वालावलकर रूग्णालयाच्या रक्तपेढीचा मुंबई येथे सन्मान

श्री स्वामी समर्थ रक्तपेढी मुंबई येथील ड्रग्ज इन्स्पेक्टर्स वेल्फेअर असोसिएशन (दिवा) या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मिरा रोड येथे पार पडलेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्याबद्दल डेरवण येथील बी.के.एल. वालावलकर रूग्णालयाच्या समर्थ रक्तपेढीचा विशेष सन्मान करण्यात आला. हा सन्मान रूग्णालयाच्या संचालिका डॉ.सुवर्णा पाटील यांच्यावतीने डॉ.सुनील नाडकर्णी, डॉ.सुनीता झुंजारवाड आणि गिरीश गुरप यांनी ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’चे डॉ.राजीव सिंग रघुवंशी यांच्या हस्ते स्वीकारला.
वालावलकर रूग्णालयाची रक्तपेढी सन २०००पासून कार्यरत असून, कोकणातील रूग्णांना सर्व प्रकारच्या रक्तघटकांची उपलब्धता करून देत सातत्याने महत्त्वपूर्ण सेवा बजावत आहे. या कार्यात वरिष्ठ रक्तपेढी तज्ज्ञ डॉ.सुनीता झुंजारवाड व रवी अग्रवाल यांनी विशेष योगदान दिले आहे. या रक्तपेढीमध्ये अत्याधुनिक सुविधा व आधुनिक उपकरणे आहेत. दरवर्षी सुमारे ६ हजार रक्तघटक प्रक्रिया, २५ पेक्षा जास्त रक्तदान शिबिरे व ३ हजारपेक्षा अधिक अॅनिमिया रूग्णांना मदत केली जाते. सन २०१२ साली झालेल्या लेप्टोस्पायरोसिस व डेंग्यू साथीच्या काळात प्लेटलेट्स कमी झालेल्या रूग्णांसाठी ही रक्तपेढी आधार ठरली. प्रसूतीनंतर होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे त्रस्त असलेल्या शेकडो मातांचे आणि अपघातग्रस्त रूग्णांचे प्राण वाचविण्यास ही रक्तपेढी सक्षम ठरली आहे.

Leave a Reply