महोदय पर्वणीनिमित्त उसळला भाविकांचा जनसागर

शुक्रवारी झालेल्या पौष अमावास्येला महोदय पर्वणी निमित्त वेंगुर्ला सागरेश्वर व आरवली सागरतीर्थ समुद्रकिना-यावर भाविकांचा जनसागर उसळला या ठिकाणी विविध गावच्या ग्रामदेवता, तरंगदेवतासहित हजारो भाविक, ग्रामस्थांनी तिर्थस्नान केले.

      पौष अमावास्या व श्रवण नक्षत्र एकत्र आल्याने झालेल्या महोदय पर्वणीला सागरेश्वर समुद्र किनारी वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, श्री देवी सातेरी व तरंगदेवतासह वेंगुर्ला तालुक्यातील मठ, कुडाळ तालुक्यातील उपवडे, बांबूळी, मांडकुली, पुळास, आंबडपाल, साळगाव तर सागरतीर्थ येथे आरवली, शिरोडा, आजगाव, आसोली, मडूरा, कास, सातार्डा, माजगाव आदी ठिकाणच्या ग्रामदेवतांनी भाविक व ग्रामस्थांसमवेत तिर्थस्नान केले.

      यावेळी उभादांडा ग्रामपंचायतीच्यावतीने भाविकांसाठी पाणी, चेंजिग रूमची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून येणा-या भाविकांसाठी बैठक व्यवस्था, मोफत नाष्टा व पिण्याच्या पाण्याची सोय व चेंजिग रूमची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अर्चना घारे परब यांच्यावतीने भाविकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार राजन तेली, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, भूषण आंगचेकर, तुषार साळगावकर, वसंत तांडेल, हितेश धुरी, शिवसेना शहरप्रमुख संतोष परब, उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख यशवंत परब, शहरप्रमुख अजित राऊळ यांच्या सहित विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होते.

      यावेळी उभादांडा ग्रामपंचायतच्यावतीने सागर रक्षक वेळोवेळी भाविकांना सूचना देत होते. तर येथील स्थानिक युवक ललित गिरप यांच्या सहित युवक आपल्या बोटद्वारे फिरून खोल समुद्रात जाणा-या भाविकांना वेळोवेळी सूचना देत होते. दुपारी वेंगुर्ल येथील ग्रामदेवता श्री देवी सातेरी, श्री देव रामेश्वर व तरंग देवता यांनी समुद्रस्नान केल्यानंतर सर्व देवता माघारी परतले. तर भाविक व नागरिकांनी सायंकाळी सूर्यास्तापर्यंत या पवित्र स्नानाचा लाभ घेतला.

Leave a Reply

Close Menu