कचरा वर्गीकरणाबाबत नवीन मार्गदर्शक सूचना 

घनकचरा अधिनियम २०२६ अंतर्गत कचऱ्याचे ४ प्रकारात वर्गीकरण करण्याचे शासनाचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार वेंगुर्ला  शहरातील नागरिकांनी २ ऐवजी ४ प्रकारात कचरा वर्गीकरण करून द्यावा. याबाबत नगरपरिषदमार्फत, विविध संस्था, नागरिक तसेच घंटागाड्याद्वारे नियोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी या नवीन शासन आदेशाचे पालन करून वेंगुर्ला शहर अधिक स्वच्छ सुंदर होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी ९ जून रोजी आयोजित बैठकीत केले. दरम्यान, २१ जून रोजी नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह येथे “जागतिक योग दिन” साजरा करण्यात येणार आहे. यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, विषय समिती सभापती  गौरी माईणकर, सचिन शेट्ये, युवराज  जाधव, उपसभापती रिया केरकर, योग प्रशिक्षक डॉ.वसुधा मोरे तसेच नगरसेवक, नगरसेविका, विविध संस्था प्रतिनिधी, व्यापारी, तसेच अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. २१ जून रोजी जागतिक योग दिनबाबत डॉ. वसुधा मोरे यांनी माहिती दिली. यावेळी नागरिकांनी विविध सूचना मांडल्या. कार्यक्रमांची सुरुवात नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. सूत्रसंचालन श्री. परुळेकर यांनी केले.

Leave a Reply