श्री स्वामी समर्थाचे अंतरंग शिष्य भक्तश्रेष्ठ महापुरुष श्री आनंदनाथ महाराज यांचा संजीवन समाधी उत्सव सोहळा कॅम्प येथील समाधी मंदिरात २० जून रोजी भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. आनंदनाथांचे पणतू सचिन वालावलकर यांच्या हस्ते लघुरुद्र, त्यानंतर स्वामी मठात आनंदनाथांची आरती व महाप्रसादाचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराजांचे परममक्त गुरुनाथ वालावलकर उर्फ आनंदनाथ यांनी आपले अवघे जीवन समर्थचरणी अर्पण केले. श्रीस्वामीदेवांनीही त्यांना अक्कलकोटास राहू दिले. त्यांची उपासना मार्गात पूर्ण तयारी झाल्यावर त्यांच्यावर स्वामी समर्थांनी कृपावर्षाव करीत, मुखातून आत्मलिंग पादुका काढून दिल्या होत्या. कॅम्प येथील याच मठात या आत्मलिंग पादुकांचे जतन केलेले आहे. दर गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत या आत्मलिंग पादुकांचे दर्शन भाविकांना घेता येते. आनंदनाथांनी याच श्रीस्वामी मठालगतच सन १९०३ साली वयाच्या ७३ व्या वर्षी शेकडो भक्तांच्या साक्षीने भूगर्भात मठीचे निर्माण करून त्यात सदेह प्रवेश केला व संजीवन समाधी घेतली. या संजीवन समाधीचा १२३ वा उत्सव सचिन गुरुनाथ वालावलकर यांच्या उपस्थितीत सापळे कुटुंबियांच्या सहकार्याने पार पडला.
