वेंगुर्ल्याचा मासळीबाजार

दोन-तीन वर्षापूर्वी पर्यटनासाठी ओमानया देशात मस्कतया शहराला भेट देण्याचा योग आला होता. तसं ओमान/मस्कत हे काय भारतीयांच्या दृष्टीने पर्यटनाचे आकर्षण नव्हे. पण भारतातील एक नामांकित टुर कंपनीने अत्यल्प दरात ओमान टुरआयोजित केली होती. अत्यल्प म्हणजे अगदी विमानाच्या परतीच्या तिकीट खर्चापेक्षा पण कमी. त्यामागचे व्यावसायीक कारण मी जाणून घ्यायचा खूप प्रयत्न केला पण काही कळलं नाही. मनात धाकधूक खूप होती, पण अनुभव खूप चांगला आला. फोरस्टार हॉटेलमध्ये निवास, उत्तम नाष्टा व भोजन, महागड्या वाहनातून स्थलदर्शन, गाईड हे सर्व काही उत्तम होते. असो, तर या ट्रिपमध्ये एक दिवस मस्कत शहर दर्शनाचा कार्यक्रम होता. मस्कतमधील एक एक स्थळे बघत असताना गाडी फिश मार्केटसमोर येऊन थांबली. मी अवाकच झालो, फिश मार्केट हे काय पर्यटनस्थळ झाले काय? पर्यटकांपैकी काही शाकाहारी पर्यटकांनी तर गाडीमध्येच बसून राहणे पसंत केले. गाडी व फिश मार्केट हा प्रवास २ मिनिटांच्या पायी प्रवासांत उन्हाच्या प्रचंड झळा बसल्या व आम्ही मस्कतच्या फिश मार्केटमध्ये थंडगार वातावरणात प्रवेश केला.

        खरोखरच हे फिश मार्केट पर्यटन स्थळच होते. अत्यंत स्वच्छ व नीटनेटके असलेल्या या फिशमार्केटमधून फिरता फिरता मी मनाने माझ्या वेंगुर्ल्याच्या  फिश मार्केटमध्ये जाऊन पोहचलो होतो. वेंगुर्ल्याचे फिश मार्केट जुन्या काळात एवढे आधुनिक नव्हते तरीही वेंगुर्ल्याचे एक आकर्षण होते. अस्सल मच्छीखांव वेंगुर्ल्यात आल्यावर, मासळी बाजाराला भेट दिल्याशिवाय जात नसे. वेंगुर्ल्यातील आणि पंचक्रोशीतील मच्छीखांव लोकांचा तर येथे महिन्याचे काही वार सोडले तर नेहमीच राबता असायचा, अजूनही आहे आणि यापुढेही राहील यात शंका नाही.

       बालपणी मी बरेचवेळा, कधीकधी अगदी एकटासुध्दा वेंगुर्ल्याच्या मासळी मार्केटमध्ये मासे खरेदी करायला जायचो. आमच्या घरापासून काही लांब अंतर नव्हते, चालत अगदी ५-१० मिनिटाच्या अंतरावर. बुधवार, शुक्रवार व रविवार हे प्रचंड गर्दीचे दिवस. त्यामुळे आम्ही दुपारी १२.३० नंतर बाजार उलागल्यावरच जायचो. याचे दोन मोठे फायदे असायचे एकतर गर्दी कमी असायची आणि दुसरे म्हणजे मासेविक्रेत्यांना घरी जायची घाई असायची त्यामुळे कमी दरात माशाचा वाटा पिशवीत पडायचा. काळोख पडायला लागल्यावर मासे मार्केटकडे जाणा-या चिंचोळ्या वाटेच्या तोंडावर या मासे विक्रेत्या अगदी स्वस्त भावात मासे द्यायच्या. त्यामुळे का होईना आम्ही खूप स्वस्त, मस्त आणि भरपूर मासळी आमच्या बालपणी खाल्लीय.

    खापी, सौंदाळे, मोदका, इरडा, इंगा-पाच्छाळी, पेडवे, तार्ले हे काही स्वस्त माशांचे प्रकार. ब-याच जणांच्या खिशाला परवडत असल्याने आमच्या पिढीच्या लोकांना या माशांची आठवण जरी काढली तरी तोंडाला पाणी सुटते. यातील बरेच मच्छीचे प्रकार मुंबईच्या मासळी मार्केटमध्ये मिळत नाहीत. मुंबईत जसे बोंबील आणि मांदेली हा स्वस्त आणि मस्त परवडणारा माशाचा प्रकार आहे तसा आमच्या वेंगुर्ल्यात खापी, इरडा, सौंदाळे, मोदका, इरडा, इंगा-पाच्छाळी, पेडवे, तार्ले हा माशांचा प्रकार, ज्याचे कालवण बरेचदा घराघरात शिजायचे, अजूनही शिजतेय. बरं वेंगुर्ले शहरात राहणा-यांचे  काय माडाची झाडे, बागायची नव्हती. त्यामुळे माशाच्या कालवणाला लागणारे खोबरे व मिरश्यांगो हे येतानाच बाजारातून आणायचे. ज्यांना अख्खा नारळ परवडत नसायचा त्यांच्यासाठी खोब-याचे तुकडे देखील बाजारात विक्रीला उपलब्ध असायचे. मिरश्यांगो, धणे, खोबरा यांचा वाटाप, थोडीसी हळद, मीठ, सोला, कांदा एवढ्या थोड्याशा सामग्रीत माशाचे चविष्ट कालवण होऊन जायचे. फोडणीला तेल हवेच असेही काही नसायचे, रेशनिंग दुकानावर पामतेल उपलब्ध असेल तर व मासे खुप असतील तर यातील काही मासे तव्यावर सुध्दा जायचे. तुमचे काय ते शेलो फ्राय की काय असते ते, हां तेच.

     अजून थोडे पैसे खिशात असतील तर बांगडे, सौंदाळे, धोरकाडे, खरबे बांगडे, सुळे, टोळ वगैरे मासे घरात यायचेत. यातील बांगडा हा मासा बरेचदा जाळ्यात मोठ्या प्रमाणात सापडला की, अगदी रुपयाला दहा-बारा या प्रमाणात पिशवीतून घरात यायचा. मग बांगड्याचे विविध प्रकार घरात बनवले जायचे. हळदीचे पान, तीरफळ सारात आल्यामुळे बांगड्याचे सार अजूनच बहारदार व्हायचे. भरलेला बांगडा बनवायला मात्र गृहिणींना बरेच कौशल्य पणाला लावायला लागायचे. मोरी, सुंगटा, कुर्ले, तिसरे, खुबे हे काही माशांचे प्रकार भाजलेल्या वाटपात बनविले जायचेत. पापलेट, इस्वन (सुरमई), सरंगो (हलवा) हे काही महागडे माशांचे प्रकार आमच्या घरात फारच कमी वेळा आलेत. महागडे असले तरीही या माशांची विक्री मोठ्या प्रमाणात वेंगुर्ल्याच्या बाजारात व्हायची. अस्सल माशेखांव असणारा वेंगुर्लेकर मासे खाताना पैशाची कंजुषी नाही करत.

     त्याकाळी मासे-खरेदी विक्री ही जुन्या वेंगुर्ला मासळी मार्केटमध्ये व्हायची. अगदी फार थोड्या प्रमाणात बंदरावर लोक मासे खरेदीसाठी जायचे. विशेषतः सुंगटा (कोळंबी) साठी. हळूहळू बंदरावरील मासळी विक्रीचे खरेदी-विक्रीचे प्रमाण वाढले. ज्यांच्याकडे गाड्या होत्या ते वेंगुर्ला बंदराकडे जाऊ लागले. मी १९९६ साली मुंबईला स्थायीक झालो त्यानंतर काहीवर्षांनी वेंगुर्ल्याच्या मासळी मार्केटचे स्थलांतर झाले असे कळाले. हे स्थलांतर अगदी बाजूलाच आणि मार्केटमध्येच असल्याने लोकांची गैरसोय वगैर काही झाली नाही. पण मी जेव्हा जेव्हा  सुट्टीत वेंगुर्ल्यात आल्यावर या मार्केटला भेटदिली तेव्हा झालेला बदल मला प्रकर्षाने जाणवला. महत्त्वाचा बदल म्हणजे वेंगुर्ल्यातील मासळी ही प्रचंड महाग झाली होती आणि त्याहून वाईट गोष्ट म्हणजे इतर ठिकाणावरुन विक्रीसाठी आलेली मासळी वेंगुर्ल्याची मासळी म्हणून विकली जात होती तसेच खराब होत आलेली मासळी विक्रीचे प्रमाण वाढू लागले होते. मला तर आमचे मोठे बंधू मी बाजारात निघालो की अडवायचे, ‘संजू थांब.. मी येतय, तुका नाय जमाचा, आता फसयतत.क्षणभर मला विश्वास बसला नाही, वेंगुर्ल्यातील स्थायीक माणूस आणि त्यातील आमचे ज्येष्ठ बंधू म्हणतात म्हणजे यात तथ्य असणारच, आणि तसा मला एकदोन वेळा अनुभवही आला होता. नंतर हे मार्केट वेंगुर्ला बस डेपोच्या पुढे स्थलांतरित झाले आणि लोकांना मासे खरेदीसाठी लांबची पायपीट करावी लागली.

       आता तर अत्याधुनिक आणि प्रशस्त मच्छी मार्केटचे लोकार्पण झाले आहे. वेंगुर्ला शहरातील लोकांची मासळी खरेदीसाठीची पायपीट वाचेल. या मासळी मार्केटमुळे वेंगुर्ल्यातील इतर व्यवसाय पुन्हा तेजीत येतील त्याच बरोबर जुन्या वैभव काळाप्रमाणे ताजी आणि मस्त मासळी इथे उपलब्ध होईल अशी अस्सल माशेखांव लोकांची माफक अपेक्षा आहे. पुन्हा तो स्वस्ताईचा काळ येईल अशी आशा मात्र कुणीच करत नाही हे विशेष.

       वेंगुर्ल्यातील या प्रसिद्ध असलेल्या मासळी मार्केटमुळे घराघरात (शाकाहारी जनता सोडून) आठवड्यातील ठराविक वार सोडले तर मच्छीचा वास दरवळतो. दुपारी माशाचा सांबारा आणि भात ओरपून ४ वाजेपर्यंत वामकुक्षी घेणारा वेंगुर्लावासीय हमखास दिसतो. असा हा अस्सल माशेखांब वेंगुर्लावासीय आता पुन्हा मासळी मार्केट जुन्या ठिकाणी आणि आधुनिक स्वरुपात परतल्याने नक्कीच सुखावला आहे.

    ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतअसं कुणी वेंगुर्लावासीयांना विचारायला गेलं तर उत्तर मिळेल वेंगुर्ल्यात जन्म घ्यावा लागतो‘.

  संजय गोविंद घोगळे (८६५५१७८२४७)

Leave a Reply

Close Menu