जगभर लोक वारकऱ्यांचे अभिनंदन, कौतुक करत आहेत. पंढरीनाथही मनापासून आपल्या लेकरांचे कौतुक करत असेल. आम्ही मनापासून वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. करोनाच्या अचानक उद्भवलेल्या, भयानक वेगाने पसरणाऱ्या, सांसर्गजन्य आजाराच्या जागतीक संकटात पंढरीची पायी आषाढी वारी व विठुरायाचे दर्शन करता येणार नाही, ते अत्यंत धोकादायक ठरू शकेल असे सरकारला वाटले. त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकऱ्यांनीही सरकारच्या आवाहनाला योग्य प्रतिसाद दिला. पायी वारीची परंपरा शेकडो वर्षांची अाहे. तरी लोकांना विषाणूचा संसर्ग होऊ नये, कुणाचा जीव धोक्यात येऊ नये, कुणाला पीडा होऊन आपण पापाचे धनी होऊ नये हा संतांचा विवेकी निवाडा वारकऱ्यांनी संयमाने पाळला.
पाप हे परपीडा ॥
             तुकाराम महाराजांनी पापाची व्याख्या हीच केलेली केलेली नाही काय?
         मानवी शरीर अर्थात इह लोकीचा हा देह हे परमार्थाचे एकमेव साधन आहे. हा देह अत्यंत दुर्लभ असून स्वर्गातील देवही याची इच्छा करतात –
स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा ।
मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा ॥
या देहानेच सच्चिदानंद पदवी प्राप्त करता येते. म्हणून हा देह उत्तम आहे. तुकाराम महाराज म्हणतात –
शरीर उत्तम चांगलें।
शरीर सुखाचें घोंसुलें ।
शरीरें साध्य होय केलें ।
शरीरें साधलें परब्रम्ह ॥
       या देहानेच भक्ती करता येते. पंढरीची पायी वारी करता येते, संतांच्या संगतीत नामगजरात नाचता येते आणि विठुरायाला भेटता येते.
       असे हे मुल्यवान शरीर मुद्दाम जाणून बुजून धोक्यात घालणे आणि अविचाराने फेकून देणे म्हणजे आत्महत्याच! हे तर अविचाराने जीव देणे होईल. संतांना हे मान्य नाही. तुकाराम महाराज काय म्हणतात पहा –
न लगे द्यावा जीव सहज चि जाणार ।
आहे तो विचार जाणा कांहीं ॥
मरण जो मागे गाढवाचा बाळ ।
बोलिजे चांडाळ शुद्ध त्यासी ॥
तुका म्हणे कई होईल स्वहित ।
निधान जो थीत टाकुं पाहे ॥
अभंगाचा भावार्थ असा – जीव मुद्दाम द्यावा लागत नाही, कारण तो कधीतरी सहजच जाणार आहे, हे मुळचेच ठरलेले आहे. तेव्हा जीव देण्यापेक्षा स्वहिताचा विचार करणे गरजेचे आहे हे तुम्ही समजून घ्या. जो स्वतःचे मरण मागतो, तो गाढवाचे बालक आहे व एवढेच नव्हे तर तो शुद्ध चांडाळ आहे असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात, जो नरदेहासारखा जवळ असणारा ठेवा टाकूं पाहतो, त्या मूर्खाला असे कळत नाही की, या देहापासून आपले काही स्वहित, कल्याण होईल. आपण जर जिवंत राहिलो तर ह्या देहाने हरिभक्ति व संतसेवा होऊन भगवत्प्राप्ति होईल.
        त्यामुळे वारकऱ्यांनी आपल्या या नरदेहाला करोना सारख्या जीवघेणा आजार होऊ नये याचा प्रयत्न केला हे विवेकी वर्तन होय.
       जेव्हा संकट आले तेव्हा तुकाराम महाराजही पंढरीची वारी करू शकले नाहीत आणि त्यांनी पांडुरंगाला पत्र पाठविले. ज्ञानेश्वर माउली व नामदेवराय यांनी भारतभर तीर्थयात्रा केली आणि नामदेवराय तर तब्बल वीस वर्षे पंजाबात वास्तव्य करून होते. भौगोलिक अंतर आणि सातशे वर्षांपूर्वीची दळणवळणाची साधने यांचा विचार करता या कालखंडात पंढरीची पायी वारी घडली असेल काय? सावता महाराजही नियमीतपणे वारीला येत नसत. उलट देवच त्यांना भेटायला त्यांच्या मळ्यात जात असे. याची आठवण म्हणून आजही पंढरीनाथाची पालखी प्रतिवर्षी सावतोबांच्या भेटीला अरणला जाते.
         यावर्षी पायी वारीला जाता आले नाही तरी मनोमय वारी करता आली. काळ थांबत नाही. हे संकटही दूर होईल. पुन्हा पायी वारी करता येईल. हा विवेक वारकऱ्यांनी केला.
        संतश्रेष्ठ जनाबाईने उगीचच पंढरीचे वर्णन विवेकाची पेठ म्हणून केलेले नाही. संतांच्या या पेठेत विवेकाची देवाण घेवाण होते. संतांच्या संगतीत विवेकी वर्तन शिकता येते.
         आज या जगात सर्वात जास्त गरज कशाची असेल तर ती अशा संयमी विवेकी मानवी वर्तनाची. म्हणूनच वाटते की पंढरीच्या वारकऱ्यांना पुन्हापुन्हा वंदन करावे.
– देवदत्त दिगंबर परुळेकर, 9422055221

Leave a Reply

Close Menu