कृष्ण गोपाळ तथा वासू देशपांडे

 नाथ पै आणि बाबा

      राष्ट्र सेवा दल आणि शिक्षण क्षेत्र ही बाबांच्या जीवनाची अभिन्न अंग होती. तसेच त्यांच्या जीवनाचा फार मोठा भाग नाथ पै या व्यक्तिमत्वाने व्यापलेला होता. दोघांचा मैत्र सर्वश्रुत आहे. बाबांनी म्हटल्याप्रमाणे, “नाथने माझ्यावर माया केली व मी त्याच्यावर भक्ती केली.“ नाथमामा (माझ्यासाठी ते नाथमामा होते) आपल्या आयुष्यात खूप मोठे झाले. पण त्यांनी आपल्या या मित्राला कधी अंतर दिलं नाही.

      या दोघांची मैत्री सामान्यतः 1945 पासूनची. बेळगावला सेवादलाचे काम 1942 च्या आंदोलन काळात सुरु झाले. बाबांचा यात सहभाग होता. 1942 च्या स्वातंत्र्य आंदोलनात शिक्षा भोगून आल्यावर नाथमामांनी सेवादलाच्या कामात लक्ष घातलं. साहजिकच बेळगाव सेवादलाचे नेतृत्व नाथमामा करू लागले. त्यांचा विशेष भर सेवादलातील अभ्यास मंडळावर असे. बाबांच्या मधला कार्यकर्ता घडवण्याचं श्रेय नाथमामाचं आहे. बाबांनी तसं लिहून ठेवलं आहे. बाबा सांगत, कॉलेज जीवनात नाथने, आपल्या कृतीनेच आम्हाला घडवलं. चुका झाल्या तर कधी त्याचा उच्चार नसे. परंतु त्यानंतर एखाद्या कृती मधून आम्हाला समज मिळे. आम्हाला आमची चूक कळत असे. कॉलेजच्या काळात या दोघांनी अनेक चळवळीमधे एकत्र भाग घेतला.

      पुढे नाथमामा उच्च शिक्षणासाठी परदेशी गेले. बाबांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. 1953 मध्ये बाबा वेंगुर्ल्याला गेले. त्यावेळी नाथमामांनी बाबांना इंग्लिशमध्ये एक सुंदर पत्र लिहिले. नाथमामाचं जन्मस्थान वेंगुर्ला होतं. त्याची आठवण करून दिली होती. 1957 च्या निवडणुका जाहीर झाल्या. दक्षिण रत्नागिरी मतदार संघातून नाथमामांची उमेदवारी जाहीर झाली. आणि ते मोठ्या फरकाने निवडून आले. त्या निवडणुकीपासून आमचं घर हे नाथमामाचं मतदार संघातील होतं. मतदार संघात आले की रात्रीचा मुक्काम सामान्यतः आमच्याकडे असायचा. त्यांची सर्वतोपरी काळजी माझी आई घेत असे. त्याचं खाण मोजकच असे. पण तिथे आल्यावर त्यांना कोकणी जेवण पसंत असे. जेवणात सोलकडी ही हवीच. ते येणार म्हटल्यावर आई सर्व तयारी आधीच करून ठेवत असे. एवढा मोठा माणूस, पण त्यांच्या येण्याचं कधी दडपण येत नसे. मैत्रीचा हा सिलसिला असाच कायम चालू राहिला.

      1967 च्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. प्रजा समाजवादी पक्षाची रत्नागिरी जिल्ह्याची मिटींग होती. त्या मिटिंगमध्ये बाबांनी वेंगुर्ला-कुडाळ मतदार संघासाठी एका कार्यकर्त्याचे नाव सुचविलं. नाथमामा नाराज झाले. त्यांना बाबांना यावेळी उमेदवारी द्यायची होती. घरी आल्यावर आईला म्हणाले, “आज वासूने गडबड केली. मी आणि डॉक्टर (बेळगांवचे डॉक्टर अनंतराव याळगी) वेगळंच ठरवत होतो. हा मधेच बोलला. बाबांना वाटत होतं, मी ब्राह्मण. या मतदार संघात निवडून येणार नाही. पक्षाची एक सीट जाईल.” यावर नाथमामानी विचारलं, “वासू, मी असताना तु निवडणूक कसा हरू शकतोस?“

      निवडणुकीच्या संदर्भातील बाबांचा आणखी एक अनुभव. पुण्यात आल्यावरचा. शाळा चांगली स्थिरस्थावर झाली होती. बाबांनी पुण्याच्या शिक्षण क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. यावेळी बाबांना शिक्षक मतदार संघातून विधान परिषदेची निवडणूक लढवायची होती. त्यांनी तशी तयारी पण सुरु केली होती. एक दिवस साधना साप्ताहिकाचा अंक हातात आला आणि आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. यात बाबांना न विचारताच दोन मोठ्या व्यक्तीनी बाबांनी उमेदवारी मागे घेतल्याचं जाहीर केलं होतं. त्या दोघांनी आपला पाठिंबा पण अन्य उमेदवाराला जाहीर केला होता. त्यांचा शब्द ओलांडणं बाबांना शक्य नव्हतं आणि मग बाबांची आमदारकी कायमची हुकली. एक मात्र,  बाबांना बंडखोरीचा विचार पण शिवला नाही. तसा सल्ला देणारे पण अनेक जण होते.

      1967 मध्ये बाबांनी कन्याशाळेचा राजीनामा दिला. त्यानंतरच एक वर्ष तिथेच वेंगुर्ला हायस्कुलमध्ये नोकरी केली. याच दरम्यान नाथमामांनी उभादांडा येथे भरलेल्या शेतकरी परिषदेत दशावतारी नाट्यस्पर्धेची कल्पना मांडली. यासाठी एक समिती नेमली गेली. या समितीचे कार्यवाह बाबा आणि सावंतवाडीचे जयानंद मठकर होते. पहिली दशावतारी नाट्य स्पर्धा वेंगुर्ल्याच्या रामेश्‍वर मंदिरात 15 ते 22 मे 1968 संपन्न झाली. सात दशावतारी मंडळींनी यात भाग घेतला. या स्पर्धे-साठी गोव्याचे मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांनी चांदीची ढाल दिली होती. स्पर्धा यशस्वी झाली हे सांगायला नकोच. बक्षीस समारंभ नाथमामाच्या हस्ते पार पडला.

      यावेळची एक आठवण सांगण्याजोगी आहे. या स्पर्धेसंदर्भात बांदोडकरना भेटण्यासाठी नाथमामांनी बाबांना बेळगावला बोलावलं होते. डॉक्टर याळगी यांच्या घरी ही भेट झाली. कामाचं बोलणं झाल्यावर भाऊसाहेबांनी बाबांची चौकशी सुरु केली. बाबा नोकरीच्या शोधात आहेत, हे त्यांना समजलं. ते लगेच म्हणाले, “वासू तु माझ्याकडे ये. मला माझ्या आई वडिलांच्या नावानं गोव्याला शाळा सुरु करायची आहे. मला तुझ्यासारखा शिक्षक हवा आहे. तुझी सर्व जबाबदारी माझी. तु हो म्हण.” बाबांनी त्यांच्याकडून वेळ मागून घेतला. बांदोडकर तिथून बाहेर पडल्यावर, नाथमामा आणि डॉक्टर याळगी दोघांनी बाबांना सांगितलं, “वासू तुझे आणि त्यांचे जमणार नाही. हा विचार तू करू नये.” असे मोहाचे/लाभाचे अनेक क्षण बाबांच्या आयुष्यात आले. पण बाबा नेहमीच त्यापासून दूर राहिले. बाबांनी वेंगुर्ला सोडण्याचा घेतलेला निर्णय नाथमामांना आवडला नव्हता. बाबांनी त्यांना आपला निर्णय उशिराच कळवला होता.

      जून 1970 मध्ये रावसाहेब पटवर्धन विद्यालय सुरु झाले. आम्ही सारे कुटूंबीय पुण्यात आलो. नाथमामांनी बाबांना सांगितलं, वासू पुण्यात तु तळमजल्यावरची जागा घे. म्हणजे यानंतर मी इथे आलो की तुझ्याकडे उतरत जाईन. बाबांनी तशी जागा घेतली. पण त्या घरात नाथमामा काही आले नाहीत. 17 जानेवारी 1971 ला त्यांच्या कर्म भूमीत बेळगावला संध्याकाळी हुतात्मा दिनाच्या सभेत शेवटचं भाषण झालं आणि रात्री त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

बाबा : एक बहू आयामी व्यक्तिमत्व

      ‘लोकशाहीची आराधना’ आणि ‘लोकशाहीचा कैवारी’ या पुस्तका नंतर बाबांचे नाव पुण्याच्या साहित्यिक वर्तुळामध्ये परिचयाचे झाले. बाबा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सभासद होते. साहित्य परिषदेच्या वार्षिक साधारण सभेला ते उपस्थित असत. अशाच एका सभेमध्ये बाबांनी काही प्रश्‍न उपस्थित केले. त्यावर चर्चा झाली. सभा संपल्यावर दोन मोठे प्रकाशक बाबांकडे आले. ते म्हणजे देशमुख आणि कंपनीचे देशमुख आणि श्रीविद्या प्रकाशनचे मधू काका कुलकर्णी. त्यांनी बाबांना साहित्य परिषदेच्या कामात सहभागी करून घेण्याची इच्छा व्यक्त केली. बाबांनी मांडलेल्या मुद्द्यावर चर्चा केली. हे दोघे साहित्य परिषदेचे पदाधिकारी होते. पुढे साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीवर बाबांना co-opt करून घेतलं गेलं. बाबा दोन वर्ष साहित्य परिषदेचे कार्यवाह होते. पण तिथे ते फार काळ रमले नाहीत. साहित्यिकांच्या राजकारणात त्यांना विशेष रस नव्हता. बाबांना देशमुख आणि मधुकाका कुलकर्णी हे दोन जिवाभावाचे मित्र मिळाले. देशमुख पती पत्नीनी बाबांच्यावर पुत्रवत प्रेम केलं. मधुकाकांचा स्नेहही कायम लाभला. या तीन व्यक्तीनीं फक्त बाबांच्यावर प्रेम केलं असे नाही, तर संपूर्ण कुटूंबालाच त्यांचा स्नेह लाभला.

      जून 1970 मध्ये रावसाहेब पटवर्धन विद्यालय सुरु झाले. पहिल्या वर्षी फक्त आठवी यत्ता सुरु झाली. त्यामुळे दीड शिक्षकी शाळा. 1971 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या. जानेवारीमध्ये नाथमामांचे निधन झाले. त्यांच्या जागी राजापूर मतदार संघातून लोकसभेसाठी प्रा. मधु दंडवते यांना उमेदवारी दिली गेली. दंडवतेनी पक्षाला सांगितलं, “मला किमान एक महिना माझ्याबरोबर वासू हवा.” आता प्रश्‍न होता शाळेचा. अशी शाळा सोडून कसे जाणार? यावेळी मदतीला आल्या त्या जान्हवी थत्ते. त्यांनी एक महिना शाळा सांभाळली. पुढे प्रश्‍न होता, बाबांनी रजा कोणती घ्यायची? बाबांनी स्पष्ट सांगितलं, “मी बिन पगारी रजा घेणार. निवडणुकीचा आणि शाळेचा काही संबंध नाही. ती माझी वैयक्तिक बाब आहे.” संस्था स्वतः पगार द्यायला तयार होती. बाबांनी पगार घेतला नाही आणि हे पण स्पष्ट केलं, उद्या कोणीही जरी सेवादलाच्या कामासाठी रजा घेतली तरी त्याला नियमाप्रमाणेच रजा घ्यावी लागेल. मी दोन गोष्टींची गल्लत करू देणार नाही. असे प्रसंग पुढे आले. अनेकदा बाबांवर दडपण येत असे. सेवादलाचे शिबीर बिहारमध्ये आहे. अमुक एका व्यक्तीला सोड. तो सामान्यतः फेब्रुवारी महिना असायचा. परीक्षा जवळ आलेल्या असायच्या. पोर्शन पूर्ण करण्याची जबाबदारी असायची. अशावेळी बाबा नाराज होतं. काही वेळा त्यांना त्यांचा हट्ट सोडावा लागत असे.

      निवडणुका झाल्या. दंडवते निवडून आले. त्यानंतर पुण्यात कार्यकर्त्याच्या मेळाव्यात दंडवतेनी जाहीरपणे सांगितलं, “Vasu is architect of my victory.”

      पुण्यात आल्यावर विविध क्षेत्रात बाबांनी केलेल्या कामाची दखल घेतली जाऊ लागली. बाबांना पुणे महानगरपालिकेचा आणि पुणे जिल्हा परिषदेचा उत्कृष्ठ शिक्षकाचा पुरस्कार मिळाला. बाबांना 1985 मध्ये राष्ट्रपतींचा उत्कृष्ठ शिक्षकाचा पुरस्कार जाहीर झाला. नोव्हेंबर 1985 मध्ये बाबा सेवानिवृत्त झाले. पण बाबांना हा पुरस्कार मिळाला 5 सप्टेंबर 1986 ला म्हणजे सेवानिवृत्ती नंतर. हा पुरस्कार त्या वेळचे राष्ट्रपती महोदय ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते मिळाला. आम्ही सर्व कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित होतो. आम्हा सर्वांसाठीच हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता.

      यानंतर पुण्यात साने गुरुजी स्मारकावर बाबांचा भव्य सत्कार झाला. यावेळी महाराष्ट्राचे Education Director श्री. वि. वि. चिपळूणकर आणि श्री. नानासाहेब गोरे उपस्थित होते. चिपळूणकर आपल्या भाषणात म्हणाले, “मला माहित नव्हतं की देशपांडे यांना हा पुरस्कार अजुन पर्यंत मिळालेला नव्हता. त्यांच्या एकूण कामाचा आवाका आणि त्यांची गुणवत्ता पाहता हा पुरस्कार त्यांना यापूर्वीच मिळायला हवा होता.”

      असाच एक सन्मान बाबांना पुण्यात आल्यावर मिळाला. दरवर्षी मुख्याध्यापक संघांचे अधिवेशन भरत असते. मुंबईला भरणाऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून बाबा निवडून आले. हा पण त्या क्षेत्रातला एक मोठा सन्मान होता. राज्यपालांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. बाबांचे मित्र आणि सेवादलाचे श्री. सदानंद वर्दे,  त्यावेळचे शिक्षण मंत्री, या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. बाबांचे अध्यक्षीय भाषण अतिशय प्रभावी झाले.

      बाबांच्या सेवानिवृत्तीच्या आधीच श्री. जे. पी. नाईक यांनी बाबांना त्यांच्या संस्थेमध्ये कामं करण्यासाठी बोलावलं होतं. मला उत्सुकता होती बाबा आता काय करणार? एकदा त्यांनी मला बोलता बोलता सांगितलं, “मी सेवानिवृत्त झालो आहे. म्हणून तू इथे पैसे पाठवायचा विचार पण करू नकोस. आमचे सर्व व्यवस्थित चालू आहे.” मी त्यांना विचारलं “आता तुमचा कार्यक्रम काय?” त्यांच उत्तर त्यांच्या स्वभाव प्रमाणेच होतं, “मी पैसे मिळवण्यासाठी काही करणार नाही. माझा विचार चालू आहे.” मी त्यांना एक सांगितलं, “तुम्ही काहीही करा, पण रावसाहेब पटवर्धन विद्यालयाच्या संदर्भात कोणतेही पद स्वीकारू नका.” बाबांनी ते तात्काळ मान्य केलं. यामागे माझे एक कारण होतं. तो म्हणजे बाबांचा स्वभाव. बाबांनी खूप कष्टांनी शाळा सुरु केली, वाढवली, मोठी केली. बाबा स्वतः खूप कष्ट करत. त्यांची अपेक्षा असे इतरांनी पण तसेच करावे. तसे झाले नाही की ते समोरच्याला स्वभाव धर्मानुसार स्पष्टपणे सुनावित असत. बाबा सेवानिवृत्त होण्याआधीच काही मंडळींनी या संदर्भात कुजबुज सुरु केली होती. अर्थात मला जे जाणवलं ते त्यांना आधीच उमजलं असणार.

      सेवानिवृत्तीच्या आधीपासूनच बाबा मराठी अध्यापक संघामध्ये कार्यरत होते. त्या कामासाठी त्यांनी अधिक वेळ द्यायला सुरवात केली. मराठी अध्यापक त्रैमासिक पत्रिकेचे संपादकपद त्यांच्याकडे आले. त्यांनी या पत्रिकेचा दर्जा उंचावला. “मी हे वाचले आहे, तुम्ही?“ असे सदर त्यांनी सुरु केले. प्रत्येक अंकात ते दोन तीन पुस्तकांचा परिचय करून देत असत. वाचकांना हा बदल आवडला. बाबांनी मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी शिबीर घेणं सुरु केले. मराठी शिकवण्याचा दर्जा वाढावा,  हा त्यांचा या मागचा विचार होता. त्यासाठी ते महाराष्ट्रभर फिरले. त्यांना शिक्षकांचा प्रतिसाद पण चांगला मिळाला. अनेक शिक्षकांना पत्रिकेमध्ये लिहायला लावले. शेवटपर्यंत त्यांच हे काम चालू होतं.

      रावसाहेब पटवर्धन विद्यालयात बाबांनी Girls Guide चे ट्रूप्स सुरु केले होते. शाळेत आठवी, नववी आणि दहावी असे मुलींचे तीन ट्रूप्स होते. Girls Guide च्या सिलॅबस प्रमाणे मुलींना शिकवलं जात असे. शिबिरं आयोजित केली जात असत. यात इतर शिक्षकांचाही सहभाग असे. निवृत्त झाल्यावर बाबांनी स्कॉटच्या दैनंदिन कामात लक्ष घालायला सुरवात केली. तिथे त्यांना पदाधिकारी केले गेले. शेवटी ते महाराष्ट्र स्कॉउटचे उपाध्यक्ष झाले.

-प्रशांत देशपांडे, 9820588373

(क्रमशः)

Leave a Reply

Close Menu