अस्तित्व

‘‘आपण कशावर विश्वास ठेवावा, याचे आपल्याला स्वातंत्र्य आहे. देव नाही अशी माझी साधी भुमिका आहे.‘‘ असा दावा विख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी आपल्या अखेरच्या ब्रिफ ऑनर्स टू द बिग कनेक्शनया पुस्तकात केला आहे, ही बातमी वाचली.…..

     खरचं तो आहे कां? तो आहे कां? मग त्याला अस्तित्व आहे कां? या प्रश्नाचे उत्तर देणे इतके सोपे आहे का?

    लहानपणापासून झालेल्या संस्कारांचा परिणाम असल्याने असे प्रश्न कधीच पडले नाहीत. मला आठवतंय खूप लहान असताना मी आंघोळ करुन आल्यावर मला कोणी पारोसा हात लावायला आला मी धावत जाऊन देवाच्या फोटोला पकडून धरायला जायचो.

      पुढे जसजसा मोठा होत गेलो तसा मलाही हा प्रसंग आठवून हसू यायला लागले. नंतर तर आर्ट कॉलेजमध्ये असताना आम्ही काही मुले अंनिसच्या ग्रुपमध्य सामिल झालो. अंधश्रद्धा, बुवाबाजी यांच्या विरोधात काम करु लागलो. आमच्या ग्रुपचे लिडर एक मोठे नामांकित प्रस्थ देव न मानणारे. आम्ही मुले भारावून जायचो त्यांची व्याख्याने ऐकून. पण एकेदिवशी आम्ही कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता त्यांच्या मुलीने आमचे स्वागत केले व पप्पा देवपूजेला बसले आहेत, थोडा वेळ लागेल; ते ऐकून आम्ही सगळे उडालोच आणि आमची चळवळ थंड पडली. त्या दिवसापासून प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला.

     पुढे अनेक घटना घडल्या, अनेक माणसे भेटत गेली. आचार विचारात फरक पडत गेला. आयुष्यात आलेल्या अनेक व्यक्तींनी जगाकडे बघण्याची दृष्टी दिली गेली. यातील महत्त्वाचे स्थान म्हणून साळुंखे आई.या आमच्या गुरुमाऊलीचे स्थान अढळ आहे. श्रद्धा, अंधश्रद्धा, दाखवणं, दिसणं आणि असणं यातील फरक हे ओळखायला त्यांनी शिकवले. वेगवेगळ्या ठिकाणी, अनेक तीर्थक्षेत्र, देवस्थान फिरवून सुद्धा आपल्या स्वतःमध्ये असलेल्या देवाला शोधण्याची ताकद आईंनी दिली. माणूस ओळखण्याची, प्रामाणिकपणे केलेले काम म्हणजेच हिच खरी देवपूजा, देवाजवळ जाण्याचा खरा मार्ग दाखवून दिला. त्यामुळे माझ्या अत्युच्चक्षणी मला त्यांचेच पाय दिसतात.

      आपल्या हातून घडलेल्या चित्रांमधून सुद्धा देवाचे अस्तित्व जाणवते याची जाणीव करुन दिली ती स.कृ.काळेया स्वामी भक्त चित्रकाराने. दादरला चित्रा सिनेमागृहासमोर असलेल्या ईस्माईल बिल्डिगमधे रहात असलेल्या या श्रेष्ठ चित्रकाराला ८१साली भेटण्याचा योग आला. पूर्वीच्या काळातील प्रसिद्ध कॅलेंडर आर्टिस्ट आणि स्वामीभक्त. उंच भारदस्त, तेजस्वी व्यक्तीमत्व. पहाताक्षणी स्वामी समोर असल्याचा भास झाला. भरभरून बोलणे झाले. असंख्य स्वामींची पेंटिंग्ज तयार करताना बोटाने कसे कलर्स मिक्स करायचे, कुठल्या रंगाचा वापर करायचा याचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. नंतर आपल्याला चित्रांमधून कसे संदेश, सुवास, मार्गदर्शन मिळाले, मिळतात हेही सांगितले. चित्रांमधून अशीही अनुभुती मिळते यावर माझा विश्वास बसला नाही. त्यावेळी ते हसले व म्हणाले, ‘बेटा तू मनापासून चित्र काढ. ती वेळ आल्यावर तुलाही त्याचे ­­अस्तित्वजाणवेल. विश्वास ठेव स्वतःवर.

    खरं तर ही घटना मी विसरुनही गेलो. त्या घटनेला साधारण २०/२२वर्षे झाली असतील. आमच्या विरार ट्रेनमधील् मित्रमंडळीतील एक मित्र प्रविणभाई छेडा. नेहमी ट्रेनमध्ये आम्हा सर्वांना काही -तरी खायला घेऊन येणारा हसतमुख वल्ली. साईभक्त! दर गुरुवारी शिर्डीला बाबांच्या दर्शनाला जाणारा. नालासोपारा पूर्वेला चाळीत रहायचा. काही दिवसांनी त्याने ओनरशीप मोठी जागा बुक केली. बांधकाम पूर्ण होत असताना मला ब्लॉक पहायला घेऊन गेला आणि मला म्हणाला, ‘प्रकाशजी, तुम्ही मला साईबाबांचे एक मस्त पेंटींग करुन द्या.मी लगेच होम्हणालो आणि कशा पद्धतीने करुन आणि कुठल्या जागेवर लावणार असे त्याला विचारले असता तो म्हणाला प्रकाशजी बाबांना कुठे बसवायला पाहिजे ती जागा तुम्हीच ठरवा आणि पेंटिंग कशाप्रकारे करायचे हे पण तुम्हीच ठरवा. वेळेचे पण बंधन पण नाही.

      हळूहळू कॅनव्हासवर बाबा दिसायला लागले. कसलेही बंधन नसल्याने मनापासून काम सुरु झाले. संध्याकाळी आल्यावर मुडप्रमाणे काम सुरु करायचो. २ ते ३ महिन्यांत बाबा आकाराला आले आणि काही क्षणातच माझ्या मनोवृत्तीत फरक पडायला लागला. मला ते पेंटिंग आवडायला लागले. बाहेरून घरात आल्यावर बाबांच्या चेह-यावर असलेले स्मित पाहून खूप आनंद व्हायला लागला. एकंदरीत मी त्या पेंटिंगच्या प्रमात पडलो. हे पेंटिंग आता आपल्याच घरी असावे असे वाटायला लागले. त्यामुळे प्रविणभाईना मी टाळायला लागलो. अशातच ४ ते ५ महिने झाले. हे पेंटिंग प्रविणभाईंना न देण्याचे ठरवून टाकले. आणि एका रात्री झोपेत असताना मला कोणीतरी हलवून जागे करीत असल्याचे जाणवले आणि कानावर ते शब्द पडले, ‘अरे, मला किती दिवस इथे ठेवणार आहेस? मला माझ्या जागेवर जाऊ दे!सतत हेच शब्द कानावर पडत राहिले आणि जाग आली. डोळे उघडले लक्ष गेले ते ईझलवर असलेल्या बाबांच्या पेंटिंगवर. दीर्घ श्वास घेतला आज मला ते स्मित वेगळेच वाटले. घड्याळ्याकडे पाहिले साडेतीन वाजायला आले होते. सौ.ला उठवून तिला कल्पना दिली. ती म्हणाली, ‘उद्या सकाळी प्रविणभाईना पेंटिंग न्यायला सांगा.नंतर झोप लागलीच नाही.

     सकाळी उठून नेहमीची तयारी करत असताना ओव्हर वायर तुटल्याने ट्रेन बंद पडल्याची बातमी मिळाली आणि टीव्ही चालू करुन बातम्या पहात असताना बेल वाजली दरवाजा उघडला आणि मी उडालोच. समोर प्रमोद हंजनकर आणि प्रविणभाई हसत हसत उभे. हातात कांदा भज्याची पुडी घेऊन. मस्त आल्याचा चहा टाकायला सांगा वहिनींनाअसे म्हणत आत आले. खुर्चीवर बसताना प्रविणभाईचे लक्ष समोर स्मित हास्य करीत असलेल्या पेंटिंगवर गेले. तसाच तो पहात उभा राहिला आणि अचानक मला कडकडून मिठी मारली, त्याच्या डोळ्यांतून पडत असलेल्या अश्रुंनी मला न बोलता दाद दिली.

     काही दिवस मला खूप त्रास झाला त्या रिकाम्या ईझलकडे पाहून आणि काही महिन्यांनी पुन्हा एका पहा ते स्मित दिसले, पण ते स्मित मला काहीतरी सांगत होते.. आणि सकाळीच प्रमोदचा फोन आला कब्रे आज पहाटे प्रविणभाई गेले.मी तसाच स्तब्ध उभा!! लक्षात आले ते स्मित काय सांगत होते.जर ते पेंटिंग तुझ्याकडे ठेवले असते तर तुला आनंद मिळाला असता का?!

     खरंच नंतरच्या काळात अनेक चित्रांनी अस्तित्वाचीजाणीव करून दिली.. परत कधी तरी!…

            –प्रकाश गणेश कब्रे (चित्रकार)

              मोबा. ९६५७४५६६४७

 

Leave a Reply

Close Menu