आपल्या पदाचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी न करता समाजकार्यासाठी कसा करावा, याचा एक नवा आदर्श मातोंड गावच्या सरपंच मयुरी वडाचेपाटकर यांनी घालून दिला आहे. त्यांनी स्वतःला मिळणारे सरपंच मानधन समाजकार्यासाठी खर्च करण्याचा एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. या स्वयंप्रेरणेतूनच पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल, मातोंड’ शाळेला एक ‘इन्व्हर्टर’ भेट म्हणून दिले आहे. यावेळी सरपंच मयुरी वडाचेपाटकर, उपसरपंच आनंद परब, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर केळजी, जिल्हा भाजप सोशल मिडीया प्रमुख श्रीकृष्ण परब, ग्रा.पं.सदस्य दिपेश परब, भाजपचे रविकिरण परब, सुभाष सावंत, युवा उद्योजक महेश वडाचेपाटकर, भाजप गाव प्रमुख सुधाकर परब, स्कूल कमिटी सदस्य रावजी परब, कृष्णा घाडी, राजेश सावंत, रुपक मातोंडकर आदी उपस्थित होते. आपल्या गावातील शाळेच्या सुविधेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरपंचांनी दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीबद्दल संपूर्ण तालुक्यातून आणि जिल्ह्यातून मयुरी वडाचेपाटकर यांचे कौतुक होत आहे.
