नमो उद्यानामुळे वेंगुर्ल्याच्या पर्यटनाला नवी ओळख मिळेल – पालकमंत्री

केंद्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेस नमो उद्यान विकासासाठी रुपये १ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार कॅम्प-भटवाडी येथील नगरपरिषद मालकीच्या जागेवर हे उद्यान विकसित करण्यात आले आहे. उद्यानात नागरिक व पर्यटकांसाठी आकर्षक प्रवेशद्वार, बैठकीची व्यवस्था, योग व व्यायामासाठी जागा, लहान मुलांसाठी खेळण्याची सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी, आकर्षक प्रकाश व्यवस्था, वृक्ष व फुलझाडांची लागवड तसेच सेल्फी पॉइंट अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून सोलर बेंच व पावसाचे पाणी साठविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
या नमो उद्यानाचे उद््घाटन ४ सप्टेंबर रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते फीत कापून व शिलालेखाचे अनावरण करून करण्यात आले. यावेळी आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, नगराध्यक्ष दिलीप गिरप, प्रांताधिकारी, तहसीलदार ओंकार ओतारी, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांसह नगरसेवक व अन्य उपस्थित होते.
वेंगुर्ला नगरपरिषद ‘आदर्श नगरपरिषद’ म्हणून काम करीत असून, पारदर्शक कारभारातून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेले नमो उद्यान हे जिल्ह्यातील उत्कृष्ट प्रकल्पांपैकी एक असून, यामुळे वेंगुर्ल्याच्या पर्यटन विकासाला नवी चालना मिळेल. शिरोडा येथे उभारण्यात येत असलेले ताज हॉटेल हे या
तालुक्यातील पर्यटन विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे वेंगुर्ल्यात येणारा पर्यटक अधिकाधिक काळ येथे कसा थांबेल आणि त्याला येथील पर्यटनाचा उत्तम अनुभव कसा मिळेल, यासाठी पर्यटनपूरक वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. नमो उद्यानासाठी पार्किंगसह आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात. तसेच उद्यानाची नियमित व दर्जेदार देखभाल करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी. नगरपरिषदेने विकासकामांसाठी चांगले प्रस्ताव तयार करून सादर करावेत, आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
आमदार दीपक केसरकर यांनी २० लाख रुपयांच्या निधीतून गोल होड्या अर्थात कोरॅकल बोटीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.प्रास्ताविकात नगराध्यक्षांनी न.प. च्या विविध विकासकामांची माहिती दिली.
नमो उद्यानाचे दर्जेदार काम केल्याबद्दल संबंधित कंत्राटदारांचा सन्मान करण्यात आला. तसेच उद्यानातील आकर्षक कमान व शिल्प तयार करणाऱ्या शिल्पकारांचाही गौरव करण्यात आला. उत्कृष्ट कामगिरीबद्दल नगरपरिषदेच्या अभियंता पथकाचाही सन्मान करण्यात आला.

Leave a Reply