प्रा.अरविंद बिराजदार प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त

बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील उद्यानविद्या विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक अरविंद बिराजदार हे तब्बल ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर
सेवानिवृत्त झाले आहेत. यानिमित्त १७ जुलै रोजी महाविद्यालयातर्फे त्यांचा शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ.धनराज गोस्वामी, सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश चमणकर, जि.प.सदस्य संजय गावडे, निवृत्त अभियंता अनिल जाधव, कवी वीरधवल परब, पत्रकार महेंद्र मातोंडकर, नगरसेवक प्रशांत आपटे, माजी मुख्याध्यापक दादा सोकटे, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, पर्यवेक्षक डी.जे.शितोळे, व्यासायिक अभ्यासक्रम प्रमुख प्रा.डी.एस.पाटील, अधिक्षक संभाजी पाटील, संजय पाटील, प्रा.वामन गावडे, प्रा.एस.टी.भेंडवडे, संजू परब, सावळे व वामन धुरी यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, माजी विद्यार्थी, विद्यार्थी व हितचिंतक उपस्थित होते.
बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील गणित विभागाचे प्रा.जी. एस.पाटील यांच्या माध्यमातून प्रा. बिराजदार यांचा वेंगुर्ल्याशी संपर्क आला. तत्कालीन प्राचार्य एम.एच.कदम यांनी सुरू केलेल्या “कमवा आणि शिका” योजनेचा लाभ घेत त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि जीवनाला नवी दिशा मिळवली. उद्यानविद्या विषयात विशेष प्राविण्य मिळवत बी.एस्सी.ॲग्री पदवीसाठी प्रवेश मिळविला. आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही शैक्षणिक कर्जाच्या मदतीने त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ३ जुलै १९९२ रोजी त्यांनी बॅ. खर्डेकर महाविद्यालयात सेवेला सुरुवात केली. सेवाकाळात त्यांनी उद्यानविद्या विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कृषी व उद्यानविद्या विषयाची आवड निर्माण केली. नर्सरी व्यवसाय, कलम बांधणी, फळबाग विकास, आंबा, मिरी, दालचिनी यांसारख्या पिकांच्या लागवडीचे प्रशिक्षण देऊन अनेक विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचा मार्ग दाखविला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून प्रा. बिराजदार यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव केला. या कार्यक्रमास त्यांच्या पत्नी विरश्री बिराजदार, कन्या प्रीती बिराजदार तसेच सुपुत्र प्रबल बिराजदार उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना प्रा. बिराजदार यांनी आपल्या यशाचे श्रेय आई, कुटुंबीय, प्राचार्य एम.एच.कदम, सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी आणि महाविद्यालय व्यवस्थापनाला आणि शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर यांना दिले. खर्डेकर महाविद्यालयाने आयुष्य घडविले असून या संस्थेचे ऋण आयुष्यभर स्मरणात राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन डॉ. सचिन परुळकर यांनी केले. तर डॉ.डी. एस. पाटील यांनी आभार मानले

Leave a Reply