चले चलो..!

तुम्ही कधी एखादी टेकडी किवा डोंगर चढायला गेला आहात? आपण जेव्हा शेवटच्या टप्प्यात चढत असतो तेव्हा असं वाटायला लागतं की आता ह्यापुढे चढणं आपल्याला नाही जमणार पण नेमकं त्याचवेळी ग्रुपमधलं कुणीतरी आपल्या पाठीवर थाप टाकून म्हणतं, ‘चल थोडंसच राहीलंय.आणि तेच दमलेले पाय ओढत आपण परत चालायला लागतो. यावेळी आपल्याला तो शेवटचा टप्पा पार करायची ताकद देते ती, ‘पाठीवरची थाप‘ – ते प्रोत्साहन!

      प्रोत्साहन (Motivation) म्हणजे एखादं काम किवा आपलं ध्येय आपण पूर्ण करावं यासाठी वाटणारी ऊर्मी. ही ऊर्मी आपल्याला काही आंतरिक (Intrinsic) किवा बाह्य (Extrinsic) गोष्टींमुळे वाटू शकते. उदा. मी माझ्या क्षेत्रातल्या एका नवीन कोर्सला प्रवेश घेतलाय. कारण, मला माझ्या क्षेत्रातल्या नवीन गोष्टी शिकायच्या आहेत तर हे झालं आंतरिक प्रोत्साहन आणि मी तो कोर्स पूर्ण केला की माझं प्रमोशन होऊन माझा पगार वाढणारे हे झालं बाह्य प्रोत्साहन. आता ह्यात चूक बरोबर असं काहीच नाहीये. जर आपल्याला एखादं ध्येय पूर्ण करायचं असेल आणि त्यासाठी प्रोत्साहनाची गरज वाटत असेल तर आंतरिक किवा बाह्य कुठल्याही गोष्टीने ते आपल्याला मिळत असेल तर ते आपण घेतलं पाहिजे. फक्त असं करताना प्रोत्साहनाच्या ह्या दोन्ही प्रकारांचे फायदे -तोटे आपण समजून घेतले पाहिजेत. आंतरिक प्रोत्साहन निर्माण करणं हे आपल्या हातात असतं त्यामुळे त्यासाठी आपण कुणा व्यक्तीवर किवा परिस्थिती, वस्तूंवर अवलंबून नसतो. ते आपण स्वतः निर्माण केलेलं असल्यामुळे ते दीर्घकाळ टिकतं. मात्र ही अशी आंतरिक ऊर्मी निर्माण करणं हे तितकं सोपं नसतं हे आपल्याला सगळ्यांनाच माहितेय. नाहीतर दर सोमवारी ऑफिसला जाताना आपले पाय का बरं अडखळले असते? याउलट बाह्य प्रोत्साहन खूप चटकन प्रेरित करुन जात आणि ते खूप परिणामकारक पण असतं. परीक्षेत मार्क वाढले तर तुझं भविष्य उज्ज्वल होईल हे सांगितल्यावर ज्या जोमाने मुल अभ्यासाला लागते त्यापेक्षा मार्क वाढले तर तुला सायकल देईन म्हटलं की, आपोआपच जोर वाढतो. मात्र दरवेळी आपल्याला असं एखादं गिफ्ट, बक्षिस किवा प्रशंसा मिळेलच असं नाही. त्यामुळे बाह्य प्रोत्साहन मिळवण्यासाठी आपल्याला कायम दुस-यावर अवलंबून राहायला लागतं. शिवाय ते दरवेळी मिळेलच याची खात्री नसते. तसचं केवळ बाह्य प्रोत्साहनावर अवलंबून राहून आपण एखादं काम दीर्घकाळ करु शकत नाही कारण अशा बाह्य प्रोत्साहनातील नाविन्य खूप लवकर संपून जातं. त्यामुळे कुठल्या कामासाठी कुठल्या प्रकारे स्वतःला किवा इतरांना प्रोत्साहित करायचं ह्याचा सारासार विचार केला गेला पाहिजे.

          आपल्याला कितीही वाटतं असलं की, आपण कायम प्रोत्साहित राहील पाहिजे तरी ते अगदी अशक्य नाही पण कठीणच म्हटलं पाहिजे. सतत प्रोत्साहित राहणं हे ध्येय नसून, जेव्हा जेव्हा निराश, कंटाळवाण वाटेल तेव्हा तेव्हा स्वतःला किवा इतरांना प्रोत्साहित करता आलं पाहिजे, हे ध्येय असलं पाहिजे. काही वेळा आपण एखादी गोष्ट सुरु करताना खूप उत्साहात असतो आणि नंतर मात्र तो कमी कमी होत जातो, तर काहीवेळा एखादी गोष्ट सुरु करतानाच आपल्याला प्रोत्साहनाची गरज पडते. असं का होतं? आपला उत्साह जातो कुठे? ह्याची साधारणपणे दोन-तीन कारण सांगता येतील. पहिलं म्हणजे ते काम करण्यामागचं ठोस कारण आपल्याला सापडलेलं नसतं. कुणीतरी सांगतंय म्हणून, करायला हवं म्हणून आपण ते करत असतो आणि अशा तकलादू कारणांवर आपला उत्साह फार काळ तग धरु शकत नाही. कारण आपल्याला पटलेलं, आपल्या विश्वासाचं असेल तर उत्साह जात नाही असं नाही पण आपण स्वतःच तो परत आणू शकतो. दुसरं म्हणजे, हाती घेतलेलं काम हे आपल्या आवक्या बाहेरचं, आपल्याला दडपून टाकणारं असेल तर असं काम करताना तणाव येतो, निराशा वाढते आणि उत्साह निघून जातो. जर मला २ दिवसात २० पानी प्रबंध लिहून द्यायचा असेल तर मला प्रोत्साहन वाटण्यापेक्षा भीतीच जास्त वाटेल! आणि प्रोत्साहन जाण्यामागचं तिसरं कारण म्हणजे स्वतःवर विश्वास नसणे. जर मला सतत मला हे जमेल का, मी हे पूरे करु शकेन का अशा शंका येत असतील तर साहजिकच मला त्यात उत्साह वाटणार नाही.

      हीच कारणं आपल्या स्वतःला किंवा इतरांना प्रोत्साहित कसं करायचं ह्याचे उपाय सुद्धा सांगतात. जर आपल्याकडे एखादं ठोस कारण नसेल तर स्वतःला किंवा इतरांना प्रोत्साहित करण्यासाठी एखादं कारण निर्माण केलं पाहिजे आणि ते कारण चूक किंवा बरोबर पेक्षा ते कारण मला पटणारं असायला हवं. उदा. मला रोज व्यायाम करायची सवय लावून घ्यायचीय तर ह्यासाठी आरोग्य चांगलं राहील वगैरे ही कारणं आहेतच पण ती मला पटतायत का? जर नसेल तर ज्याने मला व्यायाम करायला प्रोत्साहन मिळेल असं कारण मी शोधलं पाहिजे. जे कदाचित मला माझे जुने छान कपडे घालता येतील हे सुद्धा असू शकतं. जर मी हाती घेतलेलं काम माझ्या आवाक्या बाहेरचं असेल, तर मला प्रोत्साहित करायला मी ते छोट्या छोट्या कामात विभागलं पाहिजे. उदा. खूप पसारा झालेली माझी खोली आवरायची असेल तर मला धडकी भरणारच ना! हे एकाच वेळी करण्याऐवजी मी रोज एक कोपरा आवरायचा ठरवला की मुळातच मला हे अशक्य काम शक्य वाटायला लागतं आणि एक कोपरा आवरुन झाला की आपोआपच मला प्रोत्साहन मिळतं. जर मी हे काम करु शकेन का अशी मला सतत शंका येत असेल तर मी सुरुवातीला उल्लेख केलेली प्रोत्साहनाची थाप आपणच आपल्या पाठीवर मारुन घेतली पाहिजे. आपण याआधी असं एखादं काम केलं असेल तर स्वतःला त्याची आठवण करुन दिली पाहिजे. आपण एखाद काम लक्षात राहावं म्हणून फोनवर कसे रिमाईंडर्स लावतो तसे काही प्रोत्साहनाचे सुद्धा रिमाईंडर्स उपयोगी पडतात. म्हणजे एखादं वाक्य किवा चित्र जे आपल्याला प्रोत्साहित करतं, ते आपल्या सतत डोळ्यासमोर ठेवलं किंवा अधून मधून एखादं प्रफुल्ल असं गाणं ऐकलं तर प्रोत्साहन मिळायला मदत होते.

      आपल्याकडे सर्वसाधारणपणे असा एक समज दिसतो की प्रोत्साहन हे बाहेरुन मिळावं लागतं. म्हणूनच एखादा मुलगा अभ्यास करत नसेल तर घरातल्या कुणालातरी सांगितलं जातं की, ‘तू जरा त्याच्याशी बोल.मी सपुदेशक असल्यामुळे मला तर असं ब-याचदा सांगितलं जातं, ‘तुम्ही ह्याला  motivate करा!हे करणं अशक्य असतं असं माझं अजिबातच म्हणणं नाहीये. पण ज्या व्यक्तीला प्रोत्साहनाची गरज आहे त्याला देखील थोड आत्मपरीक्षण, थोडे प्रयत्न हे घ्यावे लागतात. प्रत्येक व्यक्तीचा उत्साह का जाईल ह्याची कारणं आणि त्यामुळेच तो कशाने परत येईल हे व्यक्तिपरत्वे बदलत असतं. कुणाला दुस-याच्या उदाहरणाने प्रोत्साहन मिळेल, कुणाला स्वतःच्या अपयशातून तर कुणाला एखादं पुस्तक वाचून! ह्याचा शोध घ्यायला मदत घेता येते पण शेवटी ते प्रोत्साहन माझ्या मनात मलाच निर्माण करावं लागतं. मी कितीही पुस्तक वाचली, लोकांना भेटले, भाषण ऐकले तरी जोपर्यंत मी स्वतःलाच एखादं ध्येय पूर्ण करायला तयार करत नाही तोपर्यंत ही मदत अधुरी ठरते.

      अगदी प्रांजळपणे सांगायचं तर गेल्या काही वर्षात प्रोत्साहन (Motivation) हा संकल्पनेला जरा जास्तच भाव दिला जातोय असं मला मनापासून वाटतं. व्यवस्थापन क्षेत्रात उपलब्ध झालेल्या वाढत्या संधींमुळे असेल किंवा त्यात त्यांना पूर्ण कराव्या लागणा-या विविध टार्गेटमुळे असेल. आजकाल सतत ह्या बद्दल बोललं जातं. Motivational speaker असा एक नवीन व्यवसायच निर्माण झालाय म्हटलं तरी हरकत नाही. ह्याचा अर्थ माणसाला प्रोत्साहन लागतच नाही किवा अशी भाषणं देणा-यांवर माझा रोष आहे असं अजिबातच नाही. पण यूट्युबवरचे सूर्य उगवणारे फोटो असलेले किंवा खेळाडू घामाघूम होऊन धावणारे व्हिडिओ बघून प्रोत्साहित होणं इतकं सोपं असतं तर काय हवं होतं! ह्या सगळ्यांची मदत नक्कीच होते पण जोपर्यंत मी हे करु शकेनअसं मला आतून वाटतं नाही तोपर्यंत ते तसं मला कोणी कितीही ओरडून सांगितलं तरी मला तेवढ्यापुरत भारी वाटतं पण त्याचा दीर्घकाळ परिणाम राहत नाही. तात्पर्य हे की प्रोत्साहित होण्यासाठी स्वतः मेहनत घेणं, विचार करणं हे ही तितकंच महत्त्वाचं असतं कारण घोड्याला आपण पाण्यापर्यंत नेऊ शकतो पण….     (साभार – मनोकल्पदिवाळी २०१९)

अतिथी-भक्ती करंबेळकर, मोबा. ९९२०८१५४०७

 

Leave a Reply

Close Menu