स्टे…फ्री…!!

        देशाच्या सर्वोच्च पदावर ज्यावेळी एक आदिवासी महिला विराजमान होत होत्या, त्याचवेळी नाशिक मधल्या देवगावमधील आदिवासी आश्रमशाळेत एका विद्यार्थीनीला मासिक पाळी आली म्हणून झाड लावण्यापासून रोखलं गेलं. ही बातमी वाचनात आली.

       दोन्ही घटना इथल्याच! कोणावरही भाष्य करायचं झालं तरी तिच तिच वाक्य डोळ्यांसमोर येऊ लागली. २०२२मध्ये स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षी राष्ट्रपती या सर्वोच्च स्थानावर विराजमान झालेल्या द्रौपदी मुर्मु यांचा अभिमान अंगी बाणवताना मासिक पाळीत मुलींनी झाड लावलं तर झाड मरत. हे अकलेचे तारे शिक्षकांनी तोडावेत? किती विरोधाभास! ज्या मुलींना मासिक पाळी असेल, त्यांनी वृक्षारोपण करु नका. त्यांनी लावलेलं झाड जगणार नाही, असा फतवा शिक्षकाने काढला. या शिक्षकाविरोधात विद्यार्थीनीने आवाज उठवल्यानंतर हा प्रकार समोर आला.

     मासिक पाळी हे स्त्रीच्या सृजनाचं प्रतीक. तिचं अस्तित्व ज्या वलयाभवतीने गुंफल गेले आहे किवा ज्याची उत्पत्तीच ज्या मासिक पाळीनंतर झालीय ती मासिकपाळी झाडाची वाढ खुंटवते. ह्या विचारांची मुळंच अजूनही बुरसटलेली आहेत. अजूनही बाईची मासिक पाळी विटाळ मानणा-या अंधश्रद्धेची जळमटं भारतीय समाजात किती खोलवर रूजलीयत याचं हे उदाहरण आहे. अज्ञान अजूनही मनामनात राहिलेलं आहे. हे अज्ञान ज्ञानाचं दान देणा-या शिक्षकांकडे आहे, पण तेही काही ठिकाणी या अशा विचारात अडकून पडलेले दिसतात तेव्हा ही सगळ्यात मोठी शोकांतिका असल्याचे जाणवते.

       स्त्रिया शिकल्या तर नव-याचं आयुष्य कमी होतं, ही दृढ मानसिकता बदलण्यासाठी अनेक विचारवंतांना, सुधारकांना आपले आयुष्य खर्ची घालावे लागले. सती जाणा-या स्त्रीचं तिच्या नव-यामागे स्वतंत्र अस्तित्व असतं हे पटवून देण्यासाठी कायदे करावे लागले. यासाठीही अनेकांना लढा द्यावा लागला. त्यातून आजच्या स्त्रियांना चांगले दिवस आले आहेत, हे विसरून आपणाला चालणार नाही. एखादा परंपरेने किवा अज्ञानातून असलेला विचार समाजप्रवाहात चटकन बदल होणं, तो स्वीकारणं हे कठीण असतं मान्य. पण सद्यस्थितीत एखाद्या विषयावर आपलं मत मांडताना किमान तो वैज्ञानिक कसोटीवर तपासून मग त्यावर भूमिका घ्यायला काहीच हरकत नसावी. पण यासाठी सुधारकांनी सिद्धांत मांडल्या नंतरच आपण त्याचा स्वीकार करणार का? आपण तारतम्याने विचारप्रवाह बदलण्यासाठी आपणहून काहीच भूमिका घेणार नाही का?

      अनेक ठिकाणी मुलींच्या बाबतीत त्या कोणत्या सामाजिक, आर्थिकस्तरातून आल्या आहेत, तिथे त्यांना आरोग्याविषयीच्या ज्ञानाचा अभाव असू शकतो किवा गरिबीमुळे अगदी वैयक्तिक स्वच्छेतेची साधनंही उपलब्ध नसू शकतात. लाज, कुंचबणा तर ग्रामीण भागात असतेच. अशावेळी त्यांना वैयक्तिक आरोग्याविषयीची माहिती, लैंगिक शिक्षणाबाबतचं योग्य ज्ञान मिळण्याची जागा ही शाळा, कॉलेजच असू शकतं. तिथेच जर असे अज्ञानाचे, बुरसटलेले घडे भरले असतील तर येणा-या पिढीकडून आपण काय अपेक्षा करणार आणि कसली? संबंधित शिक्षकावर चौकशीनंतर कारवाई होईलही. पण त्यामुळे प्रश्न सुटणार नाही. कारण, प्रश्न मानसिकतेचा आहे.

       आपल्या समाजात मासिक पाळीबद्दलच्या असंख्य भ्रामक कल्पना आहेत. त्यामुळे वयात येणा-या मुलींपासून ते महिलांपर्यंत अनेकींना अगदी किळस प्रकारांना सामोरं जावं लागतंय. त्यांना पाळी आलीय की नाही हे पाहाण्यासाठी लांच्छनास्पद प्रकारांना सामोरं जावं लागतं. पाळी आली असेल तर तिला बहिष्कृतासारखं वागवलं जातं. जणू ती गुन्हेगार आहे.

      परंपरांच्या नावाखाली मानेवर दिलेलं बंधन मुकाटपणे बायकाही शतकानुशतकं ओढत आहेत. शोषण सहन करताहेत. अगदी शिकल्या सवरलेल्या स्रीयाही कथित विटाळाचं जोखड झुगारण्याची हिम्मत करत नाहीत. गपगुमान कथित परंपरेच्या पाईक होतात. काही ठिकाणी गुलामीचं स्वीकारतात. काही ठिकाणी त्यांची अवस्था दुटप्पी जाणवते. गावी आल्यावर पाळीच्या दरम्यान पाळायचं, दरम्यान शेतीपासूनची सर्व बाहेरची काम केली तरी चालतात. पण स्वयंपाक नाही करायचा. विश्रांतीच्या नावाखाली फक्त स्वयंपाक करण्यातून सूट. शहरात मूळ देवाचं स्थान नाही, त्यामुळे नाही पाळत आम्ही असं याच स्त्रिया सांगतात. तेव्हा समाजातील ही रीत, परंपरा अजूनही किती मनात विळखा घालून आहे याच नवल वाटत राहतं. आपण स्वतःच स्वतःला फसवत आहोत, हे मान्य असूनही प्रतिकार करताना प्रतिसाद म्हणून येणा-या विचारांची ती भीती असावी का? हा बदल सहज स्वीकारला जाणार नाही, त्या भोवतीने धार्मिक वलय घट्ट करून ठेवले असल्याने ब-याच व्यक्ती हा बदल स्वीकारायला धजावत नाहीत. म्हणूनच मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याबद्दल बोलणं टाळलं जातं. अगदी मेडिकलमधून सॅनिटरी नॅपकिन आणणारी व्यक्ती आणि देणारी व्यक्ती अशी वागते जणू काय चोरून बाँम्ब दिला जातोय. हा अवघडलेपणा कशासाठी? जसा नाक तोंड पुसायला रुमाल तसं सॅनिटरी नॅपकिन. पाळीच्या काळात वापरला जाणारा कपडा कुठे वाळत घालायचा म्हणून का कोपरे शोधायचे? तो कपडा चांगला सुकणं महत्त्वाचं की तो कुणाला दिसू नये हे महत्त्वाचं? नुसती स्टे फ्रीचं सॅनिटरी नॅपकिन वापरून फ्री राहाता येत नाही. विचारांनी फ्रीराहायला हवं. मासिक पाळी धर्माशी नाही, शरीरधर्माशी निगडीत आहे हे समजून घ्यायला हवं.

      मासिक पाळी आणि त्यातून निर्माण होणा-या आरोग्याचा प्रश्न हा सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे हे समजून घेण्याची गरज आहे. स्त्री आरोग्याविषयी जागृती होणं गरजेचं आहे. मुलींना, महिलांना वेगवेगळ्या टप्प्यांवर आजही अन्याय सहन करावे लागत आहेत. त्यासाठी गरज आहे समाजातली अंधश्रद्धेची जळमटं काढून टाकण्याची. पाळी सुरू असताना स्वच्छता पाळा, सोवळे नकोहे सांगण्याची. ज्यावेळी स्रीया प्रत्येक क्षेत्रात कर्तबगारी दाखवताहेत, सैन्यात जावून देशासाठी सीमेवरही लढताहेत, नवनवी क्षितीज पादाक्रांत करताहेत. अशावेळी अनेकजणी अडकून पडल्यात पाळीच्या चक्रात. या चक्रात आहे वैयक्तिक आरोग्याविषयीच्या माहितीचा अभाव,लैंगिक शिक्षणाबाबतचं अज्ञान, गरीबी, कुंचबणा व अंधश्रद्धेचं जोखड, परंपरांचं खोटं कोंदण. बायकांना कथित विटाळाची चिंता, पण तिच्या आरोग्याचं कुणाला सोयर सुतक नाही. अगदी बाईलाही नाही. तिला ज्या काळात शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागतं. भावनिक बदलांना सामोरं जागतं. अशावेळी तिला जो आधार मिळायला हवा तो मिळत नाही. उलट तिची अवहेलना केली जाते. त्याचा परिणाम  एकूणच आरोग्यावर होतो. मानसिकतेवर होतो.

भरलेला उर पण, दडपलेली छाती

एकीच होतय सोनं, जिथे दुसरीची माती

जल्लोष करावा की, बाळगावी भीती

हीच का ती म्हणे भाग्य जिच्या हाती

   कुडाळ येथील नाट्यकर्मी केदार देसाई यांनी लिहिलेली ही चारोळी समाजातील या एका विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवते. ही विसंगती दूर करण्याचा प्रयत्न सर्व स्तरातून व्हायला हवा. हे भाग्य बदलण्यासाठी आचार व विचारांनी तीला स्टेफ्रीराहायला मदत करूया!

Leave a Reply

Close Menu