डॉ. रुपेश पाटकर यांचे ‘अर्ज मधले दिवस’ हे पुस्तक सोमवारी २८ सप्टेंबर रोजी श्रमिक भवनात प्रकाशित झाले. गोव्यातील ‘अर्ज’ संस्थेसोबत काम करताना वेश्याव्यवसायात अडकलेल्या महिलांच्या जीवनाचा अनुभव आणि त्यातून स्वतःच्या पूर्वग्रहांमध्ये झालेला बदल यावर आधारित हे पुस्तक आहे. प्रमुख पाहुणे डॉ. मोहन आगाशे आणि अच्युत गोडबोले उपस्थित होते. समिती अध्यक्ष डॉ. अनंत फडके, सचिव उदय भट, ललित प्रकाशनचे शशिकांत पवार, लेखक डॉ.रुपेश पाटकर उपस्थित होते.प्रास्ताविकात मुक्ता मनोहर यांनी सांगितले की, ‘हे पुस्तक केवळ वेदनांचे वर्णन नसून समाजाच्या संवेदनशीलतेला आवाहन आहे. जे बोलले जात नव्हते ते आता बोलले जात आहे, ही पहिली पायरी अाहे’ असे त्या म्हणाल्या. बाजाराच्या मूल्यव्यवस्थेला आव्हान देणारी भूमिका पुस्तकात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशोक मनोहर स्मृती आणि सांस्कृतिक-राजकीय संघर्षाच्या परंपरेचा उल्लेख करत त्यांनी कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले.
डॉ. पाटकर यांनी सांगितले की, ‘मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून आलेल्या त्यांना या विषयाबाबत पूर्वी अनेक पूर्वग्रह होते. ‘अर्ज’ संस्थेसोबत काम करताना महिलांचे जीवन, फसवणूक आणि पुनर्वसनातील अडचणी समजल्या. पंच्याहत्तर टक्के मुली अठरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच या व्यवसायात ओढल्या जातात. विरोध, जुळवून घेणे आणि स्वीकार या तीन अवस्थांमधून त्या जातात. स्वीकारानंतर पुनर्वसन अधिक अवघड होते,’ असे ते म्हणाले. सुटकेनंतरही अनेक महिला पुन्हा या व्यवसायात का जातात, याचे विवेचन करताना त्यांनी सांगितले की, ‘ज्यांचे कौशल्य विकसित होण्याआधीच आयुष्य खंडित झालेले असते, प्रचंड मोठा मानसिक धक्का बसलेला असतो, समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा की न ठेवावा या मानसिक अवस्थेत त्या असतात. त्यांना पुनर्वसनासाठी रोजगार, कौशल्य आणि समाजाचा बदललेला दृष्टिकोन आवश्यक असतो. पूर्वग्रह बदलावेत, खुली चर्चा व्हावी आणि या महिलांचे परतीचे मार्ग रुंद व्हावेत, यासाठी हे पुस्तक एक साधन आहे,’ असे ते म्हणाले. पुस्तकाच्या माध्यमातून सिंधुदुर्गात मानवी तस्करीच्या प्रकरणांत कारवाईला मदत झाल्याचे अनुभवही त्यांनी सांगितले. पुरुषांची मागणी आणि समाजातील पूर्वग्रह कमी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
अच्युत गोडबोले यांनी सांगितले की, ‘हे पुस्तक लेखकाच्या स्वतःच्या बदलाची आत्मकथा आहे. देशातील महिलांवरील अत्याचार, घरगुती हिंसाचार, हुंडाबळी आणि विविध गुन्हेगारी आकडेवारीचा गोषवारा देत पुरुषप्रधान संस्कृती आणि आजच्या भांडवलशाही व्यवस्थेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. व्यवस्था बदलण्याची वाट पाहत न बसता डॉ. पाटकर यांचे सध्याचे काम महत्त्वाचे आहे’ असे त्यांनी सांगितले.
डॉ. मोहन आगाशे यांनी लेखकाच्या मानसिक प्रवासावर भर दिला आणि त्यातील विचाराचा संदर्भ देत सांगितले, ‘अज्ञान म्हणजे माहिती नसणे, तर अंधश्रद्धा म्हणजे चुकीचे माहीत असणे. समाजाबद्दलच्या आपल्या अंधश्रद्धाही तितक्याच घातक असतात. हे पुस्तक त्या अनुभवाची संधी देते. डॉ. पाटकर यांनी हे पुस्तक प्रामुख्याने स्वतःचे मन स्वच्छ करण्यासाठी लिहिले असून, तो त्यांच्या मानसिक प्रवासाचा लेखाजोखा आहे’, असेही त्यांनी सांगितले. या विषयावर प्रदर्शित झालेले ‘दोघी’, ‘मंडी’ आणि ‘रिहाई’ या चित्रपटांचा उल्लेख करत ते म्हणाले की, चित्रपटासारखी माध्यमे विचारांसोबत भावनांपर्यंत पोहोचतात, त्यामुळे या विषयावर ती प्रभावी ठरतात. पुस्तकाबरोबर या माध्यमांचाही विचार केल्यास पुस्तकाचा परिणाम अधिक चांगला होईल, असे त्यांनी नमूद केले. निवेदन आणि आभार सीमा मराठे यांनी मानले.
