विशेष मोहिम राबवून सुद्धा मोकाट गुरे फिरण्याची परिस्थिती ‘जैसे थे’ 

वेंगुर्ला शहरात मोकाट गुरांविरोधात विशेष मोहिम राबवून सुद्धा मोकाट गुरे फिरण्याची परिस्थिती ‘जैसे थे’ राहिल्याने वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या गणेश चतुर्थीचे दिवस असून शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे. एकिकडे होणारी वाहतूक कोंडी तर दुसरीकडे मोकाट गुरे रस्त्याच्या मधोमध राहिल्याने वाहतुकीत निर्माण होणारा अडथळा यामुळे वाहनधारक जेरिस आले आहेत.
वेंगुर्ला शहरात मोकाट गुरांचा आणि मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. कळपाने फिरणारी मोकाट गुरे रस्त्याच्या मधोमध ठिय्या मांडत असून वाहतूकी अडथळा निर्माण करीत आहेत. रात्रीच्यावेळी फिरणाऱ्या या गुरांमुळे अपघातही होण्याचे प्रकार घडले आहेत. दरम्यान, या समस्येवर उपाययोजना म्हणून वेंगुर्ला नगरपरिषदेने विशेष मोहिम राबविली आहे. रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या मोकाट गुरांना पकडून त्यांना गोशाळेत हलविण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. तर रात्रीच्यावेळी मोकाट गुरांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी भटक्या गाई, वासरे आणि बैलांच्या गळ्यात रिफ्लेक्टीव्ह बेल्ट घालण्यात आले आहेत. तसेच मोकाट गुरांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यास संबंधित मालकांवर महराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ तसेच वेंगुर्ला न.प.घनकचरा व्यवस्थापन व साफसफाई (नियोजन) उपविधी २०१५ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.
मोहिम राबविण्यात येत असली तरी सद्यस्थितीत मात्र शहरात मोकाट गुरांचा वावर दिसून येत आहे. गणेश चतुर्थी निमित्त सर्वत्र चाकरमानी दाखल झाले असून यातील बऱ्याच चाकरमान्यांनी आपापली वाहने आणली आहेत. शहरात मुख्य बाजारपेठ असल्याने येथे वाहनांची संख्या वाढली आहे. दरम्यान, मोकाट फिरणाऱ्या गुरांचा उपद्रव सध्या वाहतूकीला होत आहे. गुरांच्या मालकांनी तरी आपापल्या गुरांना गोठ्यातच बांधून ठेवावेत अशी कुजबुज वाहनधारकांमधून ऐकायला मिळत आहे.

Leave a Reply