नगर वाचनालय वेंगुर्ला संस्थेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या आदर्श शिक्षक, शिक्षिका व शाळा पुरस्कारांचे वितरण २ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. यावेळी प्राचार्य स्मिता सुरवसे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त श्रीराम दीक्षित, आदर्श शिक्षिका पुरस्कार वैभवी रायशिरोडकर तर आदर्श शाळा पुरस्कारप्राप्त आसोली शाळा नं.१चे शिक्षक शरद पवार यांना गौरविण्यात आले. यावेळी व्यासपिठावर गटशिक्षणाधिकारी अजय ढाणे, संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळच्या प्राचार्य स्मिता सुरवसे, संस्था उपाध्यक्ष अॅड.देवदत्त परूळेकर, कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार, कार्योपाध्यक्ष शांताराम बांदेकर आदी उपस्थित होते. आपल्या जडणघडणीत गुरूंचे मोलाचे सहकार्य असते. विद्यार्थ्यांना शिकवित असताना समोरील विद्यार्थ्यांच्या भावना शिक्षकांना प्रोत्साहित करतात. हे काम डिजिटल माध्यम, स्क्रिन करू शकत नाही. शिक्षकाला रिप्लेस नसतो आणि नाही. शिक्षणाला डिजिटल हा पर्याय नाही. पुस्तक हे शिक्षणाचे खरे माध्यम असल्याचे प्रतिपादन प्राचार्य स्मिता सुरवसे यांंनी केले. सध्याचे युग हे डिजिटल युग असले तरी प्रत्येकाने वाचनाचा छंद जोपासला पाहिजे. वाचनाने माणसाचे व्यक्तिमत्त्व सुधारते असे मार्गदर्शन करीत जिल्हा परिषद शाळांमधील घटत चाललेली पटसंख्या ही दुर्देवाची गोष्ट असल्याची खंत गटशिक्षणाधिकारी अजय ढाणे व्यक्त केली. आपले संत हे समाजाचे शिक्षकच आहेत. संतांनी आपल्या वर्तनाने समाज सुधारणा घडविली. तसेच प्रत्येक शिक्षकांचे, पालकांचे वर्तन हे चांगले असणे गरजेचे आहे. तरच विद्यार्थी वर्तन सुधारेल असे प्रतिपादन अॅड.देवदत्त परूळेकर यांनी व्यक्त केले.
अखेरच्या श्वासापर्यंत मी शिक्षणासाठी, विद्यार्थ्यांसाठी माझे जीवन खर्च करीत शिक्षणाची ज्योत कायम स्वरूपी तेवत ठेवीन असे वैभवी रायशिरोडकर यांनी सांगितले. संस्थेची पुरस्कारांची निवड करण्याची पद्धत मला खूप भावली. या पुरस्कारामुळे अधिक चांगले काम करण्याची माझी जबाबदारी वाढली असल्याचे मत श्रीराम दीक्षित यांनी व्यक्त केले. आदर्श नागरिक घडविणे शिक्षकांची जबाबदारी असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला संस्थेच्या उपकार्यवाह माया परब, दीपराज बिजितकर, मंगल परूळेकर, सत्यवान पेडणेकर, का.हु.शेख, एस.एस.काळे, सुनिल मराठे, निशा वालावलकर, जाधव गुरूजी, रत्नप्रभा प्रभूसाळगांवकर, श्री.कांडरकर, श्रीनिवास सौदागर, मयुरेश सौदागर, मेहंदी बोवलेकर, भाऊ करंगुटकर, सुभाष परब, प्रा.संतोष वालावलकर, प्रा.तुषार कामत आदी उपस्थित होते. संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी आपली मानलेली आई श्रीमती पुष्पलता गुरूनाथ होडावडेकर यांच्या स्मरणार्थ संस्थेस १ लाख रूपयांची देणगी दिली आहे. या देणगीतून सन २०२७ पासून वेंगुर्ला तालुक्यातील ८वी ते १२वीमध्ये शिकत असलेल्या हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत अशी माहिती महेश बोवलेकर यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैवल्य पवार यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार महेश बोवलेकर यांनी मानले.
