वेंगुर्ला न.प.चा आपत्कालीन विभाग व्हेंटिलेटरवर

          पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे आपत्कालीन विभाग कायम सज्ज असला पाहिजे. मात्र ६ जून रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत आपत्कालीन विभाग व्हेंटिलेटर असल्याचे चित्र समोर आले आहे. आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या ड्युटी तयार केल्या पण या विभागावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकारीच नेमला नाही. टोल फ्री नंबर आहे पण लागत नाही. दररोजचा संपर्कासाठी असणारा फोन नंबरही बंद आहे. मेन स्विच जळाला असल्याने कार्यालयातील इंटर कॉम सेवा बंद. एकूणच प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन हा विषयच गांभीर्याने घेतलेला नाही. त्यामुळे नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. तसेच तत्काळ आपत्कालीन विभाग सतर्क आणि सर्व सेवा सज्ज ठेवा अशी सक्त सूचना प्रशासनाला दिली आहे. या सभेला नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व सर्व खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
             आपत्कालीन विभागाच्या कामकाजाचा यावेळी पूर्ण आढावा घेण्यात आला. शहरात अनेक झाडे धोकादायक आहेत. संबंधित नागरिक ती झाडे तोडण्यात नगरपरिषद प्रशासनाकडे कळवूनही ती धोकादायक झाडे तोडली गेलेली नाहीत. ती तत्काळ तोडावीत. या सह अन्य विषयांवरही चर्चा झाली.
वेंगुर्ले शहरातील काही झाडे खूप धोकादायक बनली आहेत. प्रवीण सातार्डेकर यांनी आपल्या शेजारील झाड धोकादायक आहे ते तोडा असे दोन वर्षापासून सांगत आहेत. तरी पण ते झाड तोडले जात नाही. कुणाचा जीव गेल्यावर हे धोकादायक झाड तोडणार का? असा संतप्त सवाल प्रशांत आपटे यांनी केला. धोकादायक झाडे तोडली गेली नाहीत आणि कुणाच्या जीवावर बेतले तर मी नगरपरिषदेवर गुन्हा दाखल करणार असा इशाराही त्यांनी दिला. गार्डनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी साहित्य नाही. त्याबाबत एका अधिकाऱ्याकडे याची जबाबदारी देण्याचे ठरले.
         सिंधुरत्न योजनेसह विविध शासकीय योजनांमधून मच्छी मार्केटचे विस्तारीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच पार्किंग व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न असल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितले. त्याचप्रमाणे वाढत्या पर्यटकांची गर्दी लक्षात घेता पर्यटनावर आधारित प्रकल्प आणण्याकडे नगरपरिषदचा कल आहे. झुलत्या पुलाला सुंदर अशी लाईट व्यवस्था, पर्यटकांना घेऊन जाण्यासाठी इलेक्ट्रिक रिक्षा, बंदर येथे महिलांसाठी स्वच्छतागृह अशी ही पुढील कामे होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
        शहरात नऊ वर्षा पूर्वी छोट्या पुलावर व्हर्टिकल गार्डन तयार केलेली. त्या गार्डनमधील झाड जिवंत आहेत पण त्यांची वाढ होत नाही. त्यामुळे मुख्य उद्देश सफल झालेला नाही. तीन फोगिंग मशीन न.प.चे आहेत पण त्यातील दोनच चालू आहेत. तरी नादुरुस्त मशीन दुरुस्त करून शहरात डास निर्मूलनासाठी त्याचा वापर करावा. नगरपरिषद  ३० टक्के कर्मचारी दारूच्या आहारी गेले आहेत. त्यांना सूचना द्यावी. तसेच दर महिन्याला सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करावी असे ठरविण्यात आले.

Leave a Reply