मुंबई – वेंगुर्ला दरम्यान रो-रो पुन्हा धावण्याची शक्यता

गणेशोत्सव, शिमग्यासह अन्य सणांना मुंबईतून कोकणात, विजयदुर्गला केवळ सात तासांत पोहोचता यावे, यासाठी १ मार्चपासून मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा महाराष्ट्र सागरी मंडळाकडून मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आली. मात्र महिन्याभरात प्रतिसादाअभावी आणि तांत्रिक बिघाडामुळे ही सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याची नामुष्की सागरी मंडळावर ओढवली. गणेशोत्सव काळात ही सेवा सुरू असती तर गणेशोत्सवासाठी मुंबईकरांना अतिजलद आणि कोणत्याही त्रासाशिवाय कोकण गाठता आले असते.
गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची संख्या इतकी मोठी असते की, रस्ते वा रेल्वे मार्गे जाणाऱ्या सर्वांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या काळात कोकण रेल्वेकडून अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडल्या जातात, फेऱ्या वाढवल्या जातात. तर एसटी गाड्यांच्या फेऱ्या आणि संख्या वाढवल्या जातात. मात्र, तरीही ही व्यवस्था कमी पडते. प्रवाशांना कसरत करत कोकण गाठावे लागते. त्यात मुंबई-गोवा महामार्गाचे काम १८ वर्षांपासून रखडल्याने, पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने, आठ ते दहा तासांच्या रस्ते प्रवासासाठी प्रवाशांना दुप्पट वेळ लागतो. मुंबई-गोवा महामार्गाबरोबरच कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरही या काळात वाहनांची मोठी गर्दी असते.
मुंबई – विजयदुर्ग प्रवासासाठी ३ हजार, ५ हजार, ७ हजार आणि ९ हजार असे प्रवासी तिकीट दर होते. तर दुचाकीसाठी १ हजार, सायकलीसाठी ६०० रुपये आणि चारचाकीसाठी ६ हजार ते ९ हजार रुपये असे दर आकारण्यात आले. विमानसेवा आणि वंदे भारतपेक्षा ही सेवा महागडी असल्याची टीका यावेळी झाली. त्यामुळेच या सेवेच्या महिन्याभरात १२ फेऱ्या झाल्या आणि या १२ फेऱ्यांद्वारे केवळ ८९४ प्रवाशांनी प्रवास केला. तर केवळ १५४ वाहने यातून नेण्यात आली. या सेवेला प्रतिसाद मिळाला नाहीच, पण त्यामुळे आर्थिक फटकाही सहन करावा लागला. दरम्यान, बोटीची दुरुस्ती करून लवकर सेवा पुन्हा सुरू करू, असे त्यावेळी सांगण्यात आले. मात्र, अद्यापही सेवा सुरू झालेली नसून, ही सेवा सुरू असती, तर गणेशोत्सवादरम्यान या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला असता, असे म्हटले जात आहे.
कोकणात जाण्यासाठी आता मुंबई ते वेंगुर्ला अशी रो-रो सेवा सुरू होणार असून, यासाठीच्या व्यवहार्यता तपासणीचे काम सुरू आहे. रो-रो सेवेच्या संचालनासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार असून, वर्षभरात ही सेवा पुन्हा सुरू करण्याचे सागरी मंडळाचे नियोजन आहे. असे झाल्यास मुंबईहून वेंगुर्ला सात ते आठ तासांत गाठता येणार आहे. विजयदुर्ग, मालवण असे थांबे या सेवेत असणार आहेत. तसेच रो-रो सेवेतील चार कंपन्यांनी या मार्गावर सेवा देण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. त्यानुसार त्यांच्या प्रस्तावावरही विचार सुरू असून, निविदा प्रक्रियेद्वारे कंपन्यांची नियुक्ती करून रो-रो सेवा सुरू केली जाईल. यासाठी वर्षभराचा कालावधी लागेल. तसेच वेंगुर्ला येथे जेटी तयार करण्याचे काम सागरी मंडळाकडून सुरू असून, आतापर्यंत ४० टक्के काम पूर्ण झाले आहे.
दरम्यान, आधी रो-रोचा प्रयोग महागड्या तिकीट दरामुळे अयशस्वी ठरला. त्यामुळे परवडणाऱ्या दरात ही सेवा सुरू होणार का, हे पाहणे महत्त्वाचे असेल.

Leave a Reply