‘मल्टिस्पेशालिटी’ होईल पण गरिबांचे प्राण केव्हा वाचतील?

सिंधुदुर्गातील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचा तिढा न्यायालयात सुटल्याने आता तब्बल आठ वर्षांनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत वेगवेगळी नरेटिव्ह पसरवली जात आहेत किंवा पसरत आहेत. आमदार दीपक केसरकर समर्थक कार्यकर्त्यांच्या मते हा प्रश्न श्री. केसरकर यांच्यामुळे सुटला तर सावंतवाडी संस्थान समर्थकांच्या मते हा प्रश्न सावंतवाडीचे राजघराणे आणि श्री. खेमसावंत आणि दोन्ही राजघराण्यातील कुटुंबांमुळे सुटला. काहींच्या मते हा प्रश्न अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्ग या संस्थेच्या १३ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यामुळे सुटला. अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्ग ही संस्था मात्र या श्रेयवादात कुठेही पडलेली नाही. याबाबत इंग्रजीत असे म्हटले जाते, success has many fathers, failure is an orphan (यशाला अनेक धनी असतात पण अपयश नेहमीच पोरके असते) या न्यायाने पाहिल्यास या प्रश्नाचे उत्तर मिळते, पण अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्गने
याचे कधीच श्रेय घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. आता तर खरी लढाई पुढेच आहे. कारण जागेचा प्रश्न सुटला, तरी प्रत्यक्ष जागा ताब्यात घेणे, प्रशासकीय मान्यता, अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता, बजेट म्हणजे आर्थिक तरतूद, आणि त्यानंतर पुढे प्रत्यक्ष कामाला सुरुवात.. हा खूप मोठा टप्पा अजूनही कसोटी पाहणाराच आहे.
    त्यावेळी आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष सौ.श्रद्धा राजे भोसले, सावंतवाडी संस्थानचे बाळराजे खेमसावंत आणि सामाजिक संस्था संघटना यांनी हातात हात घालून हे सावंतवाडीकरांचेच नव्हे तर जिल्ह्याच्या अस्मितेच्या आरोग्य प्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाचे काम म्हणून एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि आता ती कसोटीची घडी आली आहे. तेव्हा गटातटात किंवा श्रेयवादात न राहता आपल्या
जिल्हावासीयांचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने एकजुटीने एकदिलाने काम करणे अत्यावश्यक आहे याची जाणीव असल्यानेच
अभिनव फाउंडेशनसारखी संस्था संघटना या श्रेयवादापासून कोसो दूर आहे आणि हे चांगले लक्षण आहे.
राज्यात आणि केंद्रातही महायुतीचे सरकार आहे. जिल्ह्यात ही तिच परिस्थिती आहे. महायुतीकडे पूर्ण बहुमत आहे. काही प्रकल्पांबाबत विरोधामुळे किंवा विरोधकांमुळे काम थांबले असे बचावाचे कारण सत्ताधारांकडे असते. परंतु आरोग्याच्या प्रश्नावर असे कोणतेच कारण देता येणार नाही. आरोग्य प्रश्न सोडवून जिल्ह्याचे गोवा बांबोळीवरील अवलंबित्व संपवावे ही कित्येक वर्षांची मागणी आहे तिथे तर कोणाचाच विरोध नाही उलट हा प्रश्न संपवावा ही एकसुरी मागणी आहे.
केवळ जागेचा प्रश्न सुटला म्हणजे आरोग्याचा प्रश्न सुटला असे म्हणता येत नाही.
आजही सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सक्षम ट्रामा केअर युनिट नाही. ट्रामा केअर युनिटमधील सर्वच्या सर्व पाच वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील १४ वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत. पूर्ण वेळ स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर नाहीत. अपघातात गंभीर जखमी व अत्यवस्थ रुग्णांना गोल्डन अवर्समध्ये स्टेबल करणारी यंत्रणा म्हणजे ट्रामा केअर युनिट तिच कागदावर आहे. २०१३ मध्ये शासन आदेशाने सावंतवाडीत ‘ट्रामा केअर युनिट’ मंजूर केले. तेव्हापासून अभिनव फाउंडेशनची जनहित याचिका आहे. आजही रुग्ण गोवा-बांबुळीला पाठवावे लागत आहेत. आजही गंभीर रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.  त्यावर तातडीने उपाययोजना व्हायला हवी. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत काय? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. शिवाय हॉस्पिटलची इमारत झाली आणि आज डॉक्टरच नसतील तर त्या नुसत्या इमारती राहतील असे होता नाहीये यासाठी सर्व राजकीय पक्ष सत्ताधारी संस्था संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते जिल्हावासीयांनी दक्ष राहायला हवे.
सावंतवाडी तालुक्याच्या आमसभेत याच आरोग्य प्रश्नावर निधी मिळत नसेल तर ‘भिक मागो आंदोलन करावे लागेल’ असा इशारा दिला गेल्याने काही सत्ताधारी कार्यकर्त्यांनी गदारोळ केला. अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले. ‘भिक मांगो’सारखे शब्दप्रयोग त्यांना झोंबले वा सावंतवाडीची लाज गेल्याचे नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न झाला. पण जेव्हा उपचाराअभावी एखादी माता-भगिनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या दारात तळमळत असते, रुग्णांना बांबुळीला पाठवावे लागते, वाटेत रुग्णांचा जीव जातो, तेव्हा सावंतवाडीची लाज जात नाही तर केवळ आंदोलनाच्या इशाऱ्याने लाज जाते अशा तकलादू अस्मिता आपण किती काळ कुरवाळत बसणार आहोत याचाही विचार करण्याची गरज आहे.
मात्र हा विचार येतो कुठून तर  ‘यथा राजा तथा प्रजा’ अशी जुनी म्हण आहे जसे दिल्ली मुंबईचे सत्ताधारी नेते वागतात त्याचेच हे अनुकरण नाही का? कारण देशस्तरावरचे प्रश्न मांडणारे देशविरोधी ठरवले जातात.
राज्याचे प्रश्न मांडणारे महाराष्ट्रद्रोही ठरवण्याचा पद्धतशीर प्रयत्न होतो.
यासाठी आय.टी. सेल नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवतो. तद्वतच तालुक्यातील गावातील प्रश्न आक्रमकतेने मांडणारे गाव व तालुकाविरोधी ठरवण्याचा हा प्रयत्न नाही का? मात्र आता जनता भुलणारी नाही. मेन स्ट्रीम मीडिया, चॅनल यापेक्षा ही आता सोशल मीडिया खूप प्रभावी झाला आहे. जेनझीच्या हातातले शस्त्रविदारक सत्य समोर आणल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्यावरही टीका होणार हे सत्ताधारी गटाने समजून घेत ही टीका विधायक पद्धतीने घ्यायला हवी अन्यथा हे मीडियाचे दुधारी शस्त्र त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही. हाच संदेश जेनझीने दिला आहे. आता तरी तो संदेश सत्ताधारी समजून घेतील एवढीच आपण आशा व्यक्त करू शकतो.
    आमदार केसरकर यांनी संयमाने आणि शांततेने आमसभा हाताळली. तशीच आता वेंगुर्ले तालुक्याची ही आमसभा होणे आवश्यक आहे. जी भूमिका केसरकर यांनी आमसभेत घेतली तशीच सर्वसामावेशक आणि सर्वांना बरोबर घेऊन एकजुटीने जिल्हावासीयांचा प्रश्न म्हणून आरोग्य प्रश्नांवर उपाययोजना करण्याची आणि सक्षम ट्रामा केअर युनिट करून गोरगरिबांचे प्राण वाचवण्याची भूमिका व्हायला हवी.

Leave a Reply