लगीन आणि कडक बुंधीचो लाडू

कुठेतरी लग्नसराई चालू होती. मंडपाला लावलेल्या झावळ्यांमधून आमची नजर मंडपाच्या आत भिरभिरत होती. जेवणाच्या पंगती बसल्या होत्या. वाढपी आग्रह करुन करुन वाढत होते. पत्रावळीवर भात, दाळ, उसळ, वडे, भाजी, साखरभात भराभर वाढला जात होता आणि तेवढ्याच वेगाने पत्रावळ रिकामी होत होती. मग आमच्यातील एक-दोन पोरं हळूच त्या पंगतीला जावून बसायचीत. वाढप्यांच्या हे अनाहुत पाहुणे लक्षात यायचे पण तरीही ते आनंदाने वाढत जायचे. मी पहिल्यापासूनच भीडस्त, त्यामुळे त्यांच्याबरोबर मंडपात जायची माझी हिमत नाही व्हायची. मंडपाच्या बाहेर मित्रांची वाट बघत उभा रहायचो. कधीतरी कुणीतरी लग्नघरातील यजमान हाताला धरुन मंडपात जेवायला बसवायचा. नाहीतर बहुतांशीवेळा मित्रांकडून त्या जेवणाचे वर्णन ऐकून तृप्त व्हायचो. साधारण ४०-४२ वर्षापूर्वीचा हा काळ. आम्ही बच्चे कंपनी खेळता खेळता कुठे लग्नाचा मंडप दिसतो का हे शोधत असायचो. पुढे समजायला लागल्यावर मात्र असले खेळ बंद झाले.

            अलिकडेच मुंबईत एका लग्नाला हजेरी लावली होती. कोविडच्या पार्श्वभूमीवर दोन्हीकडची मिळून केवळ ५० मंडळी होती. आजकाल लग्नाला जायचे म्हणजे या पन्नासाच्या मेरीटमध्ये यावं लागत. सुदैवाने मी या लग्नाच्या व-हाड्यांच्या मेरीटमध्ये बसत होतो. मोजकीच माणसं असल्याने जेवणासाठी मेाठ मोठ्या रांगा नव्हत्या. पदार्थांची मात्र रेलचेल होती. अनेक प्रकारचे स्वीट डिश होत्या तरीही नजर काहीतरी शोधत होती, लाडू मिसिंग होता. आहेर देऊन बाहेर पडताना, अरेच्या पानीपुरीचा सुध्दा स्टॉल होता. अरेरे..माझ्या आवडीच्या फ्लेवरचे आईस्क्रीम सुध्दा होते अशी मनाची घालमेल सुरु होती. परंतु आता पोटात जागा नसते, त्यामुळे चुटपूटत उगाच पु-या जास्त खाल्ल्या म्हणत हॉलच्या बाहेर पडून मार्गस्थ व्हायचे. नाही बाबा आमुचा त्या लग्नसराईत नवरीचा शालू किती हजाराचा होता, तिने दागिने किती घातले होते, वरमाई कशी मुरडत होती याकडे अजिबात लक्ष नसतो.

      आता हॉलवर लग्न किंवा लग्नाचे इव्हेंट या परंपरा अगदी खोलवर रुजल्यात. डोळ्याचे पारणे फिटवणारा थाट असतो एकेका लग्न समारंभाचा. लग्नात सर्वकाही असते हो, पण तो लग्नातला लाडू आता फक्त म्हणीमध्येच उरलाय. पूर्वी आहेराचे पाकिट (तब्बल सव्वा रुपया) देऊन मंचावरुन खाली उतरताना भला मोठा बुंदिचा कडक लाडू हातात ठेवला जायचा. त्याचे पॅकिग ऐपतीनुसार आकर्षक करण्याचा प्रयत्न असायचा. त्यामुळे का असेना एखादा तरुण / तरुणी लग्नाच्या वयाचा/वयाची झाल्यावर त्याला लगीन कधी न्हातय?‘ असे विचारण्या ऐवजी लाडू कधी दितय?‘ असे विचारुन त्रस्त केले जायचे.

            हा लेख लिहीताना एका हातात लाडू आहे. डॉक्टरांनी गोड खायला बंदी घातली असतानाही लाडू खायचा मोह आवरता येत नाही. फक्त हा लाडू चिरमुल्याचा आहे एवढेच. शेजारी आत्ताच कुठेतरी तुळशीचे लग्न लावून चिरमुल्याचे लाडू वाटले होते. तुळशीच्या लग्नात का होईना लाडवाची परंपरा जपली जातेय हे बघून बरे वाटले. तुळशीचे लग्न सुध्दा अलिकडे साधेपणाने होत नाहीत, फक्त जेवणावळी ठेवायचे तेवढे बाकी आहे. लहाणपणी दिवाळीनंतर तुळशीच्या लग्नाची धावपळ सुरु व्हायची. तुळस रंगवून तिला आकर्षक रुप दिले जायचे. बाजार ऊस, दिंडाची काठी, माणगो (बांबू), चिंचा, आवळे, चिरमुरे इत्यादी वस्तूंनी भरुन जायचा. मग घरातील एखाद्या लहान मुलाला नवरा करुन भटजी यथासांग लग्न लावून जायचा. मूठभर चिरमुल्यांच्या प्रसादावर बच्चे कंपनी तुटून पडायचीत. काही ठिकाणी या चिरमुल्याचे लाडू बनवून वाटले जायचेत.

              तुळशीचे लग्न झाले की, लग्नसराईचा मौसम सुरु झाला समजायचा. आजकाल लग्नासाठी हॉल उपलब्धतेवर लग्नाचा शुभमुहूर्त काढून दिला जातो ही बात अलहीदा. मी अगदी मोजक्याच लग्नसमारंभांना हजेरी लावली असेल तरीही लहानपणी वेंगुर्ल्यात पाहिलेल्या लग्नसमारंभाची तुलना यांच्याशी करताना राहवत नाही. बाजारात जाताना खर्डेकर रोडवर दत्त मंदिराच्या अलिकडे एक बोर्ड दिसायचा, इथे हार-तुरे आणि फोवे मिळतील. यांच्याकडेच लाऊड स्पीकर ही भाड्याने मिळायचा. सत्यनारायणाच्या पूजेपासून लग्नसराईपर्यंत सर्व कार्यक्रमांना हे गृहस्थ जाड भिगाच्या चष्मा लावून जुनी दुर्मिळ गाणी तबकडीवर वाजवताना अजूनही नजरेसमोर येतात. सत्यनारायणाच्या पूजेला ऐका सत्य नारायणाची कथाया प्रल्हाद शिंदेंच्या आवाजातील गाणे असू द्या वा लता मंगेशकर, आशा भोसले, सुधीर फडके वा अजित कडकडे यांचे निघालो घेऊनी दत्ताची पालखीअशी मंजूळ गाणी कानावर पडल्यावर वातावरण अगदी भारुन जायचे. लग्नात कावळा पिपारी वाजवता.सारखे धम्माल कोळीगीत वाजायचे. शिवाय काही दर्दभरी जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहासारखी गाणी काळजाला पीळ देत होती.

        असो त्या पाटीमधील हारतुरे हा शब्द मला कळला, पण फावे म्हणजे काय ते मला काही कळलं नव्हते. पण लग्नात पाहुण्यां च्या स्वागताला कागदाची गुलाबे दिले जायचीत त्याला फावे म्हणतात असे मला तेव्हा कुणीतरी सांगितलेले अजून आठवते. त्यावेळी बहुतांशी सर्व लग्ने मंडपात व्हायचीत. या मंडपांची सजावटदेखील कोकणातील नैसर्गिक साधनांनी सजवलेली असल्याने अधिक आकर्षक दिसायची. मंडपात बसायला लाकडी खुर्च्या असायच्यात. या आता दुर्मिळ झाल्यात. कागदी गुलाबाच्या फुलाने पाहुण्यांचे स्वागत केले जायचे. खुर्चीवर बसल्यावर पाहुण्यांची नजर भिरभिरायची ती थंडाच्या शोधात. मग बी बी स्वातीया लोकल कंपनीची विविध फ्लेवरची फेसाळती कोल्डड्रिंक्सची बॉटल पुढ्यात यायची. अर्थातच एका बॉटलवर कुणीच समाधानी न होता आरामात २-३ वेगवेगळ्या फ्लेवरच्या बॉटल फस्त केल्या जायच्या. नवीन कपडे/ठेवणीतील कपडे घालून इथे तिथे उंडारणा-या पोरांवर लक्ष ठेवता ठेवता गप्पा मारण्यात मश्गुल झालेले पाव्हणे मंडळी मंगलाष्टके सुरु झाल्यावर सरसावून बसायचे. मग सुरु व्हायची मंगलाष्टकांची चढाओढ, वाजंत्र्यांनी गलाबलाट केल्यावर जेवणाच्या पंगती सुरु व्हायच्या. हातात डिश वाटी घेऊन रांगेत उभे राहण्याचा तो जमाना नव्हता. लांबच्या लांब जमिनीवर पंगती बसून पत्रावळी मोजक्याच पदार्थांनी सजायच्या. दाळ-भात, उसळ, वडे, फणसाची भाजी आणि गोड पदार्थ म्हणून हमखास साखर भात असायचा.

      ग्रामीण भागात अजूनही ही परंपरा जोपासली जात असली तरी मुंबई सारख्या शहरी भागात चायनीज, पंजाबी, साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन पदार्थामध्ये माझ्यासारखा फणसाची भाजी आणि साखरभात शोधत असतो तेव्हा सुटाबूटात असून सुध्दा गावठी ठरतो. असो पण कडक बुंदीचा भलामोठा लाडू आणि साखरभात आठवणीत का होईना अजून जीवंत आहे.       संजय गोविंद घोगळे (८६५५१७८२४७)

 

Leave a Reply

Close Menu