हळदक्रांती

        गेल्यावर्षी केवळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग कोरोना महामारीच्या विळख्यात सापडले होते, अर्थात त्या संकटाचे सावट अजूनही पूर्णतः दूर झालेले नाही. या काळात या महाभयंकर अशा संकटावर मात करण्यासाठी, जनतेमध्ये जगण्याचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत विविध स्तरावर अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग आणि प्रयत्न सुरु झाले आहेत. महाराष्ट्रातल्या कोकण प्रदेशात यशस्वी ठरलेला त्यातलाच एक प्रयोग म्हणजे हळदक्रांती.

           सिंधुदुर्ग हा तुलनेने तसा अगदी लहान जिल्हा. इथे कोणता मोठा उद्योग नाही की, एखादी औद्योगिक वसाहत नाही. त्यामुळे इथली बहुतांश म्हणजे ४० टक्के जनता कामधंद्याच्या निमित्ताने मुंबईत शहरात वास्तव्यास आहेत. हाताच्या बोटावर मोजण्या इतके अपवाद सोडले तर ही सगळी मंडळी  पोटापाण्यापुरते कमावून उपनगरात वन रुम किचन नाहीतर चाळीतल्या १०न्१० च्या खोलीत स्थिरावलेली.

        कोरोनाचे संकट आले आणि कोणाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं ती मुंबापुरी पूर्णता ठप्प झाली. ही चाकरमानी मंडळी या संकटाला खूप धास्तावली व लॉकडाऊनला सुद्धा न जुमानता मजल दरमजल करत या मंडळींनी गाव गाठलं.

       गावी आल्यावर आता इथेच थांबून रोजीरोटी कमविण्याचा विचार प्रत्येकाच्या मनात रुजू लागला. परंतु जिल्ह्यात कोणत्याही रोजगाराच्या संधी नाहीत. तसेच किरकोळ बागायती आणि तुटपुंजे उत्पन्न देणारी भात शेती या भरवशावर नक्की थांबून करणार काय? असा प्रश्न आ वासून उभा राहिला होता. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरपॅकेजची घोषणा केली.त्यातल्या तरतुदी पाहता शेती आणि शेतीपूरक उद्योगांसाठी त्यात मोठ्या  संधी दडलेल्या होत्या. या पॅकेजची माहिती लोकांपर्यंत पोचावी आणि त्याची नीट अंमलबजावणी करता यावी यासाठी जिल्ह्यात सिंधु आत्मनिर्भरअभियानाची रचना करण्यात आली.

                या अभियानाचे नेतृत्व माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्याकडे सोपविण्यात आले. रिव्हर्स मायग्रेशन झालेल्या लोकांसाठी कोकणच्या लाल मातीतल्या सुधारित शेती या पर्यायाकडे वळवावे यावर अभ्यास सुरु झाला. कोकणातील मुख्य भातशेती या पिकासोबत पर्यायी किवा आंतरपीक म्हणून हळद लागवड फायदेशीर ठरु शकते यावर सर्वांचे एकमत झाले आणि हळद क्रांतीचा नवा अध्याय जिल्ह्यात सुरु झाला.

            शेतक-यांना एखाद्या नवीन पिकाकडे वळवताना त्यातलं तंत्रज्ञान, त्यासाठी लागणारे बी बियाणे आणि खते, उत्पादित मालाच्या खरेदीची सुलभ व्यवस्था, त्यावरची प्रक्रिया आणि शेवटी  प्रक्रिया केलेल्या मालाला योग्य अशी बाजारपेठ या सगळ्या बाबींचा अभ्यास आणि त्याची तयारी करावी लागते, आर्थिक यंत्रणा उभी करावी लागते.त्यासाठी कोणाला तरी प्रयोगाचा उंदीर होण्याची जबाबदारी पेलावी लागते.जिल्ह्यातील भाजपा नेत्यांच्या जीवावर अभियानाने ही सर्व जबाबदारी स्वीकारली आणि हळद लागवड ही एक चळवळ व्हावी असा प्रयत्न सुरु झाला.

           शहरातून परतलेले तरुण तरुणी, पूर्वाश्रमीचे शेतकरी आणि उमेदचळवळीतील सुमारे २५०० महिला बचतगट या सर्वांना सेलम जातीचे २५ टन हळद बियाणे मोफत वितरीत करण्यात आले. विभागस्तरावर ग्रामविकास संस्था आणि शेतीतज्ज्ञ यांना सोबत घेऊन शेतक-यांना हळद लागवडीचे मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतरच्या टप्प्यात मोफत खत पुरविण्यात आले. ३ महिन्यात गावागावात हिरवेगार असे हळद लागवडीचे प्लॉट दिसू लागले. अनेक ठिकाणी तर त्या प्लॉटवर बचतगटांनी सिंधू आत्मनिर्भरअभियान असे छोटे फ्लेक्स लावलेले निदर्शनास आले. दरम्यान, ‘सेल्फी वुईथ हळदअसा हॅशटॅग घेऊन महिला बचतगट आणि तरुण तरुणींचे फोटो सोशल मिडीयावर झळकू लागले.

               जानेवारी उजाडला. मकर संक्रांती दरम्यान लोकांनी हळद काढली. पहिलं वर्ष असूनही अपेक्षप्रमाणे उत्पादन मिळालं. याचं पुढे काय करायचं हा प्रश्न लोकांसमोर होता. पण अभियानाने त्यावर आधीच विचार केलेला असल्याने चांगला भाव देऊन हळद खरेदी केंद्रे उभारण्यात आली. यानंतरचा शेवटचा अध्याय होता तो म्हणजे या हळदीवर प्रक्रिया करुन त्याची उत्तम दर्जाची हळदपूड तयार करणे आणि कोकणच्या ब्रँडखाली त्याचे मोठ्या शहरात मार्केटिंग करणे. यासाठी सुद्धा आपल्या परिवारातील संस्था पुढे आली. जिल्ह्यातल्या डॉ.हेडगेवार प्रकल्पात यासाठी आवश्यक मशिनरी उभारुन प्रक्रिया केंद्र सुरु करण्यात आले.सध्या मोठ्या प्रमाणावर ओली हळद या केंद्रावर जमा होत असून त्यावर बॉयलिंग व इतर प्रक्रिया सुरु आहेत. लवकरच सिंधु आत्मनिर्भरअभियान आपल्या खास ब्रँडनेमद्वारे ही हळदपूड बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करुन देणार आहे.

               अशाप्रकारे हळद क्रांतीचा हा प्रयोग या अभियानाने यशस्वीतेकडे नेलेला आहे. यातून अंदाजे ७५ टन हळद पावडर व पुढील लागवडीसाठी ५० टनहून जास्त बियाण्याचे कंद तयार झालेले आहेत.

       या प्रयोगाच्या सिद्धतेसाठीच्या प्रवासात अनेकांचे सहकार्य लाभलेलं आहे.नवीन पिकाची सवय लावण्यासाठीची जनजागृती, २५ टन मोफत हळद बियाणे, तंत्रशुद्ध मार्गदर्शन, मोफत खत वितरण, प्रक्रिया केंद्र उभारणी अशा बाबींसाठी आमचे मार्गदर्शक नारायण राणे व विनोद  तावडे यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन लाभले. आमदार रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, आमदार आशिष शेलार यांचे आर्थिक पाठबळ, सुहासी चव्हाण यांनी आपल्या कंपनीद्वारे पुरवलेली मशिनरी, तसेच भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान आणि डॉ.हेडगेवार प्रकल्प यांचे सहकार्य लाभले. यासोबत अभियानाचे संयोजक अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष राजन तेली व सहका-यांची अविरत मेहनत या यशामागे आहे.

    ‘सिंधु आत्मनिर्भरअभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात असे शेती, मत्स्यशेती व त्याला पुरक अनेक प्रयोग विचाराधीन आहेत. काहींवर काम सुरु झालेले आहे. हे सर्व प्रयत्न सिंधुदुर्ग जिल्ह्याला आत्मनिर्भरते घेऊन जातील यात कोणताही संदेह नाही.

 – प्रभाकर सावंत-९४२२३७३८५५

सिंधु आत्मनिर्भर अभियान

Leave a Reply

Close Menu