बाप्पाने जपला मायेचा गोडवा!

एका माटवीखाली आपल्याला सर्रासपणे एकाच गणपतीचे पूजन केल्याचे दिसते. पण वेंगुर्ला येथे एकाच माटवीखाली ‘मामा’ आणि ‘भाचे’ अशा दोन गणपतींचे पूजन होत असून ही प्रथा 66 वर्षे अव्याहतपणे सुरु आहे.

      गणेश चतुर्थीला प्रत्येक घरात माटवीखाली एकच गणपती दिसून येतो. मात्र, वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा-वाघेश्वरवाडी येथील कै. अनंत विठ्ठल केरकर यांच्या निवासस्थानी एकाच माटवीखाली ‘मामा-भाचे’ या दोन गणपतींचे पूजन होत आहे. दिवंगत अनंत केरकर यांची बहिण सुगंधा मयेकर या मुंबई-लालबाग येथे आपल्या ब्लॉकमध्ये गणपतीचे पूजन करायच्या. सन 1958 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे एवढ्या मोठ्या शहरात आपली बहिण आपल्या मुलासह एकटी कशी राहणार या भितीने त्यांनी तिला आपल्या माहेरी आणत आश्रय दिला. परंतु कितीही संकट आले तरी आपल्या गणपती पूजनाचे व्रत सोडायचे नाही असे सुगंधा मयेकर यांनी ठरविले. तिच्या या संकल्पाला भावानेही पाठींबा दर्शवित तिचा गणपती वेगळ्या ठिकाणी न पूजता आपल्याच घरात आपल्या गणपतीच्याच बाजूला तिच्या गणपतीचे पूजन केले. सन 1960 मध्ये पहिल्यांदा एकाच माटवीखाली दोन गणपतींचे पूजन करण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत ती परंपरा ‘मामा’ आणि ‘भाचे’ यांनी अविरतपणे सुरु ठेवली आहे. काही वर्षांत मोठे चक्रीवादळ निर्माण झाले. या वादळात दिवंगत अनंत केरकर यांचे रहाते घर जमिनदोस्त झाले. तरीही त्यांनी न डगमगता घराशेजारी भव्य मोठी झोपडी बांधली. यामध्ये त्यांनी आपल्या सर्व कुटुंबासमवेत काही महिने वास्तव्यही केले. याच दरम्यान, आलेल्या गणेश चतुर्थीमध्ये त्यांनी या झोपडीत दोन्ही गणपतींचे पूजन केले.

      एकाच माटवीखाली दोन गणपतींचे पूजन करण्याचे केरकर आणि मयेकर कुटुंबियांचे यावर्षीचे हे 66वे वर्ष आहे. दोन्ही कुटुंबिय मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गणपतींचे पूजन करणार आहेत. यापूर्वी दोन्ही कुटुंबियांनी 42 आणि 21 दिवस दोन्ही गणपतींची सेवा केली आहे. दिवंगत अनंत केरकर आणि दिवंगत सुगंधा मयेकर यांच्या निधनानंतरही ही दोन्ही कुटुंबे चालत आलेली परंपरा जपत आहेत. ‘मामा’-‘भाचे’ यांच्या गणशेमूर्ती गेली 27 वर्षे सिद्धेश्वरवाडी येथील श्रीकांत केरकर आणि बंधू घडवित आहेत. दोन्ही गणपती हे आपलेच आहेत अशा श्रद्धेने ही दोन्ही कुटुंबिय तनमन आणि धन खर्च करुन दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात.

शब्दांकन- प्रथमेश गुरव, 9021070624

         मामामुळे माझी गणपती पूजनाची परंपरा खंडीत झाली नाही. कामानिमित्त मी मुंबई येथे असलो तरी दरवर्षी न चुकता गणेश चतुर्थीला उपस्थित राहतो. गणपतीच्या आर्शीवादाने अखंड राहिलेल्या बहिण-भावाच्या नात्यामुळे त्यांच्या पश्‍चातही आमची पुढची पिढीही एकत्र राहिली आहे.    

 -रामचंद्र शंकर मयेकर

Leave a Reply

Close Menu