स्वर्णिम कोकण सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेने तुळस गावातील जकातनाका येथील दिव्यांग युवक सागर सुनिल तुळसकर याला व्हीलचेअर प्रदान केली आहे. यावेळी स्वर्णिम कोकणचे अध्यक्ष सूर्यकांत गोळम, सचिव यासीर मकानदार, सरपंच रश्मी परब, जि.प.सदस्य सुजाता पडवळ, सामाजिक कार्यकर्ते वैभव होडावडेकर, विक्रांत चुडजी, निलेश नागवेकर, साई परब, पिंट्या राऊळ, सुभाष सावंत, संतोष राऊळ, प्रदिप सावंत, संजय चुडजी, दर्शन तुळसकर आदी उपस्थित होते. अपंगत्वामुळे सागरला रोजच्या जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. पण या व्हीलचेअरमुळे त्याला स्वत:ची कामे करता येतील. घरातून बाहेर पडता येईल आणि तो आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकू शकेल. स्वर्णिम कोकण संस्था गेली अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा आणि गरजू, गरीब बांधवांसाठी नि:स्वार्थपणे कार्य करत आहे. तसेच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक मदत, अनाथ आश्रम आणि गरीब लोकांना सुद्धा मदत करत आहे. सागर तुळसकर याला व्हीलचेअर प्रदान करताना या व्हीलचेअरच्या रूपाने फक्त एक साधन मिळाले नाही, तर एका माणसाला जगण्याची नवी उमेद आणि आत्मविश्वास मिळाला आहे. संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे एक छोटेसे पाऊल त्यांनी आज उचलले आहे, असे मत सरपंच रश्मी परब यांनी व्यक्त केले.
