साहेब, आमचा आगामी एपिसोडचा विषय हा निमोआहे, आपण स्क्रिप्ट लिहून द्याल का? दोन वर्षापूर्वी माझ्या मोबाईलवर व्हाटसअप मेसेज येऊन पडला. वेंगुर्ला-दाभोली मधील कलाकारांनी क्यॅजूअल मालवणीहे यूट्यूब चॅनेल सुरु केले होते. थोड्याच कालावधीत ही वेब सिरीज लोकप्रिय झाली. त्यातील अस्सल मातीतील कलाकार, लोकेशन आणि बॉलीवूड /टॉलीवूड तोडीची फोटोग्राफीने मी फारच प्रभावित झालो होतो. माझे संजयची चावडीहे मालवणी व्यंगचित्राचे सदरही जोरात चालू होते. त्यामुळे क्यॅजूअल मालवणीटिमचे सदस्य मयूर वाईरकर यांच्याशी माझी ओळख झाली होती. मीही त्यांना तुमच्या वेबसिरीजसाठी काहीतरी लिहीण्याचा प्रयत्न करीन असे बोलून गेलो होतो. या टिम सोबत काम करायची संधी आली होती आणि ती मला दवडवायची नव्हती.

        आता गोची पुढेच आहे. माझा जन्म वेंगुर्ल्यातला. आयुष्याचा प्रारंभीचा काळ, माझी जडणघडण ही वेंगुर्ल्यातलीच त्यामुळे मी अस्सल वेंगुर्लेकर. मात्र अजूनही मी एकाही म्हाळाला जेवलेलो नाही. मित्रांकडून म्हाळाच्या गंमती जमती ऐकून होतो. पण प्रत्यक्ष अनुभव मात्र नव्हता. निमोही संकल्पना काय आहे. याबाबत मला व्यवस्थित माहितही नव्हते. मग या विषयावर स्क्रिप्ट ती काय लिहीणार? मग माझ्याच मनाने मला समजावलं सलिम जावेदला शोलेलिहिताना तरी कुठे दरोडे घालायचा अनुभव होता? तरी गब्बर सिंगचा प्रभाव अजुनही कमी झालेला नाही. मग इकडून तिकडून निमोया संकल्पनेबद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली.

      माझ्या घरातही मी मुंबईकर होईपर्यंत कधी म्हाळ घातलेला मला आठवत नाही. इथे स्वतःला एकवेळ जेवणाची भ्रांत होती. त्यात म्हाळ कुठे घालणार? सर्वपित्री अमावस्येला पितरना वाडी दाखवली की झालं. दुस-यांना जेऊ घालणे ही मालवणी संस्कृतीच म्हणा ना. किती तरी बहाणे आहेत घरात पत्रावळी उठवायच्या. गणपतीचे दिड, पाच, सात, ११ दिवस जेवढे दिवस असतील तेवढे दिवस रोज कुणी ना कुणी पावणा घरी जेवायला असतो, शेवटचा म्हामन्याचा दिवस तर जेवणावळीसाठी खास दिवस. कोकणातील म्हाळही तेवढेच प्रसिद्ध. वाढवाळ वगैरे अनेक बहाण्याने जेवणासाठी मालवणी लोक एकत्र जमत असतात. घरातील सुगरण बाया एवढ्या जेवणावळी उठवताना कधीच कंटाळा करत नाहीत.

       या म्हाळाला जेवणाचा पहिला मान निमकाराचा‘. याला निमोअसेही म्हणतात. तो जेवल्याशिवाय म्हाळात इतरांनी जेवायचे नसते. त्यामुळे या निमकाराला जेवायला यायला जरा उशीर झाला तर ब-याच गंमतीजमती घडतात. याचा आधार घेत मी ही स्क्रिप्टलिहायला घेतली. माझे काही असे मित्र होते ज्यांना कुणाकडे म्हाळाला नॉनव्हेज असते हे बरोब्बर माहित होते. त्यामुळे ते त्यांच्याकडे न चुकता (निमंत्रण द्यायला विसरले असले तरी) जेवायला जायचे आणि असा नॉनव्हेज जेवणाचा म्हाळ एखाद्याला चुकलाच तर तो हळहळत बसायचा. यातून ब-याच गंमतीजमती घडायच्या. तसा म्हाळवसामध्ये रोज कुणा ना कुणाकडे म्हाळ असायचाच. काळ्या वाटाण्याची ऊसळ, वडे काही ठिकाणी माशे हे आवडीचे पदार्थ असल्याने सर्वजण ताव मारुन जेवायचे. त्यामुळे म्हाळवसाव्यतिरीक्त इतर दिवशी कुणी जास्त प्रमाणात जेवताना दिसला तर, ‘म्हाळाचा जेयतय काय रेअसेही गंमतीने बोलतात.

      वेंगुर्ला शहरात तरी घरोघरी म्हाळ घातले जात नसत. काही ठराविकच घरात हे म्हाळघातले जायचे, मात्र, याची संख्या नक्कीच जास्त होती. पण आमच्या घरात गरीबीमुळे त्यावेळी कधी म्हाळ घातला गेला नाही. परंतु वर्षभर कधीही दारात कुणी भिक्षेकरी आला तर त्याला माझी आई मुठभर तांदुळ द्यायची. आई घरात नसेल आणि दारात भिक्षेकरी आला तर आम्ही पोर न चुकता त्याला मुठभर तांदुळ वाढायचो. जेवणाच्या वेळात जर दारात भिक्षेकरी आला तर आई आपल्या वाट्याचे दोन घास त्याला वाढायची. त्यामुळे आमच्या पितरांच्या आत्म्याला म्हाळात जेवण न घालताही शांती मिळाली असेल अशी आमची समजूत. आपल्या दारात कोण कुणाच्या रुपात येयत ह्या सांगाक येणा नाय. त्यामुळे भुकेलेल्याक पाहिलो अन्नाचो घास भरवक व्होयोहे आईचे वाक्य मला स्मरणात होते. इथेच मला या एपिसोडचा शेवट सुचला. पुढे चित्रीत होऊन हा एपिसोड युट्युब चॅनेलवर

आला. बराच लोकप्रियही झाला. काही तांत्रिक कारणाने डिलीट झाल्यावर पुन्हा जोमाने नव्याने प्रदर्शित झाला. स्थानिक कलाकरांनी अप्रतिम अभिनय करुन याची शान वाढवली. दोन्ही वेळा तो तेवढाच लोकप्रिय झाला. केवळ ७ मिनिटाच्या या एपिसोडमध्ये कोकणातल्या म्हाळातील गंमतीजमती यशस्वीपणे दाखवून जाता जाता एक संदेश देण्यात टिम यशस्वी झाली.

       यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे म्हाळाची धामधूम तेवढीशी दिसून येत नाही. यावेळी मोठ्या पंगती उठणार नाहीत त्यामुळे पहाटे उठून आपले स्वयंपाक कौशल्य दाखवण्याचे; रांधून वाढण्याचे सूख मिळणार नाही याची खंत या अन्नपूर्णांना नक्कीच असणार. तरीही यांची पितर तृप्त असतील. वर्षभर कोणत्या ना कोणत्या कारणाने कुणाला कुणाला तरी यांचेकडून अन्नदान झालेले असेल. याला कारण स्वतः अर्धपोटी राहून भुकेलेल्यांना पहिला घास द्यायची कोकणातील संस्कृती.

संजय गोविंद घोगळे (८६५५१७८२४७)

 

Leave a Reply

Close Menu