क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आणि जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहांतर्गत १७ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला-कॅम्प येथे आदिवासी बांधवांसाठी विशेष आरोग्य शिबिर व शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तहसीलदार ओंकार ओतारी, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेणचे सहायक प्रकल्प अधिकारी विशाल घोरपडे, नगरसेवक गौरी माईणकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र लिलके, डॉ. सुप्रिया रावळ (आर.बी.एस.के.), आयुष अधिकारी डॉ. संजीवनी लंबे तसेच आरोग्य सेविका, औषध निर्माता, आरोग्य मित्र, पी.एम.डब्ल्यू. व मदतनीस उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहाचे महत्त्व विषद करून आदिवासी समाजाच्या आरोग्य, शिक्षण व सामाजिक विकासासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
आरोग्य शिबिरामध्ये आदिवासी बांधव, महिला व बालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आवश्यकतेनुसार औषधोपचार केले. तसेच दैनंदिन जीवनात आरोग्याची काळजी घेणे, स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या आयुष्मान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध आदिवासी कल्याणकारी योजनांची माहिती देऊन या योजनांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या आरोग्य शिबिराला आणि योजनाविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाला कॅम्प येथील आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
