अति दुर्मिळ कॅस्ट्रोज कोरल स्नेकचे दर्शन

कॅम्प-भटवाडी येथील अमित बागवे यांच्या घराच्या अंगणात १३ सप्टेंबर रोजी अति दुर्मिळ कॅस्ट्रोज कोरल स्नेक आढळून आला असून सर्पमित्र महेश राऊळ यांनी त्याचे सुरक्षितपणे रेस्क्यू केले. तत्पूर्वी अमित बागवे यांच्या कुटुंबातील एका धाडसी मुलीने सापाला कोणतीही इजा न करता बाटलीमध्ये सुरक्षितपणे बंदिस्त केले होते. गेल्या सहा वर्षांत जिवंत कॅस्ट्रोज कोरल स्नेकच्या रेस्क्यूची ही चौथी घटना ठरली आहे. कॅस्ट्रोज कोरल स्नेक हा अत्यंत दुर्मिळ असल्याने त्याचे दर्शन होणे हीच विशेष बाब मानली जाते. साधारण दोन ते अडीच फूट लांबीचा हा साप पूर्ण वाढल्यानंतरही करंगळीपेक्षा कमी जाडीचा असतो. दगडाखाली, पाला-पाचोळ्यात तसेच जमिनीतील सुरक्षित ठिकाणी राहणे त्याला पसंत असते. छोटे बेडूक, सरडे, पाली, गांडुळे आदी त्याचे भक्ष्य असल्याचे अभ्यासकांकडून सांगितले जाते. धोका जाणवल्यास हा साप शेपटी गोल करून ती जमिनीवर आपटतो आणि आपल्यापासून दूर राहण्याचा इशारा देतो. त्याच्या शरीरावरील वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगतीमुळे त्याची ओळख पटण्यास मदत होते. महेश राऊळ यांनी सापाला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

Leave a Reply