आयुष्याच्या वळणावरती अनेक माणसे आपणाला भेटत असतात आणि आपले जीवन घडवीत असतात. त्यांपैकी आपले मित्र किवा मैत्रिणी महत्त्वाची भूमिका बजावतात. इंग्रजीत A friend in need is a friend indeed अशी मित्राची व्याख्या केली आहे. परंतु या पेक्षाही दुसरी अधिक समर्पक व्याख्या आहे ती म्हणजä A friend is someone who dances with you in the sunshine and walks with you in the shadows. पहिल्या व्याखेपेक्षा दुसरी व्याख्या अधिक समतोल वाटते. पहिली व्याख्या एकतर्फी आहे. दुसरी तशी नाही हाच त्यातील फरक.

         जीवन प्रवासात जन्माबरोबर जशी आपली नाती जुळतात तशी कालौघात मैत्री जमते. परंतु सगळेच आपले जीवाभावाचे मित्र होऊ शकत नाहीत. काही तत्कालिक कारणासाठी जवळ येतात, कार्यकारणभाव संपला की दूर होतात. परंतु काही मित्र अखेरच्या क्षणापर्यंत आपल्या सोबत रहातात, सुखाच्या क्षणी सहभागी होऊन आनंद द्विगुणित करतात तर दुःखाच्या क्षणी पाठीवर आश्वस्त हात ठेऊन धीर देतात. त्यांचे मित्रप्रेम निर्व्याज व निःस्वार्थी असते. काही मित्र फक्त आपल्या कामापुरते मैत्रीचे नाटक करतात आणि कार्यभाग साधला की आपली ओळख आणि आपण केलेले उपकारही विसरतात.

        वेंगुर्ल्यात शालेय शिक्षण घेत असताना मला जीवाभावाचे असे तीन मित्र भेटले. आमची ही मैत्री गेली सुमारे ६०-६५ वर्षे अद्यापही अबाधित आहे. यातील एक ख्रिस्ती-मायकल डिसौझा, एक मुसलमान – शेख जैनुद्दीन आणि एक सारस्वत – यशवंत डांगी. त्यापैकी यशवंत प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर पोस्टमास्तर असलेल्या आपल्या वडिलांची बदली अलिबागला झाल्याने तिकडे निघून गेला. परंतु त्याच्याशी असलेली मैत्री पत्रव्यवहाराने कायम टिकली. तो पुढे सीए झाला. मोठ्या कंपनीत लट्ठ पगारावर नोकरीला लागला. मुंबईत स्थिर झाला. त्याचे कुलदैवत कवळेची श्री देवी शांतादुर्गा. त्यामुळे दर २ वर्षांनी तो आपल्या परिवारासह देव दर्शनाला यायचा. त्यावेळी आमची भेट व्हायची. अधूनमधून मी मुंबईला त्याच्याकडे जायचो. पण दुर्दैवाने १ ऑक्टोबर १९९७ रोजी केवळ वयाच्या ५०व्या वर्षी त्याचे हृदयविकाराने निधन झाले आणि मी एका जीवाभावाच्या मित्राला मुकलो.

       दुसरे दोघे मात्र शालांत परीक्षेपर्यंत सोबत राहिले होते. पुढे मायकल मध्यपूर्व देशात नशीब काढायला गेला तर जैनुद्दीन आपल्या वडिलांच्या पारंपरिक व्यवसायात (शोभेची दारु व फटाके बनविणे) गुंतला आणि मी नोकरीसाठी गोव्यात आलो. ही गोष्ट अमिताभ बच्चन, ऋषी कपूर व विनोद खन्ना यांची एकत्र भूमिका असलेल्या अमर-अकबर-अॅन्थोनीहा सिनेमा येण्यापूर्वीची आहे. अन्यथा आमची दोस्ती बघून कुणीही आम्हालाच  अमर, अकबर, अॅन्थोनीम्हणाले असते.

       परवाच बहारीनवरुन मायकलचा फोन आला. जवळ जवळ ३० वर्षानी आम्ही एकमेकांचा आवाज ऐकत होतो. आम्हां दोघांनाही किती बोलू आणि किती नको असे होऊन गेले होते. माझा हा मित्र अत्यंत लाघवी, प्रेमळ, कधीच कुणाशी न भांडणारा, सर्वांना मदत करणारा व कमालीचा समजूतदार! पदवीधर झाल्यावर तो बहारीनला गेला. गेली ५० वर्षे तो तिकडे आहे. तिकडे गेला तरी तरी दर २ वर्षांनी तो आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गांवी यायचा. मी नोकरी निमित्त गोव्यात असल्याने त्याची भेट होत नव्हती. मात्र एकेदिवशी तो माझा पत्ता शोधत मी राहत असलेल्या ठिकाणी आला आणि आम्हां सर्वांनाच आनंद झाला. या मधल्या काळात ब-याच घटना घडून गेल्या होत्या. माझा विवाह आणि नंतर पुत्र प्राप्ती झाली होती तसेच तो देखील संसारात गुंतला होता. या भेटीनंतर तो अनेकदा आला. येताना खेळण्यातील कोणती ना कोणती अभूतपूर्व इलेक्ट्राॅनिक वस्तू माझ्या लहान मुलांसाठी घेऊन यायचा!

      त्याचे सर्वात जास्त अप्रूप मला या गोष्टीचे आहे की, माझ्या मातोश्रीचे निधन १ जून १९८९ रोजी झाले हे कळताच तो त्वरित बहारीनहून माझ्या सांत्वनासाठी व धीर देण्यासाठी गोव्याला आला. मुंबईतील आमचे जवळचे नातेवाईक कळवून देखील आले नाहीत. पण या मित्राला कुणीतरी बातमी संगितली आणि तो इतक्या दुरवरुन धावून आला. मुंबईत असणारा माझा दुसरा मित्र यशवंत देखील माझ्या मातोश्रीला इस्पितळात दाखल केले आहे हे ऐकून दीड तासात विमानाने पोहचला होता. आपला काम धंदा सोडून तो आमच्याबरोबर ८ दिवस आम्हाला धीर देण्यासाठी थांबला होता. परंतु उपचारांना प्रतिसाद न देता मातोश्री देवाघरी गेली. मातृवियोग काय असतो हे त्या दिवशी कळले. परंतु माझ्या या जिवलग मित्रांनी माझ्या दुःखावर हळुवार फुंकर घातली.

          तिसरा मित्र जैनुद्दीन त्याची तर एक कमालीची चित्तर कथा ! माझी एक छोटीशी शस्त्रक्रिया म्हापसा येथील डॉ. गायतोंडे यांच्या इस्पितळात व्हायची होती. हे या मित्राला कळताच तो इस्पितळात हजर. मी म्हटले, ‘‘अरे जैनू, तू कशाला एवढी तसदी घेतलीस? तुला आहे गुढघे दुखीचा त्रास!‘‘ तो म्हणाला, ‘‘तुला शस्त्रक्रियेच्या वेळी रक्ताची गरज भासली असती तर?‘‘ त्याच्या या उद्गारांनी जात, धर्म, वंश या सगळ्या गोष्टींच्या शृंखला गळून पडल्या व डोळ्यात दाटून आले ते पाणी! मित्रप्रेम हे असे असावे!

      २४ मे १९८३ रोजी पणजीच्या रेसिडेन्सीमध्ये माझा विवाह झाला तेव्हां जैनुद्दीन आपल्या थोरल्या बंधूसह आतषबाजीच्या सामानासह अनपेक्षितपणे हजर झाला. स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्यासमोर आणि नंतर सांताक्रूझ येथील वरगृही झालेली ती आतषबाजी अद्भुतरम्य होती. आम्हांला तर आश्चर्याचा धक्का होताच पण वाड्यावरच्या लोकांनासुद्धा!

       शिक्षण खात्यातून प्रथम श्रेणी राजपत्रित अधिकारी या पदावरुन निवृत्त होत असतांना कार्यालयातर्फे माझा निरोप समारंभ ठेवला होता. जैनुद्दीन आपल्या या मित्राचा निरोप सोहळा कसा होतो हे पाहण्यासाठी मुद्दाम वेंगुर्ल्याहून आला होता. तो दैदीप्यमान सोहळा पाहून तो भारावून गेला. समारंभ संपल्यावर त्याने मला कडकडून मिठी मारली होती. या मिठीत काय नव्हते? मित्रप्रेम तर होतेच पण आदर, उत्साह, आनंद आणि कौतुक देखील!

        सरकारी नोकरीत असल्याने सदैव बदलीची तलवार डोक्यावर टांगलेली आणि पाठीवर कासवाचे बि-हाड हे ठरलेलेच. परंतु याचा फायदा असा झाला की ज्या गावात / शहरात गेलो तिथे किमान एक तरी कुटुंब माझ्या कुटुंबांपैकी एक झाले. मग ते पेडणेचे उत्तम कोटकर असो, वाळपईचे नंदा काणेकर यांचे कुटुंब असो, म्हापसा येथील जयवंत शिंक्रे नायक यांचे कुटुंब असो किवा पणजीचे प्रदीप एन. दाभोलकर यांचे कुटुंब. या सर्वांशी घरोब्याचे संबंध जुळले आणि कायम टिकले.

         सरकारी नोकरीत असतांना इतर अनेक लोक भेटले पण ते तेवढ्या पुरतेच. त्यांपैकी काही तर माझ्या प्रगतीवर असूयेने जळणारे होते. काही माझ्या कार्यात अडथळे निर्माण करणारे होते तर काही माझ्या विरुद्ध कारवाया करणा-यांना चिथावणी देणारे होते. अर्थात ते माझे मित्र नव्हतेच, मी त्यांना मित्र मानत होतो पण ते मित्र नव्हते, सहकारी होते हे खूप उशिरा ध्यानात आले. यातील अनेकांना मी वेळोवेळी मदत केली होती. माझ्या मातोश्रीच्या हातचे सुग्रास भोजन त्यांनी अनेकदा केले होते. पण तिच्या शेवटच्या आजारपणाच्या काळात ते फिरकले देखील नाहीत. ते सर्व कृतघ्न निघाले.

    आयुष्यात जीवाभावाचे जसे मैतर भेटले तसेच पाठीत खंजीर खुपसणारे नमक हराम देखील! परंतु या अशा अनुभवातूनच माणसाचे जीवन घडतं असते आणि समृद्ध होत असते.                        – ज.अ.रेडकर, सांताक्रुझ-गोवा, पूर्वप्रसिद्धी-दै. गोमंतक

 

 

Leave a Reply

Close Menu