवाडी) यांना आदर्श साहित्यिक पुरस्कार, विजयकुमार फातर्पेकर (सावंतवाडी) यांना आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता, कै.सौ.विजया वामन पाटणकर वाचनालय कुडाळ यांना आदर्श ग्रंथालय पुरस्कार, नट वाचनालय बांदाचे कर्मचारी सौ.सुस्मिता सीताकांत नाईक यांना आदर्श ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

      प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.देवदत्त परूळेकर यांनी प्रा.मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दीबद्दल त्यांच्या कार्याची माहिती दिली. माधव कदम यांनी वेंगुर्ल्यातील आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या. निस्पृह पत्रकारिता व केलेल्या लेखन साहित्याबद्दलही माहिती देऊन एका उज्ज्वल परंपरा असलेल्या संस्थेने गौरविल्याबद्दल आभार मानले. वेंगुर्ल्याच्या सान्निध्यातच निसर्गरम्य वातावरणात माझ्यातील लेखनाला ओळख निर्माण झाल्याचे उषा परब यांनी सांगितले. लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेच्या सुट्टीत मुलांसाठी बाल वाचनकट्टा, नाट्य प्रशिक्षणे आदी उपक्रम घेत असल्याचे श्री.फातर्फेकर यांनी सांगितले. ही संस्था गेली 30 वर्षे विविध स्पर्धा घेऊन ज्ञानदानाचे कार्य करीत असल्याबाबत कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी माहिती दिली. देणगीदारांनी दिलेल्या देणगीतून असे कार्यक्रम संस्था घेत आहे असे कार्यवाह कैवल्य पवार यांनी प्रास्ताविकात सांगितले.

      यावेळी संस्थेतर्फे घेतलेल्या श्रीकृष्ण स. सौदागर पुरस्कृत सांस्कृतिक कार्यक्रमातील व अ.ना.शेणई वक्तृत्व स्पर्धेतील तसेच सुदत्त कल्याण निधी, पं. जनार्दनशास्त्री कशाळीकर, भालचंद्र कर्पे स्पर्धेतील विजेत्यांना आणि मनोहर शां. भांडारकर वक्तृत्व स्पर्धेतील विजेते ओंकार तेंडोलकर (पाटकर हाय.), मयुरेश सौदागर (खर्डेकर कॉलेज), लतिका सातार्डेकर (पाटकर हाय.), ज.बा.आरोसकर वक्तृत्व स्पर्धेतील विजेते एल्वीरा रॉड्रीग्ज (रोझरी स्कूल मालवण), अपूर्वा पेडणेकर (पाटकर हाय.), प्राची कावळे (सरस्वती विद्या.आरवली) यांना गौरविण्यात आले.

      यावेळी संस्थेचे उपकार्यवाह माया परब, सदस्य मंगल परूळेकर, नंदन वेंगुर्लेकर, शांताराम बांदेकर, दीपराज बिजितकर, विठ्ठल करंगुटकर, वीरधवल परब, श्रीनिवास सौदागर, सीमा मराठे, रमण किनळेकर, कुडाळ वाचनालयाचे भार्गवराम धुरी, विठ्ठल पाटणकर, शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu