सकल हिंदू संमेलन उत्साहात

धर्म, परंपरा, संस्कृती व मूल्याचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी सकल हिंदू संमेलन समिती शिरोडा मंडल म्हणजे शिरोडा पंचक्रोशीने शिरोडा येथील गुरूवर्य वि.स.खांडेकर विद्या प्रतिष्ठानच्या गुरूवर्य अ.वि.बावडेकर विदयालय, बी.एम.गोगटे ज्युनिअर काॅलेजच्या पटांगणावर भव्य ‘सकल हिंदू संमेलन’आयोजित केले होते. यावेळी व्यासपीठावर प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे संगमेश्वर, वेदमूर्ती दत्तात्रय मुरवणे गुरुजी (मालवण),  समिती संयोजक प्रमोद नाईक, समिती सहसंयोजक प्रकाश रेगे आणि समिती सह संयोजिका सुहिता परब उपस्थित होत्या.
पारंपरिक वेशभूषा व स्फूर्तीदायक घोषणांनी शोभायात्रा ठरली. लक्षवेधी संमेलनापूर्वी माऊली मंदिर येथून पारंपरिक मंगल वेशभूषेत आणि ‘हिंदू धर्म की जय’ अशा स्फूर्तीदायक घोषणा देत निघालेली भव्य शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
हिंदूंनी जात पात विसरून हिंदू म्हणून एकत्रित येणे काळाची गरज बनली आहे. आपण संघटित नसल्याने आपल्यावर अन्याय होतो. परत परत पारतंत्र्यात जाण्याची वेळ यामुळेच आली. आता बदल व्हायला हवा. तरुण पिढीवर देशभक्तीचे संस्कार घरातून म्हणजे आई वडीलांनीच केले पाहिजे. तसेच आपणास स्वतंत्र कसे मिळाले त्यासाठी किती जणांनी बलिदान दिले याचा खरा इतिहास तरुण पिढी समोर आला पाहिजे, असे प्रतिपादन प्रवचनकार श्रीनिवास दिनकर पेंडसे यांनी केले.
संमेलनामध्ये उपस्थित सर्वच वक्त्यांनी मार्गदर्शन करताना संपूर्ण विश्वामध्ये आपला सनातन हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती सर्वात प्राचीन, अनुकरणीय आणि आदर्श मानली जाते. पाचशे वर्षे केलेल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेनंतर पुन:निर्माण झालेले राम मंदिर हा याच सनातन हिंदू संस्कृतीचा मानबिंदू आहे. प्रत्येक हिंदूसाठी ही आस्थेची आणि अभिमानाची बाब आहे.आजच्या स्थितीला आपला देश, धर्म, आणि संस्कृती पुढे धर्मातरण, लव्ह जिहाद, गोहत्या अशी अनेक आव्हाने उभी असलेली दिसून येतात अशा परिस्थितीत आपण हिंदू समाज म्हणून आपल्यातील सर्व प्रकारचे मतभेद विसरून एक होणे आवश्यक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हे संमेलन आयोजित केले असल्याचे नमूद  केले.
संमेलनामध्ये गीता पठण कु.कनक काळोजी हिने केले. तर सांस्कृतिक कार्यक्रमात समई नृत्य तसेच पोवाडा सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक जयवंत राय यांनी, परिचय रवींद्र पणशीकर यांनी, तर आभार प्रकाश रेगे यांनी मानले.  शेखर पणशीकर यांनी म्हटलेल्या पसायदानाने संमेलनाची सांगता झाली.

Leave a Reply