प्राथमिक आरोग्य केंद्र तुळस येथे १८ जून रोजी जन आरोग्य समितीची सभा संपन्न झाली. शासनाच्या २३ नोव्हेंबर २०२२ च्या निर्णयानुसार जन आरोग्य समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पडवळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र लिलके यांची सहअध्यक्ष म्हणून तर आरोग्य सहाय्यक व रुग्ण कल्याण समिती सदस्य सचिव दयानंद गवस यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.या सभेला पदसिद्ध सदस्य म्हणून उभादांडा जि.प.सदस्य संजय गावडे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.मिलिंद मोळके, आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. सानिया खान,
वरिष्ठ स्टाफ नर्स शिल्पा आंबेकर, ग्रा.पं.आरोग्य उपसमितीचे सभापती सचिन नाईक, महिला व बालविकास विभागाच्या क्षेत्रिय पर्यवेक्षिका शर्मिष्ठा सामंत, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग प्रतिनिधी द्रौपदी नाईक, तालुकास्तरीय शिक्षण विभाग अधिकारी संतोष गोसावी आणि तालुकास्तरीय सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी प्रितम पवार उपस्थित होते.यावेळी सरपंच रश्मी परब (तुळस), मयुरी वडाचेपाटकर (मातोंड), रसिका केळुसकर (होडावडा), बाळा जाधव (आसोली), शमिका बांदेकर (परबवाडा) आणि निलेश चमणकर (उभादांडा), रोटरी क्लबचे सदस्य स्वप्निल झांट्ये आणि स्वयंसेवी संस्थेचे आरोग्य विषयक कामकाज हाताळणारे प्रतिनिधी सचिन परुळकर आदी उपस्थित होते. या सभेला विशेष निमंत्रित म्हणून पं.स.सभापती शंकर घारे, क्षयरोगाने मुक्त झालेल्या जयमाला गावडे आणि बचत गट अध्यक्ष दिपीका परब यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बळकटीकरणासाठी व आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी चर्चा झाली.
