भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला यांच्यावतीने आयोजित भंडारी गौरव सोहळा व गुणवंत विद्यार्थी सन्मान समारंभ १८ जुलै रोजी साई दरबार हॉल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात भंडारी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव तसेच इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत विशेष यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद बांदेकर, उद्घाटक महादेव आंदुर्लेकर, पं.स.सभापती शंकर घारे, पं.स.सदस्य शीतल राऊत व साक्षी नार्वेकर, नगरसेवक प्रणव वायंगणकर, लीना म्हापणकर, गजानन गोलतकर, डॉ. गोविंद धुरी, श्रेया मयेकर, सुरेश बोवलेकर, जयराम वायंगणकर, रमेश नार्वेकर, विकास वैद्य, सदानंद केरकर, दीपक कोचरेकर, श्रेया मांजरेकर, राजेंद्र कांबळी, भरत आवळे, गुरुनाथ कांबळी, आत्माराम सोकटे, गोपाळ अणसूरकर आणि बाळू फटनाईक आदी उपस्थित होते. समाजातील शिक्षण, कला, उद्योग, समाजसेवा, संशोधन, विधी, प्रशासन आणि सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा मानपत्र, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये महादेव आंदुर्लेकर, रमेश नार्वेकर, डॉ.सचिन परुळकर, डॉ.गोविंद धुरी, शैलजा परुळकर, प्रा.शिवानी रोकडे, ॲड. उत्कर्षा गोडकर, ॲड.नेहा बांदेकर, सी.ए.जान्हवी अणसूरकर, विवेक तिरोडकर, रामा पोळजी, विश्वनाथ कांबळी, श्रावणी अरावंदेकर, ऋग्वेद गोडकर यांचा समावेश आहे. तसेच भंडारी समाजाचे प्रतिनिधित्व करीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले शंकर घारे, शीतल राऊत, साक्षी नार्वेकर, प्रणव वायंगणकर, लीना म्हापणकर यांचा मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
प्रा. डॉ.आनंद बांदेकर यांनी विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या मागे न धावता ज्ञान, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी यांचेही भान ठेवावे असे तर महादेव आंदुर्लेकर यांनी विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी तसेच विविध स्पर्धा परीक्षांकडे करिअरची सुवर्णसंधी म्हणून पाहण्याचे आवाहन केले. शंकर घारे यांनी भंडारी समाजातील विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचा अभिमान व्यक्त केला. खजिनदार सुरेश बोवलेकर यांनी भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाच्या कार्याचा आढावा घेत व्यासायिक शिक्षण घ्या, नोकरी देणारे बना असे आवाहन केले.
इयत्ता ५वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास भंडारी समाजातील ज्येष्ठ नागरिक, समाजबांधव, पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि विविध क्षेत्रांतील उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सचिन परुळकर यांनी तर आभार सचिव डॉ.गोविंद धुरी यांनी मानले.
