शालेय जीवनात अलंकारीक भाषेमुळे तसेच रुपक कथांमुळे वि. स. खांडेकर मला आपलेसे झाले होते. कितीतरी वाक्ये, परिच्छेद यांचा वापर माझ्यासारख्या अनेक जणांनी शाळकरी वयात वक्तृत्व, निबंध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त वापरले असतील. छोट्या छोट्या वाक्यांमधून जीवनातील तत्त्वज्ञान मांडणाऱ्या वि. स. खांडेकरांची 11 जानेवारी रोजी 123 वी जयंती. एक प्रसिद्ध ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक आपल्या इथल्या मातीत असावेत. त्यांचे लेखन साहित्यातील भरीव कार्य याच क्षेत्र्ाात राहून त्यांनी करावे, त्याचा अफाट नावलौकीक व्हावा आणि या साहित्याविषयी ओढ, आस असूनही आपण मात्र्ा, त्यातील काहीच न अनुभवावं; हिच खंत बऱ्याच दिवसांपासून मनाशी होती. म्हणून त्यांच्या जन्मदिवशी शिरोडा येथील अ. वि. बावडेकर विद्यालयात त्यांच्या साहित्यकृतीच्या गौरवार्थ उभारलेल्या स्मारकाला भेट दिली. त्यावेळी

‘जिविचा जिव्हाळा, अंतरी पोचावा,   अंतरीचा देव या मंदिरी दिसावा,

ओंजळीतली फुले त्याजवळी समर्पिता,  तृप्त मनी झाले तुमचे कर्तृत्व पहाता’

      अशी माझी व माझी सखी प्रितम ओगले हिची अवस्था झाली. आणि सहजपणे प्रितमने हे स्मारक पाहून वरील ओळी शब्दबद्ध केल्या.

         कितीतरी साहित्यिकांनी वि. स. खांडेकर यांच्याबद्दल लिहिले असले तरी विकीपीडियावर आम्ही माहिती पाहायचो, तेव्हा 1920 ते 1938 अशी 18 वर्ष त्यांचे वास्तव्य शिरोड्यात होते. त्यानंतर चित्र्ापटसृष्टीतील कथा-पटकथा लिहिण्यासाठी ते कोल्हापूर येथे आले, असा संक्षिप्त उल्लेख आहे. त्यांच्या शिरोड्यातील वास्तव्याविषयी अधिक माहिती नाही. परंतु खांडेकर यांचे शिरोडा येथील स्मारक पाहून त्यांचे वास्तव्य जिवंत वाटावे इतके हुबेहूब चित्र्ण येथे साकारले आहे. त्यांनी केलेले निस्वार्थी ज्ञानदान, मुलांबरोबरीने मुलींनाही शिकता यावे यासाठीची धडपड, हा सगळा इतिहास प्रतिकात्मक रुपात मांडला असल्याने नकळत आपण त्या काळात गुंतत जातो. शिरोड्यातील वास्तव्यात त्यांचे लेखन बहरले, नावाजले, त्यांच्या लेखनामुळे अनेक मान्यवर साहित्यिक शिरोड्यात आले, हे सर्व या स्मारकातून जाणून घेताना आम्हाला थक्क होत भारावून जायला होत होते….

परि एक एक जो नवा शब्द तूं शिकशी  शक्ती तयाची उलथिल सर्व जगाशी!-

 पठन तर करीं त्याचें,  बाबा!  जग हे बदलायचे!

      या कवी केशवसुतांच्या कवितेच्या ओळींनी प्रभावित झालेले, महात्मा गांधीजींचा ‘खेड्यांकडे चला’ हे मनावर बिंबलेले वि. स. खांडेकर तसे योगायोगानेच शिरोडा येथे आले. सन 1913 मध्ये मॅट्रि कला महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या 10 त आलेले खांडेकर फर्ग्युसन कॉलेजमध्ये इंटरच्या वर्गात शिकत होते. वडील अंथरुणावर खिळलेले, महाविद्यालयीन शिक्षण देण्याची घरची परिस्थिती नसल्याने त्यांना दत्तक म्हणून सावंतवाडीतील नानेली गावात चुलत्यांना दिले गेले. या वडिलांना आपल्या दत्तक मुलाने सावकारी करण्यासाठी वकिली करणारा वारस हवा होता. पण मूठभर माणसांनी कुणीतरी पूर्वजांनी बऱ्यावाईट मार्गाने मिळविलेल्या जमिनीवर स्वामित्व सांगत गरीबाच्या मुखाचा घास घेणं हे काही खांडेकर यांच्या संवेदनशील मनाला पटणारं नव्हतं, त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच या वडील व दत्तक मुलामध्ये दरी निर्माण झाली. आपल्या मनाजोगत शिक्षण मिळणार नसेल तर स्वावलंबी होऊन स्वतंत्र्ा जगावं अशी ईर्षा त्यांच्या मनात निर्माण झाली. दरम्यान त्यांच्या लेखन शैलीमुळे लेखक म्हणून त्यांचा नावलौकिक प्रकाशात येत होता. त्यामुळे शिरोड्यातील अ. वि. बावडेकर यांच्या ट्युटोरीयल इंग्लिश स्कूल मधील शिक्षक घनश्‍याम आजगावकर यांना वि. स. खांडेकर सावंतवाडीत असल्याबाबत समजले आणि जून 1920 मध्ये सुरु होणाऱ्या 5 वीच्या वर्गात इंग्रजी-संस्कृत शिकवायला येण्याची विनंती करण्यासाठी ते खांडेकर यांना भेटले. त्यांनीही शिरोडा हे खेडं आहे याची खात्र्ाी केली आणि 12 एप्रिल 1920 रोजी सावंतवाडीतून चालत शिरोड्याला आले. शिरोड्यात येण्याचे कारण सांगताना ते त्यांच्या आत्मकथेत लिहितात, एका शाळेसाठी आपण शिरोड्याला जात होतो, शाळा हा तर सुधारणांचा आत्मा! कोकणातील दारिद्र्य, धर्मभोळेपणा, अज्ञान त्यांनी पाहिला असल्याने येणाऱ्या पिढीने या विषारी विश्‍वात गुरफटू नये म्हणून त्यांना सुधारण्यासाठी सर्व शक्तीनिशी धडपडायचं या ध्येयाने ते शिरोड्यात आले. तेव्हा हातातील पिशवीत केशवसुतांच्या कविता हे पुस्तक, विशी बावीशीतील शरीराने अत्यंत कृश देहयष्टी असलेले, जाड भिंगाचा चष्मा, शर्ट, पंचा नेसलेल्या पेहरावात शिरोड्यात पोहचले, तेव्हा ‘ह्यो रे काय शिकवतलो पोरांका’ असा बेरकी प्रश्‍न शिरोडावासीयांच्या डोळ्यात दिसत होता. पण आपल्या अमोघ वाणीने त्यांनी तेथील मुलांना आपलेसे केले. हळू हळू त्यांच्या लक्षात आले की आपले विद्यार्थी पाडपी, भारवाले, गाबीत, शेतकरी समाजातील आहेत, जे अठराविश्‍व दारिद्र्‌यात असल्याने दोन वेळच्या जेवणाची भ्रांत तिथे शाळेची फी भरुन घेणंही मुष्कीलीचे आहे. म्हणून त्यांनी गरीब विद्यार्थी फंड काढला. मुलांसोबत गावातील समविचारी लोकांना  सोबत घेत गावोगावच्या जत्र्ाांमध्ये फिरून देणगी गोळा केली. पैशाच्या अभावी हुशार विद्यार्थ्यांच्या आयुष्याची नासाडी होताना पाहून त्यांचे मन कष्टी होई, तुटपुंज्या त्यातही हप्ताने होणाऱ्या पगारात ते गरीब विद्यार्थ्यांसाठी मदत करीत. अशाच एका विद्यार्थ्याला जन्मभर हातात नांगर नको म्हणून घरातून पळून जाण्याचा गुरुमंत्र्ाही दिला होता. त्यांच्या या शिष्यानेही शिक्षणाच्या तळमळीने स्वावलंबनाने संस्कृतची पीएचडी मिळवली. अभ्यासक्रमाबाहेर जाऊन मनसोक्त शिकविण्याकडे त्यांचा कल होता. मुलांसाठी ग्रंथालय, जिमखाना, क्रिकेट, बालवीर पथक (स्काऊट) त्यांनी सुरु केले.

      एप्रिल 1920 मध्ये ते शिरोड्यात आले आणि जून जुलै मध्ये ते हेड मास्तर झाले, तेव्हा शाळेची इमारत नव्हती. त्यांनी बांधायची ठरवली तेव्हा त्यालाही त्यांना नाउमेद करणारे अनेक प्रसंग झाले, प्रसंगी तर शाळा जाळू, समुद्रावर एकटे फिरायला जाताना मारू अशा धमक्याही त्यांना आल्या. पण मोठ्या धीराने या सर्वाला सामोरं जात शाळेची इमारत उभी झाली. खांडेकर शिक्षक आणि लेखक म्हणूनही प्रसिद्ध होत असल्याने या शाळेला अनेक मान्यवर साहित्यिकांनी भेटी दिल्या, तिथे व्याख्यान होत ज्यातून शाळेचा नावलौकिकात भरच पडत होती.

      सनातनी वातावरणात राहूनही त्यांचे मन व्यापक व पुरोगामी राहिले. ब्राह्मण, ब्राह्मणेत्तर अस्पृश्‍य हे कृत्र्ािम सामाजिक भेद त्यांना कधीच मान्य नव्हते. सारस्वत, मराठे यांच्या घरी पंक्तीला बसल्याने ब्राह्मण्याला बट्टा लागतो असल्या कल्पना त्यांच्या मनात नव्हत्या म्हणूनच सावरकर आणि अत्र्ो यांनी पुढाकार घेऊन सुरु केलेल्या झुणका भाकर सहभोजनात भाग घेण्यास त्यांचे मन कचरले नाही. अर्थात यासाठी शिरोड्यातील काही लोकांनी त्यांच्यावर बहिष्कारही घातला होता.

      शिरोड्यातील वास्तव्यात त्यांनी साहित्याच्या सर्व अंगांना स्पर्श केला. समीक्षा, लघुनिबंधकार, कथा, कादंबरी, आत्मकथा, नाट्यांक, कविता असे अनेक साहित्यप्रकार त्यांनी लीलया हाताळले.  छाया, ज्वाला या चित्र्ापटांनी तर ते पटकथाकार म्हणून नावारूपाला आले. शिरोड्यात असताना मडगाव येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले होते. 1938 मध्ये ते चित्र्पट लेखनासाठी कोल्हापूरला आले आणि तिथेच राहिले, इच्छा असूनही शिक्षक म्हणून पुन्हा शिरोड्याला जाणं घडलं नाही. ‘जया दडकर’ यांच्या ‘एक लेखक एक खेडे’ यात ते लिहितात, “शिरोड्याला येताना मी एक स्वप्न उराशी बाळगलेलं, ते स्वप्न मी सत्यसृष्टीत आणू शकलो नाही. कुठलंही ध्येय हा एखाद्याच्या उत्कट मनोवृत्तीचा धर्म असला तरी बरोबरीच्या लोकांचा सहज धंदा होऊ शकतो, याची बोचणी मनाला अस्वस्थ करी.” त्यावेळी विद्यार्थ्यांनी चाकरमानी होऊन नोकऱ्या न करता शिक्षण कार्याचा विस्तार करून खेडी सुधारायला हातभार लावावा अशी त्यांची इच्छा होती. पण त्यावेळेच्या परिस्थितीत पोटापाण्याची सोय अनिवार्य आणि या गोष्टी कोकणात दुर्मिळ त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेर नोकरीसाठी जावं लागे. आपल्या शिक्षणातून उद्योगधंद्याच्या शिक्षणाची जोड देता येईल का याचा प्रयत्न खांडेकर यांनी केला पण गरीबघरची स्वप्न त्याकाळी स्वप्नच राहिली. चित्र्ापटाच्या माध्यमातून केवळ मनोरंजन न देता शिक्षण देण्याच्या उद्देशाने ते या माध्यमाकडे वळले. पण शाळेचा व्याप सांभाळून त्यात तब्येतीच्या कुरबुरींमुळे शिरोड्यात राहून चित्र्ापटाचं काम झेपणार नसल्याने त्यांनी शिरोडा नाईलाजाने सोडलं. पण पुढे पुढे चित्र्ापट सृष्टीतील झगमगाटात न रमता साहित्य सृष्टीत ते दंगुन गेले. अनेक साहित्य संमेलने नाट्यसंमेलने गाजवीत गेले.

      1968 साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 1970 मध्ये साहित्य अकादमीने त्यांना फेलोशिप दिली. कोल्हापूर विद्यापीठाने ‘डी लिट’ पदवी बहाल करीत त्यांच्या वाङ्मयीन प्रतिभेचा सन्मान केला तर 1974 साली भारतीय साहित्यातील सर्वोत्कृष्ठ दिला जाणारा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ त्यांच्या ‘ययाती’ या कादंबरीला प्राप्त झाला.

      असा सर्व जीवनपट शिरोड्यातील या स्मारकातून समजून घेताना खांडेकर यांनी लिहिलेल्या साहित्यातील कितीतरी विचार मनात घर करून राहतात. जी आजही शाश्‍वत आहेत. त्यामध्ये ‘माणूस आत्मकेंद्रित होऊन आपल्या दु:खाचा विचार करतो म्हणून त्याला त्याचं दु:ख मोठ वाटत, जगात पाहू गेल्यास आपल्यापेक्षा ही मोठं दु:ख असणारी माणसं आहेत हे कळून येतं.’ याशिवाय ‘माणसाला चांगले बनवावे लागते, तो तसा बनला तरी त्याचे चांगुलपण टिकवावे लागते. पूर्वी धर्माचे, नीतीचे ईश्‍वरी श्रद्धेचे नियंत्र्ाण मनावर होते. आता मानवतेचे सामाजिकतेचे, सहजीवनाचे नियंत्र्ाण तेथे आले पाहिजे. नैतिक आणि सामाजिक घसरगुंडीच्या काळात हा खरा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. आकाशातील दीप मावळले, देवळातील तारे विझले तरी जोपर्यंत मनुष्याच्या अंत:करणातील माणुसकीची ज्योत तेवत राहील, संयम म्हणजे स्वातंत्र्य गमावणे नव्हे तर दुसऱ्याच्या स्वातंत्र्याला अवसर देणे हे तो विसरणार नाही तोपर्यंत मानवाचे भवितव्य भीषण होईल अशी भीती बाळगण्याचे कारण नाही.’ अशा अनेक विचारांची प्रेरणा घेत विद्यार्थी म्हणून  दत्तक मुलगा म्हणून, लेखक म्हणून, शिक्षक म्हणून, प्रख्यात साहित्यिक आणि या सर्वात एक माणूस म्हणून वि. स. खांडेकर समजून घेतानाचा जीवनप्रवास या स्मारकाने घडविला. असे हे केवळ प्रेक्षणिय नव्हे तर माणसातील माणूसपण जपण्याचे मूल्य संवर्धन उर्जा केंद्र म्हणजे गुरुवर्य वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय म्हणता येईल त्यासाठी सिंधुदुर्गातील प्रत्येकाने इथे आवर्जुन भेट द्यायला हवीच.

– सीमा मराठे, ९६८९९०२३६७

        गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्याप्रतिष्ठान, शिरोडा संचलित गुरुवर्य वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय, शिरोडा हे अ. वि. बावडेकर विद्यालयातच स्मारक असून वि. स. खांडेकर यांच्या जन्म ते मृत्यूपर्यंतचा संघर्ष, विकासाचा लेखाजोखा, एका लेखकाची जडणघडण असे सारे काही या संग्रहालयात कलात्मक रितीने मांडले आहे. वि. स. खांडेकरांचे सानिध्य लाभलेले चंद्रकांत ओटवणेकर (वय 85) आजही त्यांच्या स्मृती आनंदाने जागवतात. हे स्मारक पाहण्यासाठी मोठ्यांना 10 रु. तर लहान मुलांना 5 रु. असे माफक शुल्क असून ज्याचा विनियोग स्मारकाच्या जतनासाठी केला जातो. शासकीय सुट्ट्या वगळून सकाळी 10 ते 5 या वेळेत हे स्मारक सर्वांसाठी खुले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- 02366-227697.

This Post Has One Comment

  1. खांडेकर 1920 ते 1938 या कालावधीत शिरोड्यात वास्तव्यास होते.त्यामुळे ज्या व्यक्तीचा जन्म ऑगस्ट 1936 मध्ये आहे ती व्यक्ती खांडेकर यांच्या सान्निध्यात कशी येऊ शकते?

Leave a Reply

Close Menu